पूर्णविराम
आज सकाळी ६ वाजता मी गेलो...
मी गेलो तेव्हा सोनिया जवळच होती ...आता मला जाऊन २ तास झाले तरी ती तिथून उठलीच नाहीये...नेहमी प्रमाणे खूप भरून आले मला, पण आता ते व्यक्त करता येणार नव्हते, कधीच.
मी एक सामान्य माणूस होतो, अति सामान्य आयुष्य जगत होतो ...सोनिया आयुष्यात येई पर्यंत...सोनिया १२ वर्षांनी लहान आहे...सॉरी...होती माझ्या पेक्षा...
बरोबर १२ वर्ष पूर्वीची गोष्ट, ३७ वर्षाचा होतो...एक गम्मत..आता मला सगळ एकदम स्वच्छ आठवतंय...स्मरण शक्ती एकदम तल्लख झाली आहे...गेले काही दिवस लोकांना ओळखू पण शकत नव्हतो धड...एक सोनिया सोडून...
मला नुकतीच बढती मिळाली होती. मागच्या वर्षी कंपनी फारशी धड न चालल्या मुळे फारच थोड्या लोकांना बढती मिळाली होती आणि त्यात मी हि एक होतो...काहीतरी बर घडत असणार हातून...नवीन काम...नवीन लोक...शिकत होतो लवकर, जमेल तसा...घरी बायको, एक मुलगी...घर आणि ऑफिस..ऑफिस आणि घर ह्या दोन मिती शिवाय तिसरी मितीच नव्हती आयुष्याला...सोनिया येई पर्यंत...
का येतात काही लोक आयुष्यात? आपला खरच काही कंट्रोल असतो का, कोणाच्या येण्या जाण्या वर?
आहे उत्तर ? असेल तर द्या ...आता मला कुठूनही आणि कोणाचे हि ऐकता येईल पुढचे १२-१३ दिवस...
सोनिया माझ्याच टीम मध्ये का आली? तिची जागा माझ्या कॅबीन च्या एकदम समोर का होती? ती नेहमी चुका करून, सुधारणा करायला माझ्या कडेच का यायची? फक्त माझ्या बरोबरच लंच आणि कॉफी का घ्यायची? दोन मिती मध्ये चालणारा मी...मला कधीच जाणून घ्यावेसे नाही. आम्ही दोघे फक्त चांगले सहकारी होतो...
मला कामात ढिसाळ पण आवडत नाही, अजिबात नाही...४-५ वर्ष अनुभव असणाऱ्यांना तर नक्कीच माफी नाही...एकदा असाच महत्वाचा रिपोर्ट तिने चुकांसकट सर्व जगाला मेल केला...लूप मध्ये मी..."इमेल" नवीन मध्यम असेल, पण अनुभव आहे ना? सेंड करायच्या आधी प्रूफ रीडिंग नको करायला???आता बॉस च्या शिव्या मला खायला लागणार हि जाणीव पण बोचत च राहिली...
"प्रोफेशनल" असलो तरी निव्वळ माणूसच न शेवटी आपण ???चिडलो तिच्या वर...जाम भडकलो होतो...सभ्यता सांभाळून, जितक घालून पडून बोलता येते, तितका सगळा बोललो...माझी पाठ असताना कॅबीनचा दरवाजा बंद झाला आणि मी भानावर आलो...मला न विचारता निघून गेली हे पाहून, राग अजून वाढला पण आता नुसतीच चडफड करण्या शिवाय काही पर्याय नव्हता...जे व्हयाचे ते झालेच...दुरुस्त करून दुसरी इमेल पाठवायच्या आत बॉसनि माझी घेतली...त्याला, मी पुरुष असल्यानी, बोलताना सभ्यता पाळायची गरज वाटली नाही...जैसी करणी वैसी भरणी...
घरी जाताना जाम कावलो होतो...दिवस भर झालेले निस्तरण्या मध्ये रात्री चे ९.३५ झाले होते...मी आणि सिक्युरिटी दोघेच उरलो असे वाटले...घरी जायच्या आधी रेस्टरूम ला जाताना pantry लागते तिथे चाहूल लागली...कोणी तरी हुंदके देत होत...मी थोडा सजग झालो..नजरेच्या कडे तून बघितले सोनिया होती...मी फारसा लक्ष न देता रेस्टरूम मध्ये शिरलो..सकाळचा राग अजून गेला नव्हता माझा...बाहेर आलो तेव्हाहि ती तिथेच होती.."शो ऑफ" स्वतः शी पुटपुटत मी लगबगी नि दुर्लक्ष करून निघालो होतो...
"सॉरी..अमर" ती बोलली ...आवाजात सच्चे पण असलं कि जाणवत माणसाला...आणि तेव्हा, मी माणसात होतो...
थबकलो...बसलो तिच्या समोर...खूप वेळ रडत असणार ती...डोळ्यातल काजळ थोड पसरल होते...केस थोडे विस्कटले होते...पण त्यातही ती सुंदर वाटली मला...पहिल्यांदा...इतक्या महिन्यात तिला इतका जवळून आणि इतक्या शांत पणे बघितलेच नव्हते...घरी जाऊन आनंदी आणि अनु ला , माझी बायको आणि मुलगी, पण एकदा निट निरखून बघायला हवे... "आय एम रिअल्ली सॉरी..अमर" ती परत बोलली...मी नुसताच खिन्न हसलो...एकदा घड्याळ बघितले..."मला फक्त ५ मि. बोलायचं आहे".."ओके बोल"...कुठे तरी सकाळी फाड फाड बोललो होतो तिला त्याचा गिल्टी कॉम्प्लेक्स आला होताच मला...माणूस अतिशय स्वार्थी प्राणी आहे ह्या जगात...माझ्या ऐकण्यानी "स्वार्थात परमार्थ" साध्य होत होता...ती बोलली...नक्की ५ मि. पेक्षा जास्ती...मी मुळात दमलो होतो...ऐकताना, सगळ ऐकल, असा दावा नाहीच...पण अनुभवातून, ऐकताना योग्य ठिकाणी मान हलवायची मसल मेमरी नक्की तयार झाली असणार...तिचा ब्रेक अप झाला होता आणि नव्हता हि...लक्ष विचलित होते...त्याचा परिणाम कामा वर होत होता ...अचानक मी माझे घड्याळ बघितले ...१०.१५ झाले होते...मी तिला खुणे नि थांबवल...बोललो "उद्या बोलू"...उठलोच...मग जाणवले ती पण एकटी कशी जाणार इतक्या उशिरा? "लिफ्ट हवी?" ..."हो...मी ५ मि. मध्ये पार्किंग मध्ये येते"...मी पुढे निघालो...
माझ्या कडे कंपनी नि दिलेला मोबाईल फोन होता...त्यावर घरून ३-४ मिस्ड कॉल्स येऊन गेले होते..पण त्या काळात आऊट गोइंग फार महाग होते...त्यातून कंपनी चा फोन...वैयक्तिक कामासाठी अगदी गरज असेल तरच वापरायचा असा स्वतःवरचा निर्बंध...आता घरी जाऊनच बोलू...गाडी पार्किंग लॉट मधून गेट पर्यंत ह्याच तंद्रीत आणली ...मग आठवल...सोनिया...रिवर्स घेतली...नशिबानी ती नुकतीच लिफ्ट मधून बाहेर येत होती...आपण तिला विसरलो होतो हे तिला कळले नाही ह्याचा मला उगाच आनंद झाला...हसलो...ती पण दरवाजा उघडताना हसली..का ते तिलाच ठावूक...तिचे घर माझ्या घर जवळच होते हे आजच कळले मला...गुड नाईट चे सोपस्कार करून घरी पोचलो..आनंदी अजूनही जेवायची थांबली होती...जेवताना दिवस भराचा आढावा झाला..."काय पण आज काल च्या मुली! " आनंदी तिच्या नेहमीच्या गोड पद्धतीने रीक्त झाली..आज ती जास्तच गोड वाटली मला...
झोपताना अनु ला बघितल्या शिवाय झोपत नव्हतो मी...सलील कुलकर्णी नि फार नंतर "दमलेल्या बाबा ची" कहाणी लिहली...त्याचा शेवटचा अंतरा माझ्या बाबतीत नाही पूर्ण होऊ शकला...पण ते नंतर...
सोनिया त्या रात्रीच्या (एक तर्फी) संवादा नंतर माझ्याशी मन मोकळे पणे वागायला लागली होती...बाबा नव्हते तिला...आई आणि लग्न झालेली मोठी बहिण..माझ्या सल्ल्या नुसार तिने ब्रेक अप चा निर्णय पक्का केला आणि चक्क अमलात पण आणला...मी का सुखावलो? माहित नाही पण त्याच दिवशी क्लायंट पार्टी च निम्मित करून तिला लंच ला घेऊन गेलो...क्लायंट आला नाही...येणारच नव्हता...पण येताना, तिचा मूड छान झाला होता...
सोनियाला मझ्या बद्दल "सोफ्ट कॉर्नर" आहे, असा मला भास होऊ लागला होता...
पण सोनिया कामात चुका करतच होती... तिच्या वतीने मी शिव्या खातच होतो...कधी तिच्याशी खटके पण उडाले..तिला "ट्रेनिंग" ला पण पाठवले...पण नसेल तिच्यात ती कुवत...काय करणार ती पण ...आता तिच्या बद्दल उगाच प्रोटेक्टिव वाटायला लागले होते...सुरवातीला ते वडीलकी च्या नात्यांनी असेल असे वाटले...मग नंतर उगाच मी मोर्निंग वॉक ला जाऊ लागलो...मग सायकल...मग चक्क जिम...आनंदी ला वाटले तिच्या सांगण्याचा परिणाम...मी तिला कशाला दुखवू?
बॉस नि शेवटी सांगितलेच ..."गीव हर अ मंथ टू इम्प्रुव...नो मोर चान्सेस इन दीज चाल्लेन्जिंग टाईम्स!"
काही ऑप्शनच नव्हता...सोनियाला कॅबीन मध्ये बोलवून जरा करडेपणेच बोललो...ती रडली...पण माझा नाईलाज च होता.. तिची "कंपनी" मला आवडत असली, तरी हि माझी "कंपनी" नव्हती!
दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस होता...बाकीच्या स्टाफ च्या मते ती कामचुकार आणि माझी फेवरेट असल्याने, फारसा कोणी तिच्या जवळ जात नसे...साहजिक च कोणी तिला "विश" केले नाही...मात्र मी आठवणीने "५ स्टार" दिल्या वर तिचा चेहरा, अनु जशी निरागस पणे उजळायची त्यापेक्षा पण जास्त उजळला होता...स्ट्रेंज!..काही क्षण गेल्यावर पण कसे लक्षात राहतात?
पुढचे काही दिवस झरकन गेले...माझी मजल आता ..."जर माझे लग्न झाले नसते तर" सोनिया ला कसे "प्रपोज" केले असते हे स्वप्न रंजन करण्या पर्यंत गेले होते...पण ह्या पुढे माझी झेप जाणार नव्ह्तीच..सिनेमा थोडीच होता?
तिच्या "रिलीविंग" ला आता फक्त ९ दिवस उरले होते...आणि तरी त्या दिवशी ती हसतच माझ्या कॅबीन मध्ये आली...मी चेहर्यावर उगाच गंभीर भाव आणला होता..."कॉफी?"...मी मान हलवली...आज तिने कॉफी चे पैसे भरले...निघणार इतक्यात, स्वतः च्या लग्नाची पत्रिका दिली...तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला ब्रेक अप बद्दल सांगितले होते...तरीही तो तयार झाला होता...मी आता खरच गंभीर झालो होतो...मला आनंद का होत नाहीये? मी चडफडलो मनात, पण तिला मात्र माझ्या चेहर्यावर हसूच दिसले..."मसल मेमरी" झिंदाबाद..
घरी बोललो...आनंदी परत गोड पणे बोलली ..."काय पण आज काल च्या मुली!"...
तिला रीतसर "सेंड ऑफ" द्या असा सूर मी बॉस कडे काढला ..."आता ती जातच आहे...तिचे लग्न पण होते आहे ...लेट इट एंड ओंन अ पोसीटीव नोट "...बॉस त्रासला, पण हो बोलला...काम यथा-तथा आणि HR चा विरोध असूनही सोनिया ला रिलीविंग आणि रिलीविंग लेटर मिळताना काही त्रास झाला नाही...ह्याचा उल्लेख कधी मी तिच्या जवळ केला नाही...
जाताना माझ्या कॅबीनमध्ये जरा जास्त रेंगाळते आहे असा भास झाला ...मग मी सवयीच्या कोरडे पणे तिला "ऑल द बेस्ट" केले...ती जरा खट्टू होऊनंच बाहेर पडली...कॉरीडोर मधून जाताना तिने एकदा मागे वळून बघितलं असं मला कॅबीन च्या काचे तून दिसले...मी नकळत "वेव" केले ...ती गेली..
लग्नाला मी गेलो नाहीच..."वर्किंग डे" चे कारण दिले...स्वल्प विराम.
मग अधून मधून तिच्या बद्दल कळत होते...लग्नानंतर दुसऱ्या शहरात गेली... तिला नवीन जॉब लागला...
आपणहून मी कधी तिच्या बद्दल कोणाला विचारले नाही...उगाच आपल्या खऱ्या भावना कोणाला कळल्या तर?
मी ही सर्वार्थांनी पुढेच गेलो ...पण सोनिया आठवतच राहिली...२ वर्ष तिच्या वाढ-दिवसाला तिला SMS केले...तिसऱ्या वर्षी तिचा reply आला नाही...थोडा वेळ वाईट वाटले...पण...
मधली काही वर्ष अशीच गेली...अमिताभ चा "चीनी कम" पहिला...तेव्हा परत तिची आठवण आली...थोडा वेळ वाईट वाटले...पण...
मग अचानक ते अक्रीत घडले...माझी आनंदी आणि अनु, तिच्या आजोळून येताना मला कायमचे सोडून गेले...आज इतक्या सहज बोलतोय कारण आता १२-१३ दिवसात मला कळेल कुठे आहेत नक्की त्या दोघी...
पण त्या वेळी पिळवटून निघालो होतो...एकटा ...अचानक, पूर्ण एकटा...माणूस असतो आणि अचानक नसतो...
त्या गेल्यावर, काही दिवस, फक्त २ पणत्या आणि मी...
ऑफिस रीस्युम केल्यावर पहिल्या संध्याकाळी स्वतः च्या चावी ने घर उघडताना कॉरीडोर मधेच ढसा ढसा रडलो...शेजारी आहेत ह्याची पहिल्यांदा जाणीव झाली...
आता घरी जाण्याच मी टाळायचो....जास्तीत जास्त काम घ्यायचो...दारू वगैरे नाही प्यायलो...न मंदिरात जास्त घोटाळलो ...काम आणि फक्त काम केले...कंपनीची उलाढाल आता वाढली होती आणि त्यात माझाही वाटा होता हे बॉस सकट सगळ्यांना पटले होते...नवीन नवीन जबाबदाऱ्यांची आता सवय झाली होती...मुद्दाम फिरतीचे काम कसे मिळेल हे बघायचो....
बॉस नि अचानक कंपनी सोडली ...मी त्याला रिप्लेस केले ...
मग एक दिवशी ऑस्ट्रेलिया ला गेलो कामा साठी...मेलबर्न...
परत निघायच्या आदल्या दिवशी थोडं फिरायला बाहेर पडलो...ट्यूब नि...कुठे जायचे हे नक्की ठरवल नव्हते...ज्या ठिकाणी वाटले, तिथे उतरलो...स्टेशन बाहेर आल्यावर सहज समोरच्या शॉप मध्ये शिरलो...
पुस्तक चाळली...अचानक एक पुस्तक हातातून सटकले...खाली पडले...उचलायला गेलो...नजर वर गेली आणि स्तब्ध झालो...सोनिया होती समोर...एकत्र काम केलेले ते उणेपुरे ५ महिने झरझर डोळ्या समोरून गेले...मनातून खूप आनंद झाला, तिला बघून ...तिच्या चेहऱ्यावर पण आनंद आहे असा भास मला झाला...मला इतक्या दिवसात आपण हसू शकतो हे विसरायला झाले होते...ती मसल मेमरी लोस्ट झाली होती!!!
मी आता पुढे काय करू, अशा विचारात असताना तीच पुढे आली, पटकन ...एकटीच होती...शी वॉज लुकिंग स्टन्निंग...ती जवळ आली ...मी उगाच इथे तिथे बघितले..."मी एकटीच आहे" तिने हसून उत्तर दिले...मी पण मनापासून हसलो...खूप वर्षांनी..तिचे लग्न अजून टिकून आहे का हे बघण्यासाठी तिच्या गळ्यात मंगळसुत्र शोधले ...नव्हते...पण हि ऑस्ट्रेलिया आहे, त्यामुळे मंगळसुत्र नसणे ह्या वरून काहीच गृहीत धरता येणार नाही...
"कॉफी?" तिनेच हसून विचारले ...आणि मधली काही वर्ष एकदम पुसली गेली...तिच्या मागे जवळच्या कॉफी शॉप मध्ये जाताना तीच बोलत होती काही बाही ...माझा अनेक भावनांचा कल्लोळ होत होता...मी शक्य तितका नॉर्मल राहायचा अतोनात प्रयत्न करत होतो...
बोलताना कळले ती इथेच जॉब करून सेटल झाली होती...लग्नात असली तरी आता बंधनात नाही...सेपेरेटेड फोर २ यीअर्स...मुल बाळ पण नाही...पण ह्यावेळी मला अजिबात आनंद झाला नाही...एकदा तुम्ही मृत्यू जवळून बघितलात कि दुसऱ्याच्या फाटक्यात आपण आनंद शोधणे कायमचे बंद करतो!
तिने कुठे उतरला आहे ते विचारले...रात्री डिनर एकत्र करू म्हणाली, तिच्या घरी...मी ठाम नाही म्हणालो...मग आपण रेस्तराँ ला भेटू बोलली..मी कसा बसा तयार झालो....
रात्री ठरल्या वेळी भेटलो...नदीच्या काठी सुंदर रेस्तराँ..कॅण्डल लाईट ...सोनिया अप्सरा दिसत होती...ती आता माझ्या पेक्षा सुस्थितीत होती..तिच्या एकंदरीत राहणीमाना वरून सहज अंदाज बांधता येत होता...
सुरवातीला मी खूप अवघडला होतो...तिनेच बोलते केले... नवरा चांगला होता पण "दे ग्रु अपार्ट" बोलली...मला आनंदी चे गोड वाक्य आठवल..."काय पण..."
आनंदी आणि अनु बद्दल मी कोणाशीच बोलायचो नाही पण सोनिया कडे मोकळा झालो...तिने माझा हात हातात घेतला...मी पटकन मागे घेतला..."वेरी सॉरी" ती बोलली "नोट फोर होल्डिंग युर हेंड...बट फोर व्हॉट यु हाव बिन थ्रू" ...मी फक्त मान डोलावली...
आता निघायची वेळ झाली तसा मी अस्वस्थ झालो...कदाचित ...कदाचित कशाला, नक्कीच हि सोनियाची शेवटची भेट...पण हि आपल्या भाव विश्वातून कधी गेलीच नाही...आज तिला सगळ सांगून टाकाव का? परत इतकी छान संधी मिळणार नाही! मी ते सांगून काय साध्य होणार होते ह्याचा सारा सार विचार नव्हता केला. पण इतकी वर्ष जाऊनही आपण सोनियाला विसरू शकलो नाही म्हणजे हे नक्की काही स्पेशल च आहे हे...हे असच मनात ठेऊन मारायचं? आनंदी आणि अनु ला आपण किती "मिस" करतो हे ठरवूनही आता त्यांना सांगू शकणार नाही! कधीच!
ती पण जणू माझ्या काहीतरी बोलण्यासाठीच थांबली होती...तिचा चमच्याचा चाळा चालू होता...एकदा उभी राहिली, उगाच गाऊन सारखा करून परत बसली..."
मग माहित नाही कसे पण मी पूर्ण धीर एकवटून तिला बोललो "एक कन्फेशन आहे"..ती थोड पुढे सरकली..मी बोललो, मग पुढची १०-१५ मि...खरच मी बोललो कि तो भास होता मला आता आठवत नाही.. कारण नक्की काय बोललो ते फक्त तिला माहित....मी फक्त बोललो...जसा जमेल तसा...
सगळ्या संभाषणामध्ये मला तिचे फक्त एकच वाक्य आठवत "...ऑल दीज इअर्स, आय थॉट यु हेटेड मी!"
दुसऱ्या दिवशी एअर पोर्ट ला "सी ऑफ" ला आली म्हणजे मी वेड-वाकड काही बोललो नसेन हे नक्की...
मोबाईल नंबर दिले घेतले...तिने चक्क मला मिठी मारली...ह्या वेळी मी अवघडलो नाही...
मग ती सतत भेटत राहिली... इंटरनेट च्या कृपेनी ...कधी फोन वर...एक दोनदा ती भारतात आली तेव्हा...डिवोर्स साठी..पण लंच डिनरच्या पुढे मी गेलो नाही...आणि तिनेही हट्ट केला नाही...
आता माझा कामाचा ताण खूप वाढला होता...६ महिन्या पूर्वी मला मोठा "कार्डियाक अर्रेस्ट" चा त्रास झाला...
ऑफिस मधल्या स्टाफनी हॉस्पिटलमध्ये हलवला...एकदम बेड रेस्ट...जवळच्या कोणाचा नंबर??? सोनिया , ऑस्ट्रेलिया...ती धावत आली लगेच सगळ टाकून...
पुढचे ५ महिने तिने माझं सगळ होते नव्हते ते केले... नर्स लाजेल अशी सर्व कामे केली तिने...रात्र रात्र जागली...
मग १ महिन्या पूर्वी ...मला एकदा काही आठवेनासे झाले...फक्त एक सोनिया सोडून...परत आठवले ते १६ दिवसा पूर्वी ...तेव्हा आर्जवानी सोनिया बोलली ...आपण लग्न करूया...तू त्या रात्री बोलला होतास तुला माझ्याशी लग्न करायचे होते...आपण लग्न करूया...
परवा मी कुठल्याश्या पेपर वर क्षीण पणे सही केलेली आणि ४-५ लोकांनी टाळ्या वाजवलेल्या मला आठवतात...बस्स...
त्या दिवसानंतर सोनिया मला सोडून गेलीच नाही फारशी...मी गेलो तेव्हा सोनिया जवळच होती...
आज सकाळी ६ वाजता मी गेलो... ...आता मला जाऊन २ तास झाले तरी ती तिथून उठलीच नाहीये...
पूर्णविराम...