Saturday, February 1, 2014

समज -गैरसमज


तुमचा कधी, कुठे, कुणा बरोबर गैरसमज झालाय?

म्हणजे जेव्हा तो होतो, तेव्हा तो "समज"च असतो नाही का? मग तो "गैरसमज" कसा होतो?

काय होते नक्की, जेव्हा समज होतो?

कधी कळते तरी का कि आपला  समज "गैर" होता? त्यानंतर आपली मनस्थिती काय असते?

गैरसमज हयात  व्यक्ती बद्दल असेल तर तो दूर होण्याचा किंचितशी  शक्यता तरी असते...समजा ती व्यक्ती हयात नसेल तर?

कधी वाटते हि सगळी whats app, facebook, tweeter चीच गलती आहे...इधर से आदमी बोलता कुछ है, सुनता कुछ है...करता कुछ है...

कधी वाटते whats app, facebook, tweeter ची काहीच गलती नही...त्यांचीच गलती आहे...समजूनच घेत नाहीत...

कारण  सामोरा समोर बोललो, फोन केला तरी गैर समज होतातच कि?

संवाद आणि विसंवाद, सत्य आणि असत्य,  समज आणि गैरसमज...एकाच नाण्याच्या दोन बाजू...आपला तो समज...दुसऱ्याचा गैरसमज हा मधला "आणि" लई भारी...अहंकार, भावना, आपली जाणीव, उमज काहीही असू शकते...फार नाजूक...संवाद आणि बोलती बंद करणारा...

संवादाची प्रोसेस नक्की काय आहे?
  • मला काहीतरी सांगायचेय
  • मग मी ते माझ्या क्षमते प्रमाणे -मला उमजत असलेल्या भाषेत, शब्दबद्ध करतो, विणतो.
  • ते उपलब्ध असलेल्या माध्यमामार्फत समोरच्याला पोचवतो...
  • समोरचा त्याच्या मनस्थिती, आकलन, पूर्वानुभव, मत, त्याची ऐकण्याची क्षमता ह्यानुसार माझे शब्द  उसवतो.
  • त्याच्या जाणीव-नेणीवे नुसार समोरचा प्रत्युत्तर देतो
  • सामोरा समोर असेन तर माझी आणि समोरच्याची देहबोली, शब्दां पेक्षा जास्त बोलते.
प्रत्येक संवादाला एक संदर्भ असतो. त्या संदर्भातच संवाद विणला आणि उसवला जावा हि उभयंताची अपेक्षा असते. संदर्भ बदलला कि संवाद बदलतो...

मग "गैर" समज व्हायला कारण काय?

मला जे सांगायचं ते आणि मी ते जसे शब्दबद्ध करतोय ते ह्यात अंतर असू शकेल 
किंवा 
मी ज्या माध्यमामार्फत, देहबोली मार्फत पोचवतो आहे त्या माध्यमांची, देहबोलीची काही उणीव असेल 
किंवा 
समोरच्याची आकलन शक्ती, भावना, अहंकार, पूर्वानुभव हा अडसर असेल
किंवा 
ह्या सगळ्या कारणामुळे माझा किंवा समोरच्याचा संदर्भ च्या आकलनात गफलत होत असेल.

जगाचा नकाशा म्हणजे जग नाही...कितीही मोठा कागद घेतला आणि त्यावर जगाचा तसाच्या तसा नकाशा काढला तर ते जग होईल???

मी, माझा मेंदू, माझे ह्या जगाबद्दलचे आकलन ह्यांनी माझ्या मेंदूत "माझे जग" बनते...हे मान्य केले कि "माझे जग" आणि "समोरच्याचे जग" ह्यात मुलभूत अंतर असणार हे मान्य करूनच संवाद करायला हवा...

हे जग "मिथ्या" आहे हे परमपित्या परमेश्वरानी सांगितले आहे त्यामागे हा मूळ भाव असेल का?

मला 6 दिसतो ते समोरच्याला 9 दिसू शकते हे धरूनच मला संवाद साधायला हवा...अर्थात हे प्रयत्न करूनही...समोरच्याला 9 दिसतीलहि  पण मग मला गैर समजा नंतर होणारा त्रास कमी होईल. मला जे वाटते तेच समोरच्याला पण वाटायला हवे हा हव्यास, आग्रह पण कमी होईल...

म्हणजे "गैर" समज हा मुख्यत्वे करून आपल्या स्वतःच्या समज शुचिते वर अवलंबून आहे...

जॉर्ज बर्नार्ड शौ बोलला आहेच - “The single biggest problem in communication is the illusion that it has taken place.” 


तथास्तु!