Sunday, November 24, 2013

तो...



लहानपणी आई-बाबां बरोबर कुठल्याश्या सिनेमाला गेलो होतो...कुठला ते नक्की आठवत नाही आता...पण एक "तो" आठवतो. त्याचं निव्वळ "असणं" मी नकळतपणे टिपून घेत होतो...त्या नंतर आज-आत्तापर्यंत,
"तो" माझ्या सोबत असतो, सतत कुठे ना कुठे, कसाही कधीही...लहानपणी आणि अजूनही तुझ्यामुळे मी कधी "एकटा" असलो  तरी राहिलो नही, राहत नाही...माझा जन्म १९७३ ला...मी गर्भात असताना माझ्या वर "बॉबी" आणि "जन्जीर" चे "गर्भसंस्कार" झाले... तुझ्याशी नाळ जुळणे हे विधिलिखितच होते.

तो अचाट अभिनय करतो, हसतो, रडतो, चिडवतो, प्रेम करतो, सगळ-सगळ करतो... कधी जाम  चुकतो...पण मला जाम आवडतो...त्याच्या बद्दल बोलताना, लिहताना मी लहान होतो...अगदी लहान...म्हणूनच लहान मुलाला एकदा माणूस आवडला कि मग त्याची व्यंग हि दिसेनाशी होतात किंवा दुर्लक्षित तरी...माझ "टाइम मशीन" मधून निर्वाण होते...आठवणीच्या जंगलात...

....जन्जीर, अभिमान, दिवार, त्रिशूल,काला पथ्थर, डॉन, मिली, चुपके चुपके, शोले, शक्ती, बेमिसाल, बेनाम, जुर्माना, आलाप, इन्कलाब, शराबी, मि. नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर, दो अनजाने, दोस्ताना,   सत्ते पे सत्ता, सिलसिला, अदालत, कभी कभी, नमक हराम, नमक हलाल, बरसात कि एक रात, आखरी रास्ता, (थोडा) खुद्दार, अग्निपथ, मै आझाद हू,  चीनी कम, खाकी, Black, अमर अकबर अंथोनी, निशब्द,  विरुद्ध,  देव, (अर्धा) याराना, (थोडा) अंधा कानुन, अक्स, बागबान , (थोडा) इमान धरम , (थोडा) कोहराम...

आज तुझ्या बद्दल लिहतोय...कुठून सुरवात करू? नाना पाटेकर, वजूद मध्ये माधुरी ला म्हणाला होता - "कैसे बताउ तुझे, तुम मेरे लिये कौन हो..." 

 तू "परवाना" मध्ये ओम प्रकाश ला मारलास तिथून कि "रेश्मा और शेरा" मध्ये वाहिदाच्या पायावर मूक बधीर लोळण घेतलीस तिथून  कि  "आनंद" मध्ये बुजून गेला होतास तिथून? तू "बॉम्बे टू गोवा" मध्ये अवघडून वावरलास आणि नाचलास तिथून कि ज्या "रस्ते का पथ्थर " ला बघून जावेदनी तुला "जन्जीर" ऐकवला तिथून?....

जाऊ दे...जे सगळ, सगळ्यांना माहित आहे त्या बद्दल बोलण्यात काय अर्थ आहे???

पण तुला जे माहित नाही ते सांगतो...

"काला पथ्थर" ला माझा छोटा मामा मला न घेता चालला होता...केवढा मोठा अपराध केला त्यांनी...व्यायाम करत असूनही त्याला माझ्या हातून त्याचा उजवा पाय सोडवता सोडवता नाकी नऊ आले होते!

"डॉन" आणि "त्रिशूल" मी असंख्य वेळा बघितले आहेत...सार्वजनिक गणेशोत्सव..त्यात तुला उजवहि बघितलय...उलट्या बाजूनी !!!

तुला पडद्यावर मरताना बघून जाम रडलोय. अजूनही रडतो...रडत राहीन...

"नमक हराम" मध्ये राजेश खन्ना ला "विल यु प्लीज शट अप एन्द गेट ऑउट" म्हणताना सिमी बोलायच्या आत तुझ्या आवाजातली रागा पेक्षा मित्रापासून दुरावल्याची तीव्र वेदना, मी आधीच नोंदवली होती...

तुझा "मि. नटवरलाल" बघून मला आलेला ताप, पटकन आणि कुठलीही गोळी न घेता उतरला होता..

"शक्ती" बघितल्या वर माझ्या बाबांच्या वयाच्या, शेजारील काका-काकू बरोबर तू दिलीप कुमार समोर
कसा कमी पडला नाहीस ते बाळबोध पण ठाम पणे मांडले होते...

"बेमिसाल" मध्ये ओम शिव पुरी गेल्या वर तू दगड होतोस आणि माझा बर्फ...तुझ आणि राखी मधल "सखी" च नात...माझ्या साठी एक मृगजळ...

तू डबिंग करताना श्वासोच्छवास आणि ओठ विलग होतानाचा पण आवाज कसा सोडत नाहीस???

८२ ला तू मरणार अशी "अफवा" आली होती...मग रोज बातम्या यायच्या...तू "clinically dead" कसा असू शकतोस? माझ्या बाल मनानी ती "अफवा" कधीच स्वीकारली नाही...तू वाचलास...तुझा "कुली" मग (रद्दड असूनही) नेहमीच्याच आवेशात बघितला होता... कोल्हापूरला...देवी दर्शनां नंतर मग देव दर्शन...पडद्या वर कधीतरी आले "इस शॉट मे चोट लागी थी..." तेव्हा ती अफवा नव्हती हे जाणवले...

सुट्टीत एका सकाळी बाबांनी स्पोन्सेर केल्यामुळे "स्नेक इन द मंकीज शाडो" बघितला होता माझ्या (मामे ) मामा बरोबर...मग त्याचं दिवशी "शराबी" कसा बघणार??? मग (मामे) मामानीच  सुचवल्या प्रमाणे कुठलीही लाज न बाळगता आजोबांकडे (त्याच्या बाबांकडे) बोललो होतो - "माझ्या बाबांनी आम्हाला सकाळी सिनेमा दाखवला ना? मग आता तुम्ही दाखवा!!! "शराबी" तर बघितला, पण त्या नंतर अनेक वर्ष कधीही समोर आलो तरी ..."जावयाचे पोर..हरा XX र " असे लाडिक पण बोचणारे चिमटे आजोबा काढत राहिले... आजही अनकेदा "शराबी" (मनापासून) बघताना, ते चिमटे पण टोचतात रे!

मग मध्ये सगळे बोलत होते कि तू देशद्रोही आहेस! अरे काय वाट्टेल ते काय बोलता? "शहेनशाह" च्या पोस्टर ला काळे फासता??? तुम्ही "देशप्रेमी" आणि "इन्कलाब" नाही बघितला? सिनेमे बघा सिनेमे...काय पण उगाच!!!

करंदीकर सर १०वी  ला इंग्लिश शिकवायचे तेव्हा मी तुझे "शहेनशाह" मधले संवाद माझ्या मित्रांना जसे च्या तसे ऐकवायचो...वेगळी किक मिळायची!!!

१० वीच्या prelim ला, हिंदी-संस्कृत च्या आधी, मी न बघितलेला तुझा कालिया repeat मध्ये लागला होता...माझी जाम चुळबुळ चालू होती...माझ्या बाबांनी मला खर कारण विचारल...सांगितले...कालिया बघितला...हिंदी-संस्कृत मध्ये ८४ आले !

"गंगा जमुना सरस्वती" अत्यंत वाईट असणार आहे, असे मला आतून वाटत असावे, म्हणून मी तो (सगळे मित्र जाऊनही) बघितलाच नाही..तुझी "प्रतिमा" तुझ्या पेक्षा मला प्रिय होती!

१२ त असताना बाबाना सिविअर heart attack आला होता, prelim हॉस्पिटल मधून ये जा करून दिली होती...
final ची तयारी नव्हती...४ थ्या मजल्या वरचे घर बदलून नवीन भाड्याचे घर मिळतंय का ह्याची पायपीट सुरु होती...पण तरीही दिली...तुझा अग्निपथ ३ वेळा बघितला होता...लोकांना म्हणे तुझा आवाज तू मुद्दाम बदललाय हे कळल नाही...त्यातली कविता रोज सायकलनी कोलेजला जाताना घोकायचो...फर्स्ट क्लास आला...

तुझ्या "तुफान" आणि "जादूगर" ने हि कसे पैसे गमावले नाहीत (पुकार, नास्तिक, महान आणि बेशरम प्रमाणे) हे स्वत:ला आणि मित्रांना (मनाविरुद्ध) ऐकवायचो...

"हम" चालला तेव्हा वाटल, तू आलास परत...Tiger...नुसतीच आशा...

"डिप्लोमा" ला गणित मला जाम अवघड वाटायचे (अजूनही!) मग गणिताचा पेपर चांगला गेला...तर आणि तरच तुझा "खुदा गवाह"  बघून celebrate करायचे असे ठरवले होते...चांगला गेला...परीक्षा संपली त्या दिवशी गेइटी ला जाऊन बघितला...

बी.इ. ला होतो तेव्हा तू घरी बसला होतास, पांढरी दाढी वाढवून...मग TV किंवा repeat मध्ये अग्निपथ ची परायणे (तू बॉब क्रिस्तो ला गोळी घालताना फक्त तुझ्या चेहऱ्या वरून गोळ्या झाडल्या हे अफाट पोचवतोस रे) ...किंवा "मै आज भी फेके हुए पैसे नही उठता" बघत दिवस काढले... मी बी.इ. फारसे enjoy केले नही त्याचे हे तर कारण नव्हते ना??

तुझ्या "मृत्युदाता" साठी खास "शिट्टी" शिकायचं ठरवल होते, पण सिनेमा बघताना सगळ अवसानच गळाले..

"लाल बादशाह" आणि "सुर्यवंशम" जर १० वर्षा पूर्वी केले असतेस तर "सुपर हिट" झाले असते रे...तू उत्तम होतास त्यात (कितीही चपला पडल्या मला ह्या वर तरीही चालतील) पण वय??? ते कसे उलटे फिरवणार???

"बडे मिया..." मध्ये गोविंदा कडून ६-०, ६-०,६-१ हरलास..."बूम" हि केलास...पण मी जिवंत राहिलो...

प्रेमात पडलो तेव्हा सिलसिला, कभी कभी, शराबी, सत्ते पे सत्ता  मधल्या कविता, गाणी नेहमी मनात रुंजी घालायचे...

तुझे घर ओलीस पडले, सगळे तुझ्या विरोधात गेले...नाही नाही ते बोलले...मी जाम अस्वस्थ होतो पण तुझ्यावरचा विश्वास ढळला नाही..कधीच...शप्पथ!

तुझा solid comeback... KBC साठी घरात आलास...छान वाटलं रे ! तुझ्या बाबांच्या उत्तुंग नावाला गालबोट न लावू देता, लोकं retire होतात  त्या वयात जगाला परत केलेली पै न पै...सगळ अतिशय अभिमानानी बघत होतो...ज्या लोकांनी तुझ्या नावानी बोट मोडली, त्यांची बोट तोंडात घालायला लावायची तुला १९६९ पासून सवय होती...तू तुझ्या सवयीला जागलास आणि मी "तुझ्या" सवयीला...

तुझ्या वरच्या (अंध)प्रेमा मुळे, तुझ्या अभिनयात "ढ" असलेल्या मुलाचे सिनेमे पण काही काळ बघितले...

तू दिलीप कुमार, संजीव कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शाहरुख, नाना पाटेकर, ओम पुरी, कदर खान, मिथुन, ऋषी, गोविंदा,  तब्बू ,जया, रेखा, राणी मुकर्जी ह्यांच्या सामोर उभा ठाकलास...झुंजलास...(कमल हसन बरोबर चा "खबरदार" रिलीज होऊ द्यायला हवा होतास रे ! ) बरेच जिंकलास...थोडे बरोबरीत सोडवलेस..एकच हरलास .. पण कधीच कोणालाच घाबरला नाहीस (शशी, धर्मेंद्र, जितेंद्र, शत्रू, अजय देवगण, अक्षय कुमार इत्यादी, इत्यादींना मी तुझ्या सोबत आणू इच्छित नही)...नसीर (आणि बरेच लोक, बरेचदा)  तुला तुझ्या सिनेमाच्या चोईस वरून (स्वतःचे झाकून)  टोचून, घालून पडून बोलले पण तू कधी उलट उत्तर घातले नाहीस...ती सवयच नही तुला!

एकदा नसीर बरोबर काम करून त्याची हि हौस फेडावीस अशी एक मनापासून इच्छा आहे...तू रोबेर्ट दि नेरो किंवा अल पचिनो बरोबर कस काम केले असतेस? असा "मानसिक प्रयोग" अनेकदा करून बघितला आहे...तिथेहि तू बरोबरीतच राहशील ह्याची मला तरी १००% खात्री आहे...BTW तुझे अपूर्ण सिनेमे "फिल्म हि फिल्म" किंवा "यार मेरी जिन्दगी" रूपांनी कपाटात आहेत (त्यांच्या जोडी ला जमानत, शु बाईट, खबरदार, कधी येणार ह्या प्रतीक्षेत आहे...)

तू बदलत्या जगा बरोबर स्वतःला बदलस...अजिबात, अजिबात,  सोप नाही ते..आज मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी तू अनेक मध्यमातून सर्वत्र असतोस...तुझ्या अर्ध्या वयाच्या लोकां बरोबर काम करतोस...रोज ४ ला gym ला जातोस...आपल्या उत्तुंग यशा पेक्षा आपल्या मुलाचे ढळढळीत अपयश तुला रोज टोचत असणार...आजही तुझ्या पाठी - तुझं घर कसे चालणार? तुझी बायको आणि सून निट नांदतील का? मुलगा आणि सून एकत्र राहतील का? असे असंख्य प्रश्न, माझा अजिबात संबंध नसताना निव्वळ आणि निव्वळ तुझ्या प्रेमापोटी पडतात !!!

बस यार, अजून काय आणि किती लिहू??? केहने को बहोत कुछ है मगर....

आजी औक्षण करताना नेहमी म्हणते - "कापसा सारखा म्हतारा हो"...

मी मरेपर्यंत काम करत राहा (महा) राजा !  जमेल ना तुला ?

तुझा,
......
......
......