किन्नर
(A story written in year 2011, for a Marathi movie project, which unfortunately, could not materialize)
1
रात्रीची वेळ आहे. एक एक्ष्प्रेस्स ट्रेन सुसाट वेगानी चालली आहे. त्यातल्या 2nd AC च्या डब्या मध्ये एक तरुण जोडप, आनंद आणि सुप्रिया आपल्या मुला सोबत प्रवास करत आहेत. आनंद भावे हा एका MNC Firm मध्ये Manager आहे आणि सुप्रिया एका NGO शी सलग्न असलेल्या शाळेत शिक्षिका आहे. त्यांचा ३ वर्षांचा एकुलता एक पिल्लू "अर्जुन" त्यांचा जीव कि प्राण आहे. अर्जुन हा अतिशय गोंडस आणि हसरा आहे. त्याची मस्ती आवरताना AC मध्ये हि आनंद आणि सुप्रियाला घाम फुटतो.साधारण मध्य रात्रीची वेळ असुनंही अर्जुन टक्क जागा आहे आणि म्हणून त्याचे आई बाबा हि! जेव्हा ट्रेन एका स्टेशन जवळ येते तेव्हा सुप्रियाला घसा कोरडा पडल्याची जाणीव होते. त्यांच्या जवळच्या २-३ पाण्याच्या बाटल्या संपल्या आहेत. ती न राहवून आनंदला स्टेशन वरून एखादी बाटली आणायला सांगते. आनंदला झोप अनावर झाली आहे पण एवढ्या रात्री ट्रेन ची pantry car बंद झाल्यामुळे, त्याला खाली उतरण्या शिवाय पर्याय नसतो! जेव्हा ट्रेन स्टेशन वर ट्रेन थांबते तेव्हा उतरण्या आधी T .C ला तो विचारतो कि गाडी किती वेळ थांबणार आहे. T .C कडून जरा त्र्याग्यानेच उत्तर येते, "फक्त ५ मिनिटं". बाबा स्टेशन वर उतरणार आहे हे अर्जुन ला कसे कळते माहित नाही पण त्याचा बाबा बरोबर स्टेशन वर येण्याचा हट्ट चालू होतो. अर्जुन ला बाबा चा फार लळा असतो आणि आनंदला त्या पिल्ला ला नाही म्हणवत नाही. शेवटी ट्रेन थांल्यावर आनंद, अर्जुन ला कडे वर घेऊन खाली उतरतो.
2
स्टेशन तसं निर्जन असते. स्टेशन वर एकमेव रेल्वे कॅन्टीन असते. कॅन्टीन वाला हि ट्रेन निघण्याच्या प्रतीक्षेत असतो, त्यानी सगळी आवरा-अवर करयला घेतली आहे. १-२ भिकारी कॅन्टीन जवळ उरलं-सुरलं काही मिळेल ह्या अशेनि ओशाळवानेपणी घुटमळत असतात. स्टेशनच्या टोकाला एक तृतीयपंथी त्याचं रात्रीचं जेवण घेत असतो. त्याची पाठमोरी आकृती ह्या जगाशी संपर्क नसल्याची जाणीव करून देत असते. आनंद अर्जुन ला कडेवर घेऊन घाईने रेल्वे कॅन्टीन कडे निघतो. अर्जुन बाबाच्या कडेवर बसून मस्त खुश आहे, त्याचं ते निरागस हास्य बगून त्या घाईतही आनंद त्याचा पटकन मुका घेतो. ते कॅन्टीन जवळ पोचे पर्यंत एका भिकाऱ्याची नजर ह्या गोंडस पिल्ला वर जाते. त्या भिकाऱ्या च्या अवतार वरून तो अट्टल नशेबाज आणि गर्दुल्ला वाटत असतो. अर्जुन कडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य येत. तो भिकारी आता कॅन्टीन आणि आनंद पासून अगदी जवळ येतो. आनंद घाई घाईने २ पाण्या च्या बाटल्या मागतो. त्याच्या शर्ट च्या खिशा मधले पैसे कमी पडतात म्हणून तो अर्जुनला दुसऱ्या हातात धरतो आणि जीन्स च्या खिशातून पाकीट काढतो. आता अर्जुन चा चेहरा भिकाऱ्या समोर येतो. तो भिकारी स्टेशनवर पडलेला chocolate चा रेपर उचलतो आणि एक छोटा दगड त्यात भरून अर्जुन च्या नजरे समोर नाचवतो. अर्जुन त्या भिकाऱ्या कडे बघून पण निरागस हसतो आणि त्याच्या हातातले chocolate घ्यायला झेपावतो. आनंद खिशा मध्ये सुटते ठवत असताना अर्जुन च्या झेपावण्या मुले गर्रकन मागे वळून बघतो आणि एका हातानी बाटल्या सांभाळत त्या भिकाऱ्या वर गरजतो.
3
एका गोंडस मुलाला पळवण्या ची हातातली संधी गेल्या मुळे तो गर्दुल्ला भिकारी अतिशय चिडतो पण आनंदचा मुकाबला करण्याची ताकत त्या कृश शरीरामध्ये नसते त्यामुळे तो मागे हटतो. आनंद अर्जुन आणि बाटल्या सांभाळत ट्रेन च्या दिशेनी घाईने निघतो. तो गर्दुल्ला अजूनही अंतर ठेवून आनंद च्या मागे मागे चालतो आहे. ट्रेन सुरु होते. अर्जुन पळतच compartment कडे निघतो. ट्रेन सुरु झाली आणि आनंद, अर्जुन आले नाहीत ह्या जाणीवे नि आत बसलेली सुप्रिया अस्वस्थ होते आणि लगबगीने compartment च्या दर शी येते. सुप्रिया ला दारात बघून आनंद चा जीव भांड्यामध्ये पडतो. तो तिला अर्जुनला घ्याला सांगतो , ती पटकन पुढे होऊन त्याला घेते आणि आनंद एका हातानि handle पकडतो. सुप्रिया एका हातात अर्जुन ला पकडून आनंदला आत येण्यासाठी दुसरा हात देते. तिची अर्जुन वरची पकड ढिली होते, नेमकी हीच संधी साधून तो गर्दुल्ला त्याच्या शरीरातील सगळी ताकत लावतो आणि अर्जुन च्या हाताला धरून ओढतो. आनंद डब्यात शिरतो आणि त्याच्या पाठीमागून त्याचा अर्जुन त्या भिकाऱ्या च्या हातात जातो. सुप्रिया जोरात ओरडते. आनंदला काय होतंय हे कळायच्या आत गाडी वेग घेते. तो पण त्या भिकाऱ्या कडे बघून रागानी जोरात ओरडतो. डब्यातून उडी मारावी अशी त्याची मनस्थिती होते पण तेवढा बळ एकवटे पर्यंत स्टेशन मागे गेला असतं. पुढे असलेलेया गर्द अंधारात उडी मारायची आनंदची छाती होत नाही.
4
अर्जुन धाय मोकलून रडत असतो. तो गर्दुल्ला त्या गोंडस पिल्लाला शांत करायचा आटोकाट प्रयत्न करत असतो. स्टेशन वर RPF police चं नामोनिशाण नसते. त्या गोंगाटामुळे स्टेशन मास्तर च्या कॅबीन मध्ये खुट्टशी हालचाल होते आणि परत स्टेशन मास्तर निद्रादेवीच्या आधीन झाल्या प्रमाणे हालचाल शांत होते. हि शेवटची ट्रेन असल्याने कॅन्टीनवाला, कॅन्टीन बंद करून निघत असतो, पण सुप्रिया आणि आनंद च्या ओरडण्या मुले त्या कॅन्टीनवाल्या चा लक्ष गर्दुल्ल्या कडे जाते. जवळच असलेल्या भिकाऱ्या च्या समोर कॅन्टीन उघडं ठेवून त्या गर्दुल्ल्या च्या मागे धावावे कि नाही ह्या संभ्रमात तो कॅन्टीनवाला असताना, त्या तृतीय पंथी, "अम्मी" चं पाठमोरं शरीर हलते. त्या पिल्लाला घेऊन धावणाऱ्या गर्दुल्ल्या वर नजर जाताच अम्मी च्या नजरेत अंगार फुलतो.
5
तो गर्दुल्ला धावताना लागणारी धाप आणि रडणारा अर्जुन ह्यांना कसातरी सांभाळत स्टेशन ला लागून असलेल्या झाडा-झुडपात शिरायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचा तोल जातो. तो अर्जुनला सोडतो आणि स्वतःचा तोल सांभाळण्यसाठी झाडाचा आधार घेतो. त्याचे डोळे क्षणभर मिटतात. अचानक अर्जुनच्या रडण्याचा आवाज थांबतो. गर्दुल्ला समोर बघतो आणि त्यची आणि अम्मीची नजर-नजर होते.त्याची नजर थिजते. त्याच्या कृश शरीरा मध्ये एकवटलेली शक्ती आता ओसरते. अम्मी निव्वळ नजरेनी त्या गर्दुल्ल्या ला तिथून निघण्याची खुण करते. तो गर्दुल्ला पाठीमागे धूम ठोकतो.
अर्जुन अम्मी च्या कडेवर असतो. तो आपल्या निरागस नजरेनी अम्मी कडे बघून हसतो. अम्मीचं शरीर कणखर असते पण चेहरा मृदू असतो. वयानी ३०-३५ ची असते. त्या निरागस पिल्लाकडे बघून अम्मीच्या चेहर्यावर मार्दव दाटून येत. अर्जुनला कसा कोण जाणे पण अम्मी च्या हातात अतिशय सुरक्षित वाटते. अर्जुन परत एकदा हसतो आणि अम्मी त्याला आपल्या छातीशी धरून मिठी मारते. अर्जुनहि अम्मीला लागडतो.
6
इथे ट्रेन मध्ये, आनंद धक्क्यातून सावरायचा प्रयत्न करतोय. सुप्रिया आकंठ रडतेय. आनंदचं डोकं बधीर झाले असते. त्या दोघांच्या हालचाली आणि रडण्यामुळे बाकीचे प्रवासी जागे होतात. आनंद हलणाऱ्या गाडीच्या आवेगात, जे घडलं ते सर्व सहप्रवास्यांना सांगतो. त्यातला एक प्रवासी आनंद ला साखळी ओढायला सांगतो, जिथे ट्रेन थांबेल तिथून मागे गेलात तर कदाचित अजूनही त्या गर्दुल्ल्याला पकडू शकाल हि शक्यता आनंदच्या आणि सुप्रियाच्या मनात सुप्त आशा जागृत करते. अर्जुनच्या काळजीने व्याकूळ झालेले दोघं कुठलाही विचार न करता एकत्र ट्रेन ची साखळी ओढतात. ट्रेन हळू हळू थांबते. सोबत असलेल्या सामानाची अजिबात तमा न करता ते दोघं उठतात. एक सहृदय प्रवसी त्यांचा फोन number लिहून घेतो, सामानाची अजिबात काळजी न करण्या बद्दल सांगतो आणि मदत म्हणून स्वतःजवळचे अजून थोडे पैसे देऊ करतो. आनंदला भरून येतं. तो न बोलता त्या प्रवाश्याला हात जोडून नमस्कार करतो आणि ते दोघं थांबलेल्या गाडीतून उतरतात. त्या गच्च अंधारात नजर सावरायला १-२ क्षण जातात. आजूबाजूला किर्र झाडीआहे. एवढ्यात त्यांना एका truckचा आवाज येतो. रस्ता जवळच असल्याचा दोघांना जाणवते. अर्जुन च्या ओढीने त्या दोघांमध्ये एक अनामिक शक्ती संचारते आणि जिथून आवाज आला त्या दिशेनी ते दोघे हि चालायला लागतात.
7
आनंद आणि सुप्रिया आता झरझर रस्त्याच्या अंदाजा नुसार चालत आहेत. मध्य रात्र होऊन गेली आहे. पौर्णिमा असल्याने चंद्रप्रकाश भरपूर आहे. जणू देवानीच त्यांचासाठी प्रकाश योजना केली आहे. साधारण १०-१५ मिनिटं चालल्या वर त्यांना रस्ता सापडतो. आनंदला त्या स्टेशन चे नाव आठवत असते. ते दोघं अतिशय मोठ्यांनी आवाज आणि हातवारे करून येणाऱ्या तुरळक वाहनांना थांबण्याची आर्जव करत असतात. अशा निर्जन ठिकाणी कोणी थांबत नाही. शेवटी २०-२५ मिनिटं गेल्यावर एक टेम्पो येत असतो. दोघंहि शेवटचा उपाय म्हणून रस्त्याच्या मधोमध उभे राहून त्या टेम्पो ला थांबण्याची खुण करतात. टेम्पोवाला वैतागून करकचून ब्रेक मारतो. त्या दोघांनाही जोरदार धाप लागली असते. आनंद त्या टेम्पोवाल्याला सगळी कहाणी थोडक्यात सांगतो. टेम्पोवाला त्या दोघांकडे साशंकपणे पाहत असतो. आनंद त्याला त्याच्या कडचे सगळे पैसे देऊ करतो. त्यांची ती धडपड आणि डोळ्यामधले अश्रू त्यांच्या खरेपणाची साक्ष देत असतात.
शेवटी टेम्पोवाला तयार होतो. टेम्पो मध्ये बसतांना आनंद त्याला स्टेशन ला पोचायला किती वेळ लागेल ह्या बद्दल विचारतो, १ तास लागेल हे ऐकून दोघं जरा अस्वस्थ होतात ते बघून टेम्पोवाला त्यंना तो टेम्पो जेवढा शक्य तेवढ्या लवकर चालवण्याची ग्वाही देतो. ट्रेन नि १५ मिनिटा मध्ये बराच पल्ला गाठल्याचा त्यांना जाणवते. सुप्रिया आनंद ला शक्य तेवढ्या जवळ ओढून बसली आहे. मनातील शंका-कुशंकाचे काहूर थांबता, थांबत नाहीये.
8
रस्ता आता अतिशय निर्जन आहे. अम्मी अर्जुनला कडेवर घेऊन त्याच्याशी गप्पा मारताना, त्याला त्याचा ठाव ठिकाणा विचारते. त्या पिल्ला च्या तोंडून 'आई' 'बाबा' 'गाडी' 'भुर्र' 'ऑफिश' अशी लडिवाळ उत्तर, कानावर पडतात. अम्मी हसून परत अर्जुनला कवटाळते. अम्मीला अर्जुन मनापासून आवडला आहे. तिचा आवाज घोगरट असूनही तिच्या चेहर्या वरील ममत्वा मुळे अर्जुनला तिची भीती वाटत नाही. जेव्हा ती चालत हम स्त्या पर्यंत येते, नकळत पणे तिच्या गावकुसा बाहेरच्या मोहल्ल्या कडे वळते. त्या हम रस्त्याचे एक टोक गावाकडे जाते आणि दुसरे तिच्या मोहल्ल्या कडे. त्या झोपाळलेल्या पिल्ला कडे बघत असताना, तो परत 'बाबा' असा उदगार काढतो. अम्मीला भान येतं तिला जाणवतं कि ह्या पिल्ला वाचून त्याचे आई बाबा फार त्रासात असतिल आणि उलट दिशा पकडून गावा कडे, police स्टेशन ला निघते. आता तिची पावला भर भर पडत आहेत. एका क्षणी तिला हे भान येतं कि ह्याला जवळ बघून कदाचित पोलीस तिच्यावर मुलगा पळवण्याचा आळ आणतील. ती एक क्षण थबकते पण परत मनाचा निर्धार करून पोलीस स्टेशन च्या दिशेनी निघते. अम्मीचं लक्ष आता झोपलेल्या अर्जुन कडे जाते, ह्याला दुर्दैवी घटने ची अजिबात कल्पना नाही ह्या जाणीवेनी तिला भरून येते. ती नकळत पणे त्याच्या गालाचा मुका घेते. तिला त्याचे नाव गाव माहित नसते पण तरीही त्याच्या बद्दल तिला फार आपुलकी वाटायला लागली असते.
9
रात्रीचे साधारण २ वाजले आहेत. आनंद आणि सुप्रियाला, टेम्पोवाला स्टेशन जवळ सोडतो. आनंद घाई-घाईने पण मनापासून त्याचे आभार मानतो आणि त्याला पैसे देऊ करतो. सुप्रिया आणि आनंदच्या जखमेची जाणीव त्याला आतापर्यंत झाली असते. टेम्पोवाला ते पैसे घेत नाही. तो आनंद ला सांगतो कि त्यांना त्यांचा मुलगा नक्की परत मिळेल. आनंद आणि सुप्रिया परत त्याचे मनापासून आभार मानतात. दोघे हि पळतच स्टेशन मास्तर च्या कॅबीन मध्ये शिरतात. स्टेशन मास्तर ला गाढ झोपलेला पाहून आनंद त्रासतो. तो त्याला हलवून उठवतो. स्टेशन मास्तर ओशाळ हसतो. आनंद त्याला घडलेली घटना सांगतो. स्टेशन मास्तर ची झोप आता उडते. तो तोंडावर पाणी मारतो आणि टक्क जागा होतो. त्याला जाणवते कि त्याच्या कडून हलगर्जीपणा झाला आहे, त्याला काही गोंगाट ऐकू आला होता पण त्याने दुर्लक्ष केले होते. तो पटकन पोलीस स्टेशन ला फोन लावतो.
10
रात्रीची साधारण २.१५ ची वेळ. गावातली पोलीस चौकी मध्ये फक्त २ हवालदार आणि १ इन्स्पेक्टर रात्रपाळीला आहेत. त्यातला निव्वळ एक हवालदार अर्ध्या शुद्धी मध्ये आहे. दुसरा हवालदार आणि इन्स्पेक्टर दारूच्या नशेत धुंद होऊन अस्ता-व्यस्त अवस्थेमध्ये आप-आपल्या खुर्चीत पडले आहेत. हवालदारच्या टेबला वर २-४ दारूच्या बाटल्या आणि चिकनची हडक, त्या रात्रीच्या पार्टी ची कहाणी सांगत आहेत. अम्मी पोलीस स्टेशन मधली हि अवस्था पाहून थोडी विचलित होते. आपल्याला ह्या मुला सोबत पाहून, पोलिसांच्या त्या अवस्थे मध्ये काय प्रतिक्रिया असेल ह्याचा अंदाज मनाशी बांधत अम्मी पोलीस स्टेशन मध्ये शिरते. ती दारा जवळ च्या हवालदाराला उठवायचा प्रयत्न करते. तो हवालदार अर्धवट शुद्धी मध्ये त्रासिकपणे अम्मी कडे बघतो. त्याला ती एक सुस्वरूप बाई प्रमाणे दिसते. थोडं अजून नीट बघितल्यावर त्याला अम्मीच्या कडेवर झोपलेलं मुल दिसतं. अम्मी त्याला काहीतरी आर्जव करते आहे असा त्याला जाणवते. त्या अवस्थेमध्ये त्याला फक्त एक 'अबला सु-स्वरूप स्त्री ' अनायसे चालत आपल्या कडे आल्याची ख़ुशी होते. तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिला जवळच्या बाकड्यावर बसायला सांगतो. कसाबसा तोल सावरत तो हवालदार आतल्या खोलीत जातो आणि दुसरया हवालदार आणि इन्स्पेक्टर ला उठवायचा प्रयत्न करतो. दोघे हि अतिशय त्रासिक पणे शिव्या घालत उठतात. तो हवालदार इन्स्पेक्टर च्या कानात बाहेर एक 'आयटम' मदत मागायला आल्याची बातमी सांगतो. इन्स्पेक्टर ची थोडी उतरते. तो डोळे चोळत आणि अडखळत बाहेर येतो. त्याला त्या अवस्थे मध्ये अम्मी मध्ये फक्त एक स्त्री चा शरीर दिसतं. तो तिला वरून खाल पर्यंत नजरेनी मापतो. त्याच्या नजरेची जाणीव अम्मी ला होते ती सावरून उठते आणि इन्स्पेक्टरला नमस्कार करते. तिने बाकड्यावर झोपवलेल्या मुला कडे इन्स्पेक्टर ची नजर जाते. इतक्यात दुसरया हवालदारच्या टेबल वरचा फोन खाणाणतो. त्या निरव शांतते मध्ये ती बेल कर्कश्य वाटते. इन्स्पेक्टर दुसरया हवालदारा वर खेकसून त्याला फोन घ्यायला सांगतो. हवालदार घाई-घाईने फोन घेतो. स्टेशन मास्तर चा फोन असतो. एका गर्दुल्ल्या नि लहान मुलाला पळवल्या बद्दल तो सांगतो आणि कोणी अशी तक्रार किंवा संशयित सापडल्या बद्दल विचारणा करतो. हवालदार माउथपीस वर हाथ ठेवून स्टेशन मास्तरच बोलण तिथूनच इन्स्पेक्टरच्य कानावर घालतो. हवालदाराचे बोलणे अम्मी च्या काना वर पडते. इन्स्पेक्टरच सगळं लक्ष अम्मी वर असते. हवालदाराचे बोलणं क़िकुन अम्मी काही सांगणार इतक्यात एका हातानी अम्मीला थांबण्याची खुण करत आणि त्रासिक चेहऱ्यांनी मागे बघत तो उत्तरतो कि तो नंतर फोनवरून FIR लिहून शोध घेईल. हवालदार निरोप स्टेशन मास्तरला देतो आणि फोन ठेवतो. इन्स्पेक्टर नि तिचा न ऐकून घेतल्या बद्दल अम्मीला राग येतो. तरीही स्वतःवर ताबा ठेवत ती परत काही सांगायचा प्रयत्न करते. ह्या वेळी मात्र इन्स्पेक्टर सरळ तिचा हात धरतो. हाताच्या स्पर्शावरून अम्मी 'स्त्री' नसल्याचे इन्स्पेक्टरला जाणवते, त्याची नजर बदलते. तो घोगऱ्या आवाजात विचारतो "तू कोठी है क्या" ?. अम्मीचे लक्ष आता इन्स्पेक्टरच्या तारवटलेल्या नजरे कडे जाते आणि तिच्या चेहऱ्या वरचे भाव बदलतात. आता दोन्ही हवालदार पण बाहेर आलेले असतात. त्यांच्या नजरे मध्ये तिला त्यांची नियत दिसते आणि ती अजून सावध होते. जवळ सरकणारे हवालदार आणि इन्स्पेक्टर कडे पाहताना आता नरमाईने काम होणार नाही हे अम्मीला जाणवते. तिचे लक्ष बाकड्यावर शांतपणे झोपलेल्या पिल्ला कडे जाते. इन्स्पेक्टर क्रूर पणे हसतो. अम्मी मध्ये आता अनामिक शक्ती संचारते आणि स्वताच्या पिल्लाला वाचवायला निघालेल्या वाघिणी प्रमाणे आता ती चवताळून अचानक पणे अर्ध-शुद्धीत असलेल्या हवालदार आणि इन्स्पेक्टर वर हल्ला करते. त्या अचानक हल्ल्यानि बेसावध असलेले तिघे मागे सरकतात. नेमक्या त्याच संधीचा फायदा घेत अम्मी बाकड्या वरच्या मुलाला उचलते आणि पोलीस स्टेशन मधून पळ काढते. बाहेर निघताना इन्स्पेक्टर अम्मी चा पाय पकडण्याचा प्रयत्न करतो. अम्मी त्याच्या पेकाटात एक जोरदार लाथ मारून तिथून जीवाच्या आकांतानी पळ काढते. पळत असताना तिला मागून कळवळून जोरात ओरडणाऱ्या इन्स्पेक्टर चा आवाज येतो - "थांब हरामी! तुला आत घेतो. पोरगा पळवतेस काय?"
11
इथे स्टेशन मास्तर आनंद आणि सुप्रियाला हवालदाराचा निरोप सांगतो. आनंद आणि सुप्रिया आता चिडतात आणि त्राग्यानीच पोलीस स्टेशनचा रस्ता विचारतात. स्टेशन मास्तर रस्ता सांगतो आणि मनातल्या अपराधी भावने पोटी, आपली सायकल देऊ करतो. त्या वेळेला कुठलेही वाहन मिळणार नाही हे लक्षात येऊन आनंद आणि सुप्रिया त्याचे वरवरचे आभार मानून लगेच पोलीस स्टेशन ला निघतात.
12
साधारण २.३० ची वेळ असते. अम्मी अर्जुनला कडेवर घेऊन जीवाच्या आकांतानी जिथे रस्ता मिळेल तिथे धावत असते. अखेर तिला तिच्या मोहल्ल्या कडे जाणारा रस्ता सापडतो. ती श्वास घ्याला जरा उसंत घेते. पण जे काही पोलीस स्टेशन मध्ये घडले ते आठवताच, तिने इन्स्पेक्टर ला निव्वळ शाररीक नाही तर त्याचा पुरुषी अहंकारहि ठोकरल्याची जाणीव होते आणि अम्मीला पोलिसांच्या भयाण शिक्षेची भीती वाटते. ती परत बळ एकवटून मोहल्ल्या कडे धावत सुटते.
13
आनंद आणि सुप्रिया डबलसीट वरून पोलीस स्टेशन मध्ये पोचतात. सायकल कशी बशी भिंतीला लाऊन ते दोघा पोलीस स्टेशनात घाईने शिरतात. आता सगळे शुद्धी वर आलेले असतात. इन्स्पेक्टर जीप काढून अम्मीच्या मागावर जाण्याच्या विचारात असताना अनपेक्षित पणे आलेले आनंद आणि सुप्रिया त्याला अडथळ्या प्रमाणे वाटतात. तो त्रासिक पणे त्यांना येण्या मागचे कारण विचारतो. आनंद सर्व हकीकत व्याकूळ पणे सांगतो. इन्स्पेक्टर ला आता अम्मी नक्की काय सांगत होती ह्याचा अंदाज लागतो आणि त्याला स्वतःच्या उणीवेची जाणीव होते तो एक क्षण खजील होतो पण चेहरा वरचे भाव न बदलता एका हवालदाराला FIR लिहून घ्यालला सांगतो. इन्स्पेक्टर आता पूर्ण शुद्धी वर असतो. तो ताबडतोब एका हवालदाराला सोबत घेऊन अम्मी च्या मागावर निघतो. निघताना आनंद आणि सुप्रियाला लवकरच धागा-दोरा मिळेल असे आश्वासन देऊन जातो. त्या निव्वळ शब्दांनीही, आता पर्यंत धावपळीत सापडलेल्या सुप्रियाला भरून येते. इन्स्पेक्टर आनंद कडे आश्वासक नजर टाकून, हवालदारा बरोबर बाहेर पडतो.
14
अम्मी आता तिच्या मोहल्ल्या कडे पोचते. तिचा गुरु आणि प्रमुख उस्मान तिला दुरूनच धावत येताना बघतो. तो काळजीने अजून १-२ तृतीयपंथीना जागे करतो आणि त्यांना अम्मी चं दिशेनी पाठवतो. अम्मी आता अतिशय दमली आहे. समोरून येणाऱ्या चंदा आणि कमला ला बघून अम्मी मध्ये जीव येतो. ती त्यांच्या हातात अर्जुनला देते आणि आता धावण्या ऐवजी लगबगीने चालतच तिघी त्यांच्या झोपडी च्या दिशेनी निघतात. अर्जुन त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पासून अनाभिद्ना असतो. तो शांत पणे झोपला आहे. झोपडी मध्ये शिरल्यावर, उस्मान मुलाच्या निरागस चेहऱ्याकडे बघतो. उस्मान ला फार आनंद होतो. त्याला वाटते कि अम्मी ने त्यांच्या कळपा साठी एक नवीन सभासद आणला आहे! उस्मान मनो-मन अम्मीला आशीर्वाद देतो. अम्मी कळवळीने सर्व घटनाक्रम सांगते. त्या निष्पाप पिल्लाचं नावही आपल्याला माहित नाही हे अम्मी सांगते. अम्मीच्या बोलण्या वरून उसमान ला अंदाज येतो कि अम्मी मुला मध्ये एका आई प्रमाणे गुंतली आहे पण तो चेहऱ्यावरचे भाव बदलत नाही. अम्मी फार आशेनि उस्मान कडे बघते. पोलिसांच्या भीतीने उस्मान अम्मीला लवकर गाव सोडून जाण्यास सांगतो. चंदा बरोबर असेल तर अम्मिचा ठाव ठिकाणा आपल्याला कळेल ह्या विश्वासानी, उस्मान खुणेनीच चंदाला अम्मी बरोबर जाण्यास सांगतो. चंदा हि उस्मान च्या फार जवळची असते. त्यामुळे ती नक्की अम्मी आणि पर्यायानी मुलावर लक्ष देईल हे उस्मानला माहित असते. गावातून जरा बाहेर असलेल्या पडक्या हवेली मध्ये २-३ तास थांबून पहिल्या एस-टी ने गावाबाहेर जाण्याची आज्ञा उस्मान देतो. निघताना अम्मी उस्मानच्या पाया पडते. त्या झोपडीत दबक्या आवाजात जयघोष होतो - "बहुचरा माता कि जय!" आणि अम्मी, अर्जुन आणि चंदा बरोबर निघते.
15
इन्स्पेक्टर आणि हवालदार उस्मान च्या झोपडी मध्ये पोहचतात. ते अतिशय गुर्मी मध्ये उस्मान आणि कमलाची उलट तपासणी सुरु करतात. उस्माननी जर अम्मी बद्दल माहिती दिली नाही तर दोघांनाही कोठडी मध्ये डांबण्याची भीती दाखवूनहि उस्मान बधत नाही. ते पाहून इन्स्पेक्टरचा पार चढतो. हवालदार झोपडी बाहेर जाऊन थांबतो. इन्स्पेक्टर आत अर्वाच्च्य शिव्या घालत दोघांना लाथा-बुक्क्यानि मारहाण करतो. शेवटी झोपडी मधून येणारा आक्रोश थांबतो, इन्स्पेक्टर अस्ताव्यस्त होऊन बाहेर येतो आणि घाईने जीप कडे निघतो. हवालदार धावतच चालू झालेल्या जीप मध्ये बसतो. जीप गावाबाहेरील पडक्या हवेली वरून थोडी पुढे जाते आणि परत रिवर्स घेऊन मागे येते.
अतिशय निरव शांतता असते.
16
इन्स्पेक्टर कसला तरी मागोवा घेण्यासाठी जीप मधून सावध खाली उतरतो. हेवेलीच्या आत लपलेल्या अम्मी आणि चंदा जीपच्या आवाजानी सावध झालेले आहेत. त्यांचा श्वास शक्य तितक्या मंद गतीने सुरु आहे. त्यांना फक्त एकाच काळजी आहे ती अर्जुन च्या जागे होण्याची. तो जरा जागा झाला तर त्याच्या आवाजानी ते पकडले जातील ह्या रास्त भीतीने अम्मी अर्जुनला छातीशी धरून बसली आहे. इन्स्पेक्टर आणि हवालदार अजून काही क्षण चाहूल घेण्या साठी रस्त्यावर थांबतात आणि काहीच चाहूल न लागल्यानी जीप ने पुढे जातात. अम्मी आणि चंदा मनोमन भगवान शंकराचे आभार मानत सुटकेचा निश्वास सोडतात. अम्मी शांत झोपलेल्या अर्जुनचा मुका घेते.
17
अर्जुन हरवल्याला आता दोन दिवस उलटून गेले आहेत. अथक मागोव्या नंतरही अर्जुनचा कुठलाच मागमूस न लागल्याने आनंद आणि सुप्रिया त्यांच्या घरी परत आले आहेत. त्यांचे सांत्वन करायला त्यांचे अनेक वर्षांचे मित्र, नाडकर्णी आणि केळकर कुटुंबीय आले आहेत. आनंद विमनस्क अवस्थे मध्ये घडलेली घटना सांगत असताना, सुप्रिया मात्र जणू दगड झाली आहे. तिच्या निर्विकार चेहऱ्यावर कुठलेच भाव नाहीयेत. एवढ्यात खाली बिल्डिंग च्या आवारात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा गोंगाट ऐकू येतो. त्यातला तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुलकर्ण्यांचा मुलगा खालून त्याच्या आईला साद घालतो - "आई...ए...आई....". आत्ता पर्यंत गोठलेली सुप्रिया गदगदते. नाडकर्णी आणि केळकर कुटुंबियांचे सांत्वनाचे प्रयत्न असफल ठरतात आणि तिच्या हुंदक्यांना एका आक्रोशाची तीव्रता येते. अर्जुन ह्या क्षणी आपल्या बरोबर नाही ह्या जाणीवेनि आता दोघांमध्ये हि हतबलता येते. आनंद आणि सुप्रिया मनोमन अर्जुनच्या सुखरूप असण्याची प्रार्थना गणेशाकडे करताना आनंदनि धरून ठेवलेला समजूतपणा चा बांधहि आता फुटतो.
18
कुठल्याशा गावात एका झोपडीवजा घराच्या मागच्या अंगणात बसून अम्मी अर्जुन बरोबर खेळते आहे. अर्जुन चा खोडसाळपणानि अम्मी मोहून गेली आहे. चंदा एकीकडे उस्मानच्या चिंतेनी ग्रस्त आहे. शेवटी न राहवून ती अम्मीला अर्जुन बद्दल पुढे काय विचार आहे हे विचारते. अम्मी अतिशय मायेनी अर्जुन कडे बघत सांगते कि 'ह्या नाव-गाव माहित नसलेल्या पिल्लाच्या आई-बाबांना शोधून त्यांच्या कडे अर्जुनला सुखरूप पोचवणे' हेच आपले कर्तव्य असल्याचे सांगते. अम्मी च्या तोंडून 'आई-बाबां' हे शब्द कवर पडल्यावर अर्जुन अम्मीकडे हसून बघत बोबड्या भाषेत 'ई...बाब्बा ' साद घालतो. अम्मी ला त्या अजाण पिल्ला बद्दल कणव वाटते आणि ती त्याला घट्ट छातीशी लावून धरते. चंदाला अम्मीचा विचार पटला नसला तरी कितीही कोरडेपणाचा प्रयत्न केला तरी ती सुद्धा त्या इवल्याशा जीवावर माया करायला लागली आहे. चंदाला उस्मानच्या नाराज चेहऱ्याची आठवण होते आणि ती अम्मीला, मुलाला त्यांच्याच कळपामध्ये सामील करून घेणा कसा योग्य आहे ते समजवायचा प्रयत्न करते. अम्मी मात्र तिच्या निर्धारावर ठाम आहे. तृतीयपंथी असलो तरी आपल्या समाजातही नैतिकता आहे आणि त्यानुसार अर्जुनला त्याच्या पालकां पर्यंत पोचवणे हेच योग्य आणि मुलाच्या हिताचे आहे हे अम्मी चे विचार पटत असूनही उस्मानच्या रागाबद्दल चंदाला भीती वाटत असते. एवढ्यात तिथे उस्मान, कमला बरोबर येतो. अम्मी आणि चंदा अचानक आलेल्या उस्मान मुले एकदम गप्प होतात. त्याने अम्मीचे विचार बाहेरूनच ऐकले आहेत, तरीही तो अजिबात न रागावता प्रेमाने अम्मी आणि चंदा शी बोलतो. अर्जुनला कडेवर घेत, त्याला अम्मिकडे सोपवण्यात दैवगती कशी आहे आणि म्हणूनच अर्जुननी त्यांच्याच जमाती मध्ये वाढावे हा देवा चा संकेत असल्याचा सांगतो. अम्मी ला उस्मानचा विचार अजिबात पटत नाही, ती प्रथमच उस्मानला उघडपणे विरोध करते. अम्मी आणि उस्मान मध्ये कडाक्याचे भांडण होते. शेवटी जेव्हा अर्जुन येऊन अम्मीला लगाडतो तेव्हा उस्मान नाईलाजाने माघार घेऊन झोपडी बाहेर पडतो.
19
आता अम्मीला अर्जुन सापडून १५-२० दिवस झाले आहेत. हा मुलगा हिंदू धर्माचा आहे हे आत्तापर्यंत सगळ्यांना जाणवले आहे. उस्मान त्याला 'पोट्ट्या' बोलवतो हे अम्मीला पसंत पडत नाही. शेवटी ती अर्जुनचं नाव बदलून
शंकर ठेवूया असा प्रस्ताव सगळ्यान समोर ठेवते. उस्मान सकट सगळे शिवाला मानत असल्याने ते अम्मीला मानेनीच दुजोरा देतात. अम्मी प्रेमानी शंकरला उचलून घेत असताना बघून, उस्मान शेजारी बसलेल्या चंदाच्या कानात कुजबुजतो "ह्या शिवाला लवकरच शिवानी बनवायला हवं!'
20
अर्जुन ला शंकर बनून आता २-३ वर्ष उलटली आहेत. शंकर आता ६ वर्षाचा आहे. ज्या दिवशी तो सापडला त्या दिवशी अम्मी त्याचा वाढदिवस नेमानी साजरा करायची. त्याला आपल्या तृतीय पंथी असल्याची जाणीव होऊ नये ह्या साठी शंकर सकाळी उठायच्या आधीच स्वतःची सगळी आन्हिक उरकून घ्यायची. उस्मानच्या मागे लागून मोहल्ल्या मध्ये सर्वात शेवटच, छोटी पण स्वतंत्र खोली अम्मी ने मिळवली असते. शंकरला त्याच्या आजू-बाजूला असलेल्या तृतीय पंथी विषयी कसलीच न्यून भावना नसते. त्याला हे साडीतले पुरुष, बघायची त्याला सवय झालेली असते. "अम्मी आपल्याला बाकीच्या आयां प्रमाणे घेऊन बाहेर कुठे फिरायला का जात नाही? अम्मी दिवस भर का झोपून असते? तरी रात्री कुठे जाते?" हे प्रश्न त्याच्या इवल्याशा जीवाला फार छळायचे.
21
शंकर आता जवळच्या सरकारी शाळेत जायला लागतो. शाळेत त्याचं नाव लागतं - ' शंकर जनार्दन शिखंडे'. हा जनार्दन कोण? आपला बाप असेल तर कुठे दिसत कसा नाही? असे अनेक प्रश्न नेहमी प्रमाणे मनांतच ठेवून शंकर मन लावून शिकायला लागतो.त्याचे आता मोहल्ल्याच्या मागे असलेल्या वस्तीत काही मित्र झाले होते. पण त्या पैकी कोणाचेच आई-बाप जिवंत नव्हते. ज्यांचे आई-बाबां आहेत अशी मुलं आपल्या बरोबर मैत्री तर दूरच, साधं बोलायलाही का तयार नसतात हे त्याला कधी कळायचे नाही.
22
आनंद आणि सुप्रिया जरी आपल्या जगात पूर्ववत रुजू झाले असले तरी दोघांच्या मनातून अर्जुनच्या शोधाचा ध्यास अजूनही गेलेला नाहीये. अर्जुनच्या हरवण्यामागे कुठेतरी आपण जबाबदार आहोत हि खंत दोघांचीही मानसिक शांतता विस्कटून टाकते आहे. त्या दोघांमध्ये आता एक अनामिक दुरावा आला आहे. एकमेकाच्या सानिध्यात जवळ तर नाहीच साधी नजरभेटहि दुर्मिळ झाली आहे.
दर वर्षी अर्जुनच्या वाढ दिवसाला ते त्याचा लहानपणीचा फोटो -'अर्जुन आनंद भावे'. नावानी प्रसिद्ध करत. फक्त एकाच आशेनी कि कधीतरी कोणीतरी त्यांना अर्जुन बद्दल काही चांगली बातमी देईल.
23
एके रात्री शंकर आपल्या वस्ती मध्ये खूप साऱ्या 'साडीतल्या पुरुषांना' बघतो. ते एका नाजूक पुरुषाला धरून एका मंदिर वजा खोलीत जातात आणि दार लावून घेतात. थोड्या वेळानी बाहेर येताना तो मगासचा पुरुष आता 'साडीतली स्त्री' बनून बाहेर येतो आणि बाहेर सगळे आनंद साजरा करतात. कोणीतरी कोणाच्या नारी कानात बोलतं, "निर्वाणा नंतर आशा किती सुंदर दिसते आहे नं?". शंकर खोलीच्या दारा आडून हा प्रकार अचंबितपणे बघत असतो. नेहमी रात्री बाहेर जाणारी अम्मी आज चक्क आनंदात आणि वस्तीतच आहे. तिचं लक्ष अर्जुन कडे जाते ती खुणेनीच त्याला झोपायला सांगते. शंकर अलगद पणे खोलीचा दार लावून घेतो.
24
शंकर आता मोठा होतो आहे. त्याला 'साडीतल्या पुरुषांची' भीती वाटत नसली तरी कुतूहल नक्कीच असते. त्याच्या मानत नेहमी प्रश्न पडायचा कि इथले पुरुष साडी का घालतात? काही लोक अचकट विचकट अंगविक्षेप का करतात? सिग्नल वर गाडी थांबली कि मोहल्ल्यातले हे सर्वजण गाडीव्ल्ल्या कडून पैसे का गोळा करतात? उस्मान कधीतरी दाढी करतो पण शर्ट-पेंट का घालत नाही? असे असंख्य प्रश्न त्याच्या डोळ्यात दिसायचे पण अम्मीशी बोलायची हिम्मत होत नाही.
25
शंकरला चार दिवस ताप आला आहे. ह्या चार दिवसात अम्मी त्याला सोडून कुठेच जात नाही. अगदी रात्री सुद्धा. चौथ्या रात्री अम्मीच्या खोलीचं दार कोणीतरी जोरात वाजवतं. अम्मी घाईने दरवाजा उघडून बाहेर जाते आणि दार बाहेरून लावून घेते. तरी सुद्धा जाग आलेल्या शंकरच्या कानावर बाहेरचे बोलणं पडत राहते. बाहेर एक मध्यम वयीन पुरुष दारूच्या नशेत पुरुष अम्मीला ‘गेले चार दिवस का नाही आलीस?’ म्हणून अर्वाच्च्य शिव्या घालत असतो. अम्मी त्याला आर्जव करून सांगते कि शंकरची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती घरीच राहिली. त्यावर तो आणखीनच चिडतो. त्यांच्या संभाषणा वरून शंकरला कळतं कि शाळेत बापाचं म्हणून ज्याचं नाव लावतो, तो हाच 'पुरुष' आहे. अम्मीने त्याच्या नावाच्या बदल्यात, त्याचाशी संग करण्याचा व्यवहार केला आहे आणि म्हणूनच ती जेव्हा तो बोलवेल, त्या रात्री घराबाहेर जाते. जनार्दन च्या अर्वाच्च्य तोंडातून अम्मी एक तृतीय पंथी असल्याचे ऐकून शंकर सैर-भर होतो बाहेर जाऊन अम्मीला त्या राक्षसा पासून सोडवावं असा मनात येतं पण तो बाहेर भांडण सोडवायला आलेल्या उस्मान आणि चंदाचा आवाज ऐकतो आणि तसाच पांघरूण डोक्या पर्यंत घट्ट ओढून झोपून जातो.
26
शंकरच्या सातव्या वाढदिवशी सगळी निजा-नीज झाल्यावर, उस्मान परत एकदा अम्मीला शंकरच्या 'निर्वाणा' बद्दल सुचवतो. वेळात 'निर्वाण' झाले तर त्याला मोठेपणी त्रास होणार नाही असा समजुतीचा सूर उस्मान अम्मी कडे लावतो.
27
अम्मीने शंकरला तळ हातावरच्या फोडा प्रमाणे जपले आहे. तिला हा विचारच पटत नाही. ती उस्मानला परत एकदा ठणकावून सांगते कि ती शंकरला एक सामान्य बालपण आणि पौरुष देणार आहे. उस्मानच्या कळपातील अम्मी हे चलनी नाणे असते त्यामुळे तिने नाही म्हणूनही उस्मान मनातून चडफडत खोली बाहेर जातो.
28
उस्मान चिडून त्याच्या खोलीमध्ये येतो. चंदाला अम्मीच्या हट्टाबद्दल सांगतो. इतक्यात त्यांच्या गल्लीचा दादा इरफान, उस्मानच्या खोलीत त्याच्या गुंडांबरोबर शिरतो. त्याला एका विकृत श्रीमंताची भूक भागवण्यासाठी एका कोवळ्या 'तृतीय पंथी' ची गरज असते. त्यासाठी तो 'मुह मांगी' किंमत द्यायला तयार असतो. उस्मानच्या डोक्यात शंकरचा विचार येतो. तो चंदाला त्याच्या डोळ्यात दिसतो.चंदा डोळ्यानीच नाही म्हणते पण उस्मानला शंकरचा 'निर्वाणा' चा मार्ग सुकर करण्या साठी हा उपचार योग्य वाटतो. तो इरफानला अजून १-२ तासांनी यायला सांगतो आणि चंदाला त्यांच्या २-३ तृतीयपंथीना बोलवायला सांगतो.
29
शंकर झोपला आहे ह्याची खातरजमा करून अम्मी जनार्दन कडे जायला निघते. दाराला बाहेरून कुलूप लावते. उस्मान कडे त्याच्या सर्व मोहल्ल्यातल्या खोल्यांची चावी असते. उस्मान ची लोकं, हळूच खोलीत शिरतात. झोपलेल्या शंकरच्या तोंडावर रजनी हाथ दाबते आणि लोकं त्याला उचलतात आणि खोलीच्या बाहेर न्यायला निघतात. शंकर गुदमरून जागा होतो. त्याचे हात-पाय झाडायचे प्रयत्न चालू होतात.शेवटी ज्यांनी तोंडावर हात दाबला आहे त्याच्या हाताला तो करकचून चावतो. त्या अनपेक्षित घटनेनी रजनी किंचाळते आणि पाठोपाठ तोंड मोकळा झालेला शंकर जोरात ओरडतो 'अम्मी SSS ..' . एवढ्यात रजनी शंकरचे तोंड दुसऱ्या हातानी बंद करते. गल्लीच्या तोंडाशी पोचलेली अम्मी शंकरचा आवाज ऐकून तिथेच थबकते आणि मागे वळून परत खोलीच्या दिशेनि धावायला सुरवात करते. तिला दुरूनच शंकरला जबरदस्ती उस्मानच्या खोलीकडे घेऊन जाणारे टोळकं दिसतं. जवळच धंदा बंद करून परत जाणाऱ्या नारळ पाणी वाल्याच्या गाडीवरचा कोयता हातात घेऊन अम्मी त्वेषानी उस्मानच्या खोलीमध्ये घुसते.
30
अम्मीचा हातात कोयता घेतलेला रुद्रावतार बघून, उस्मान सकट सगळे हबकतात. अम्मी कोयता उगारून उस्मान आणि त्याच्या लोकांना मजबूत दम देते - "परत जर कोणी माझ्या मुला कडे वाकड्या नजरेनी बघाल तर एकेकाचे हात पाय तोडून टाकेन!". अम्मी उस्मानला आठवण करून देते कि त्यांच्या प्रथेप्रमाणे कोणावरही जबरदस्ती करायची परवानगी नाही. शंकर हा कोणाची तरी अमानत समजून अम्मी सांभाळते आहे आणि एक दिवस त्याच्या खऱ्या आई-बाबां कडे त्याला सुखरूप सोपवणे हेच तिचे कर्तव्य आहे. अम्मी तृतीय पंथी असल्याचे कळल्या पासून शंकर ला अम्मी बद्दल एक तेढ असते. मात्र अम्मीच्या ह्या बोलण्या नंतर तो अम्मी कडे वेगळ्या दृष्टीने आणि विश्वसनी पाहतो. त्याला जाणवते कि अम्मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते.
अम्मी कोयता उगरातच शंकरला आणि उस्मानकडची तिच्या खोलीची चावी देखील ताब्यात घेते. तिच्या निर्धारापुढे कोणाचे काही चालत नाही.
उस्मान अम्मीला रागानी उलट विचारतो कि - अम्मी ने आत्तापर्यंत त्याच्या आई-बाबांना परत करण्या साठी काय प्रयत्न केला? आणि ह्या तृतीय पंथी कडे मीठ खाल्लेल्या पोराला आता परत त्याचा समाज स्वीकार करेल का? अम्मीने पोलिसांच्या भीतीने इतकी वर्ष शंकरच्या आई-बाबांचा शोध घेतला नसतो. मात्र अम्मीला जाणीव होते कि ह्या पुढे ह्या मोहल्ल्या मध्ये ते राहिले तर शंकर वर सतत उस्मानची वाईट नजर असेल. ती त्यांचा मोहल्ला सोडायचा मनोमन निर्णय घेते.
उस्मान अम्मीला शंकर सकट मोहल्ला सोडून जायचा आदेश देतो. ते अम्मीच्या मनाप्रमाणेच होते.
31
पहाट होते. अम्मी तिच्या खोलीत सावधपणेच झोपली असते. तिला नेहमी प्रमाणे पहाटे जाग येते. अम्मी मोहल्ला सोडण्याचा निर्णय तर घेते पण - पुढे कुठे जायचे? शंकरच्या खाण्या-पिण्याचे काय? त्याच्या शाळेचे काय? हे प्रश्न तिच्या मनात घुमत असतात. तिला फक्त एकाच नाव सुचतं - जनार्दन. ती त्याला फोन करायला केमिस्ट च्या दुकानात जाते. जाताना कुलूप आवर्जून लावते. अजून मोहल्ल्याला तशी जाग आलेली नाही. अम्मी जनार्दनला फोन लावते. जनार्दन, अम्मीचा एवढ्या पहाटे आणि तेही घरी फोन आला म्हणून त्रासिकपणे बोलतो. अम्मी त्याला सगळा सांगायचा प्रयत्न करते पण त्याच्या बोलण्या वरून अम्मीला कळतं कि उस्माननी त्याला अगोदरच अम्मीला मदत न करण्या साठी धमकावले आहे. जनार्दन नेहमी प्रमाणे तिला फोन वरही अर्वाच्य शिव्या देतो आणि परत फोन न करण्याचे सांगतो आणि फोन आदळतो. अम्मीचा चेहरा आता एक प्रश्नचिन्ह बनून राहतो.
32
उस्मान मध्ये माणुसकी जिवंत असल्याने तो अम्मीला, शंकरला घेऊन जायला अडकाठी करत नाही. अम्मी मोहल्ला सोडून शहरात येते. बरोबर शंकर आणि जेमतेम १५ दिवस पुरेल इतकी रक्कम. ज्या स्टेशनवर अम्मी उतरते त्याच्या समोरच्या स्टेशनवर आनंद first class चा डबा पकडायला उभा असतो. आनंद आता मध्यमवयीन झाला आहे. चष्मा लागला आहे. ते तिघेही एकमेकां बद्दल अजाण असतात त्यामुळे थोड्या अंतरवर येऊनही, त्यांची भेट होणे नियतीला अजून तरी मान्य नसते.
मध्यंतर
33
अम्मी ने उस्मान च्या तोंडून चित्राक्षी बद्दल खूप ऐकले असते. चित्राक्षी स्वतः तृतीयपंथी असूनही B.COM पर्यंत शिकलेली. चांगली इंग्लिश बोलणारी 'मद्दाम' म्हणूनच चित्राक्षीचा उल्लेख उस्मानच्या कळपात होत असे. चित्राक्षी ह्याच शहरात असल्याचे अम्मीला ठावूक असते. तिचा पत्ता अम्मीने एका समारंभात चित्राक्षी कडूनच घेतलेला असतो. आता अम्मी साठी तीच एकमेव आशेचा बिंदू असते. अम्मी पत्ता शोधत दुपारी चित्राक्षी कडे पोचते. चित्राक्षी एका झोपडपट्टी मध्ये राहत असते. ह्या पेक्षा आपली गावकुसा बाहेरीची पण स्वच्छ वस्ती चांगली होती असा विचार अम्मीच्या मनात येऊन जातो.
चित्राक्षी अम्मी आणि शंकरला बघून चकित होते पण दोघांनाही खोलीमध्ये घेते. अम्मी तिला सगळी हकीकत सांगते. चित्राक्षीला अम्मीची तळमळ खरी असल्याचे जाणवते. ती अम्मीला मदत करायची ठरवते. चित्राक्षी शंकरला खोली मधेच थांबायला सांगून अम्मीला तिच्या गुरुकडे घेऊन जाते.
34
त्या रात्री शंकर निजल्यावर, चित्राक्षी तिचे मन अम्मी कडे मोकळं करते. ती अम्मीला सांगते कि साधारण कौलेज संपे पर्यंत तिला स्वतःच्या प्रवृत्ती बद्दल जाणीव झाली होती, मात्र घरी बाबांना घाबरून कोणालाच सांगितले नव्हते. शिक्षण संपल्यावर जेव्हा ती काम मागायला एका कंपनी मध्ये गेली होती तेव्हा काम पण मिळाले. तिला मिळालेल्या आर्थिक स्वातंत्र्या नंतर ती कामा जवळ घर असावे हि सबब करून एकटी राहू लागली. हळू हळू तिची भीड चेपल्यावर एके दिवशी ती ऑफिस ला साडी घालून गेली. त्या दिवशी तिच्या ऑफिस मध्ये गहजब झाला. तिने तिच्या ऑफिसरला एक प्रश्न विचारला होता कि - "काल परवा पर्यंत शर्ट- पेंट घालत होते, तेव्हा कोणीही माझं अस्तित्व नाकारलं नव्हते, मग आज साडी घालून आले म्हणुन मी माणूस नाही राहिले? कि काम करण्यामध्ये काही चूक झाली? मला शर्ट- पेंट घालण्याची सक्ती का?" ऑफिसर निरुत्तर होता पण घरी गेल्यावर बाबांनी दिलेल्या माराची कळ अजूनही तिच्या मनाला बोचत होती. त्या नंतर तिच्या बाबांनी तिला घरापासून तोडून टाकले. अम्मी चित्राक्षीच्या कहाणी मध्ये रंगून गेलेली असताना, ती अम्मीला शरीरविक्रीय आणि समारंभात नाचण्या व्यतिरिक्त, तिला काय काय काम येत असा अनपेक्षित प्रश्न विचारते. अम्मी भानावर येत, तिला चांगलं शिवणकाम येत असल्याचे सांगते. चित्राक्षी खिन्नपणे विचारते – “फाटक नशीब सुद्धा शिवू शकतेस का?” अम्मी कडे निव्वळ खोटं हसण्या व्यतिरिक्त उपाय नसतो.
35
दुसऱ्या दिवशी चित्राक्षी अम्मी ला एका संस्थेमध्ये घेऊन जाते. हि संस्था खास करून तृतीय पंथीच्या उत्थाना साठी काम करत असते. वेगवेगळे नैपुण्य असलेल्या तृतीय पंथी कडून त्यांच्या योग्यते नुसार काम करवून घेत त्या प्रमाणात मोबदला देण्याचे काम हि संस्था करत असते. चित्राक्षी स्वतः इथे ब्युटीशिअनच काम करत असते. अम्मी ला उत्तम कपडे शिवता येत असतात. तिचं हे नैपुण्य हेरून तिला एक शिवणयंत्र दिले जाते. सुरवातीला १-२ महिने अम्मीला शिवणकामाचे मार्गदर्शन मिळते. अम्मीला जगण्याचे एक साधन मिळते. चित्राक्षी च्या रूपाने अम्मीला आणि पर्यायानी शंकरला जणू नवे आयुष्य मिळते. तरी सुद्धा समाजा मध्ये मोकळेपणानि उठण्या-बसण्याचे धैर्य अजूनही अम्मीच्या ठायी नसते. शंकरला हळू-हळू अम्मी बद्दल वाटणारी तेढ कमी होत जाते. काही महिन्यांनी अम्मी छोटी पण स्वतंत्र खोली घेते. शंकरची आपल्या बरोबर फरफट नको ह्या हेतूने, संस्थेच्या संचालकांशी शंकर बद्दल बोलते. ते अतिशय अस्थेनी भेटून शंकरची विचारपूस करतात. त्यांच्या ओळखीच्या NGO शाळे मध्ये ते स्वतः शंकरला शाळेत घेऊन जातात. त्या शाळेची मुख्याधापिका असते, सुप्रिया. ती जेव्हा पहिल्यांदा शंकरला पाहते तेव्हा तिला त्याच्या बद्दल एक अनामिक आस्था वाटते. ती त्याला आनंदानी शाळेत सामील करून घेते. शंकरच्या शाळेच्या दाखल्या मध्ये अजूनही 'जनार्दन शिखंडे' हेच जन्मदात्याचे नाव असते...
36
शंकर आता मोठा होतो आहे. अम्मी आणि शंकर आता शहराच्या काल्या मध्ये स्वतःला मिसळू पाहत आहेत. शंकर शाळेतून आल्या पासून अम्मी उशिरा घरी येई पर्यंत एकटाच राहत असतो. शंकर अम्मीला तिच्या घर कामात शक्य तितकी मदत करतो. घरी अम्मी आणि शाळेत सुप्रिया, त्याला जणू दोन 'आई' आहेत. एकदा खेळताना शंकरचे दुधाचे पुढले दोन दात पडतात. तो रडतच ते दात घेऊन अम्मी कडे येतो. अम्मी अतिशय मायेनी जवळ घेते आणि त्याची समजूत काढण्या साठी ते दात एका डबी मध्ये ठेवून देवाला खोटं साकडं घालते. देवानी सांगितले कि अजून २ महिन्यांनी तो तुला तुझे दोन्ही दात परत देईल. ते ऐकून रडणारा शंकर निरागस पणे हसतो. आतामात्र त्याच्या पडलेल्या दाताकडे बघून अम्मीला हसू आवरत नाहि.
37
त्याच्या जगावेगळ्या लहानपणामुळे, त्याच्या पौगंडावस्थे मध्ये त्याच्या मनात स्वतःच्या लैंगिकते बाबत काही साशंकता निर्माण झाल्या असतात. इथे त्याचे काही नवीन मित्र झालेले असतात. एके दिवशी ते खोली वर आलेले असताना, गम्मत म्हणून शंकर, अम्मी प्रमाणे साडी घालतो आणि लीपस्टिक लावतो. त्यांच्या समोर उत्तान नाचतो. त्यातला १७ वर्षाचा अहमद त्याला 'चिकणी' म्हणतो. शंकरला ते सुखावून जाते. घराबाहेर मात्र तो मुलासारखा वागत असतो.
38
असाच एके दिवशी तो अहमद कडे video वर सिनेमा बघायला जातो. तो उत्तान चित्रपट बघताना, पहिल्यांदा शंकर पुरुषाप्रमाणे उत्तेजित होतो. त्याच्यासाठी हा अनुभव सैर-भैर करणारा असतो. 'ती' साडीतली 'चिकणी' खरी कि हा आत्ताचा अनुभव खरा? तो पळत त्याच्या खोलीवर येतो. रात्री नेहमी प्रमाणे अम्मी उशिरा येते. नेहमी ह्या वेळेला पेंगत असलेला शंकर आज टक्क जागा बघून अम्मी त्याला प्रेमाने कारण विचारते. शंकर हमसा हमशी रडायला लागतो. अम्मी आता काळजीने त्याला जवळ घेऊन परत कारण विचारते. शेवटी न राहवून शंकर दोन्ही प्रसंग आणि त्याची द्विधा मनस्थिती त्याला जमेल तश्या शब्दात अम्मीला सांगतो. अम्मीला धक्का बसतो पण ती शंकरला मायेनी जवळ घेते, पण ह्यावेळी शंकर अम्मीला झिडकारतो. शंकर पाठमोरा बिछान्यावर पडून - 'मला माझ्या खऱ्या आई-बाबां कडे जायचे आहे' ची रडत रडत आर्जवं करून झोपतो. अम्मीला ते ऐकून चटका बसतो पण अम्मी समजूतदारपणे त्याला झोपू देते. शंकरला जर सामान्य आयुष्य द्यायचा असेल तर आपल्या पासून त्याला दूर ठेवला पाहिजे हि दुखरी जाणीव अम्मीला होते.
39
अम्मी सकाळीच चित्राक्षी च्या खोलीवर जाते. ती खोलीवर नसते. गल्लीच्या तोंडावर एक कार थांबते त्यातून चित्राक्षी उतरते. तीची आणि अम्मी ची नजरा-नजर होते. चित्राक्षी खोलीवर येते. अम्मी तिला काही विचारणार त्या आधीच ती अम्मीला खरा सांगते कि ब्युटीशिअनच काम करून तिला पोट भरण्या इतके पैसे मिळत नाहीत कारणतिला कोणीच जास्त काळ पार्लर मध्ये काम देत नाही. ती खिन्न पणे अम्मी ला सांगते कि - अजूनही त्यांना उघडपणे करता येईल असे काम निर्माण झाले नाहीये आणि म्हणूनच नाईलाजाने उच्च श्रीमंताच्या सर्व गरजा भागवणे हेच तिचे काम होऊन
बसते. ती अम्मीला एवढ्या सकाळी खोलीवर येण्याचे कारण विचारते. अम्मी तिला शंकरची सगळी हकीकत सांगते. चित्राक्षी तिला परत संचालकांकडे घेऊन जाते. ते सगळी हकीकत ऐकल्यावर सुप्रियाला स्थानिक वसतीगृहा मध्ये भरती करण्याची परवानगी मागतात. खर्चाची किंमत ऐकून चित्राक्षी आपणहून मदत देऊ करते. अम्मी चित्राक्षी कडे कृतज्ञतेनी पाहते आणि तिला तिचे पैसे परत करण्याचे वचन देते.
40
शंकर ज्या दिवशी वसतिगृहामध्ये निघतो त्यावेळी अम्मीला खूप दुःख होते. शंकरला मात्र ह्या कळकट वस्तीमधून आपली सुटका होणार ह्याचा जास्त आनंद असतो. अम्मी बद्दल तेढ असली तरी तिच्यावर शंकरचाहि जीव असतो. आपल्या जाण्यानी अम्मीला त्रास होतोय हे जाणवून तो अम्मीला खूप दिवसांनी मनापासून मिठी मारतो. अम्मी भरून पावते. आपल्या गुरु बद्दल आदर बाळग हि सच्ची शिकवण निघताना ती शंकरला देते. आता निव्वळ तिचे डोळे बोलतात. तोंडून फक्त आशीर्वाद निघतो आणि शंकर संचालका बरोबर शाळेकडे निघतो. शंकरच्या जाण्या नंतर अम्मीला खोली खायला उठते त्यानी केलेली आर्जवं तिला आठवते आणि त्याच्या खऱ्या आई-बाबां चा शोध घेण्याचा अम्मी निर्णय घेते.
41
शंकर वसतिगृहामध्ये सुरवातीला आनंदी असतो पण त्यालाही अम्मी पासून दूर गेल्यावर तिने आपल्या साठी घेतलेल्या निरपेक्ष कष्टाची जाणीव होते. तिच्या पासून दूर जाताना आपण किती स्वार्थी वागलो ह्याची त्याला लाज वाटते. तो शाळे मध्ये गप्पं राहायला लागतो. एकदा ऑफ-पिरिअड ला इतर मुलं मस्ती करत असताना, शाळेची फेरी करणारी सुप्रिया त्याच्या वर्गावर येते आणि हळूच वर्गातली मस्तीखोर मुलं बघते. शंकर मात्र कोपऱ्यात शांत बसून असतो. तिच्या येण्याने मुलं शांत होतात आणि सावरून बसतात. एरवी आनंदी असणारा शंकर आता शांत बसला आहे हे सुप्रियाला जाणवते. ती त्याला शाळा सुटल्या वर भेटायला तिच्या कॅबीन मध्ये बोलावते. शंकर कॅबीन मध्ये आल्यावर, त्याला घरची आठवण येत असणार हे ओळखून, सुप्रिया मायेनी त्याची विचारपूस करते. अगदी पहिल्या भेटी नंतरच तिला हा हुशार आणि चांगल्या चालीरीतीचा मुलगा आवडलेला असतो. ती त्याला त्याचा आवडता विषय विचारते, तो उत्तरतो - मराठी. ते ऐकून ती त्याला शाळेमध्ये आयोजित केलेल्या 'निबंधस्पर्धे' बद्दल सांगते आणि त्याला बळेच त्यात भाग घ्यायला सांगते. तू काय लिहणार असा प्रश्न केल्यावर, शंकरच्या तोंडून निसटून जाते - 'अम्मी'!
त्या रात्रि सुप्रिया आनंद कड़े शंकरचा उल्लेख करते. त्याचे डोळे, केस ह्याचे वर्णन ऐकताना आनंदला जाणवते की हे वर्णन अर्जुनशी बरया पैकी मिळते- जुळते आहे. मात्र तो हे सुप्रियाच्या निदर्शनास आणत नाही, कारण त्याला सुप्रियाला दुखावायाचे नसते. तो समजूतदारपणे सुप्रियाच्या खांद्यावर हट ठेवतो. शेवटी न राहवून सुप्रिया अर्जुनच्या आठवणीना वाट मोकली करून देते. अनेक वर्षानी त्यांचामध्ये मनाचा आणि देहाचाही मोकळा संवाद होतो.
42
कोणालाही न सांगता, अम्मी निर्धार केल्याप्रमाणे ज्या स्टेशनवर तिला शंकर मिळाला असतो त्या स्टेशनवर पोहचते. आता ते स्टेशन अमुलाग्र बदलेले असते. सगळ्या खाणा-खुणा जणू नष्ट झालेल्या असतात. तरीही अम्मी हिम्मत करून स्टेशन मास्तर च्या केबिनमध्ये चौकशी साठी जाते. आता स्टेशन मास्तरहि बदलेला असतो आणि जेव्हा ती १२ वर्षा पूर्वीच्या घटनेचा उल्लेख, करते त्यावेळचा स्टेशन मास्तरच निधन झाल्याचे अम्मीला कळते. तिथल्या पोलिसमध्ये जाण्याचे धैर्य अम्मी करू शकत नाही. आता कुठल्या मार्गांनी शंकरचा मागमूस शोधावा हा यक्ष प्रश्न घेऊनच अम्मी उदास पणे परत निघते. खोलीवर आल्यावर चित्राक्षी तिला तिच्या वेडेपणा बद्दल फैलावर घेते आणि आता ती स्वतः च्या पायावर सक्षम पणे उभी राहिली असल्याने तिने आता हा शोध थांबवून शंकरच्या पालक असल्याचा कायदेशीरपणे अर्ज करावा असं सुचवते. अम्मी त्याला नकार देते. हा स्वार्थी निर्णय शंकरच्या भावी आयुष्यावर संकट आणेल हे तिचा म्हणणं चित्राक्षीला मनोमन पटतं. ती आग्रह करत नाही.
43
वसतिगृहात आपल्या वयाच्या मुलांबरोबर राहायला लागल्या पासून शंकरचा लैंगिक जडण घडणी बद्दलचा गोंधळ हळू हळू कमी व्हयाला लागतो. अगदी रोजच्या वावरात तो जेव्हा नैसर्गिकपणे पुरुषांच्या प्रसाधनगृहात जातो तेव्हा आपण 'पुरुष' आहोत हि जाणीव अधिकाधिक ठळक होत जाते.
44
अम्मी बद्दल मनापासून लिहलेल्या शंकरच्या निबंधाला शाळे मध्ये प्रथम पारितोषिक जाहीर होते. सुप्रिया स्वतः शंकरला हि आनंदाची बातमी देते आणि त्याच्या अम्मीला बक्षीस समारंभाला घेऊन येण्याचे आमंत्रण देते. आता अम्मीला सुप्रियाबाईना भेटायला यायला लागेल ह्या भीतीने शंकरचा आनंद क्षणात उतरतो, कारण त्याने निबंधामध्ये अम्मीच हुबेहूब वर्णन केलं असलं तरी ती तृतीय पंथी असल्याचा उल्लेख केला नसतो. सुप्रियाला शंकरच्या चेहऱ्यावरून त्याचे अवघडलेपण जाणवते. ती त्याला मायेनी खरं कारण विचारते. शंकर जरा अडखळतच अम्मी तृतीय पंथी असल्याचे सांगतो. सुप्रियाला धक्का बसतो पण ती पटकन स्वतःला सावरते आणि छोट्या अवकाशानंतर त्याला अम्मीला दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर १ तासांनी तिला भेटायला येण्याचा निरोप द्यायला सांगते. शंकरचा चेहरा परत काळवंडतो पण सुप्रिया च्या समंजस चेहऱ्या कडे पाहून त्याची धास्ती थोडी कमी होते. त्या संध्याकाळी शंकर बऱ्याच दिवसांनी अम्मीच्या खोलीवर जातो. शंकरनि आपल्यावर निबंध लिहिला आणि त्याला प्रथम बक्षीस मिळाले ह्या आनंदात ती त्याला त्याचा आवडता लाडू बशीत काढून देते. मात्र नंतर सांगितलेल्या सुप्रियाच्या बोलवण्यावर अम्मी भांबावते. तिला शंकरची मनस्थिती, त्याने न बोलताहि कळते. ती त्याला मायेनी सांगते कि ती बुरखा घालून शाळेत येईल. ते ऐकून अम्मीने दिलेल्या लाडूचा घास शंकरच्या घशाखाली उतरतो.
45
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधारण ७ वाजता, शाळा सुटून गर्दी ओसरल्यावर अम्मी शाळेत पोचते. दरवाजा पाशी शंकर उभा असतो. बुरख्यातली स्त्री हि आपली 'अम्मी' असल्याचे तो दरवानाला सांगतो आणि अम्मीला प्रवेश मिळतो. शंकर काही न बोलता अम्मिचा हात धरून तिला सुप्रियाच्या केबिन पर्यंत नेतो आणि अम्मीला खुणेनीच आत जायला सांगतो. अम्मी अतिशय सावधपणे केबिनचा दरवाजा वाजवते. शंकर अलगदपणे आपल्या वसतिगृहाकडे निघून जातो.
46
सुप्रिया आणि अम्मीची हि पहिलीच भेट असते. अम्मीच्या प्रत्येक हालचालीतून तिचं अवघडलेपण अधोरेखित होत असते. सुप्रियाला हे जाणवते. ती अम्मीचा ताण हलका करण्यासाठी हसतच अम्मीला चेहऱ्यावरचा हिजाब वर करायला सांगते. अम्मी खुर्चीवर आक्रसून बसते आणि एका हातानी हिजाब वर करते. सुप्रिया आणि अम्मीची नजरा -नजर होते. अम्मी डोळे खाली घालून बसते. सुप्रिया अम्मीला शंकरच्या निबंधामध्ये तिच्याबद्दल कसे गौरव-उदगार काढले आहेत ते सांगते. इथून कधी निघता येईल हाच विचार अम्मीच्या मनात असतो. सुप्रियाला ते तिच्या देहबोलीतून जाणवते. अम्मी न राहवून आपल्या तृतीय पंथी असल्याचा शंकरच्या शाळेतील भवितव्यावर काही परिणाम होईल का असा प्रश्न सुप्रियाला विचारते. सुप्रिया उलट शंकरच्या उत्तम प्रगती बद्दल आणि चांगल्या संगोपनाबद्दल अम्मीच अभिनंदन करते. अम्मी कसनुसं हसते. सुप्रिया उत्सुकतेपोटी अम्मीला शंकर तिला कुठे सापडला ते विचारते. सुप्रिया कडून शंकरच्या शिक्षणावर कुठला धोका नसल्याचे जाणवल्यावर, अम्मी थोडी सावरते आणि सगळं खरंखुरं सांगते. तो घटनाक्रम ऐकत असताना सुप्रियाच्या चेहऱ्या वरचे भाव हळू हळू बदलत जातात. अम्मीच्या तोंडून रेल्वे स्टेशनचं नाव ऐकून सुप्रियाच्या चेहऱ्यावरचा भाव पूर्णपणे बदलतो. ती भूतकाळात आणि अर्जुनच्या विचारात गुंगून जाते. सुप्रियाला भान येते ते अम्मीच्या जाण्याने लागलेल्या, दरवाजाच्या आवाजानी.
47
अम्मीच्या भेटी नंतर सुप्रिया आनंदला लवकरात लवकर घरी परत येण्यासाठी फोन करते. रात्री सुप्रिया आनंद घरी आल्या-आल्या त्याला उसंत न देता अम्मी आणि शंकर बद्दल सांगायला सुरवात करते. आनंद सुरवातीला त्रासतो पण जस- जशी सुप्रिया त्याला एक-एक घटना सांगते, तसा तसा त्याचाही चेहरा बदलतो. शेवटी शंकर हा कदाचित आपला हरवलेला मुलगा अर्जुन आहे, हि सुखद भावना दोघांच्याही डोळ्यात उमटते. ह्या नवीन अनपेक्षित शक्यतेनी दोघांनाही उभारी येते. आनंद थोडा सावरत त्यांच्या वकील मित्राला, केळकरना फोन करतो. ते त्यांना लवकरात लवकर पोलिसमध्ये अम्मी विरुद्ध अर्जुनला पळवून नेल्याचा आणि अम्मीने त्याच्याशी क्रूर व्यवहार केला आहे असा FIR दाखल करण्याचा सल्ला देतात. सुप्रिया आनंदला सुचवते कि त्यांनी अम्मी कडे जाऊन काही समजुतीचा मार्ग काढावा. पण केळकर त्यांना सावध करतात कि शंकरच्या बदल्यात अम्मी त्यांच्या कडून अवाजवी पैसे मागू शकते, त्यापेक्षा FIR केली तर आपसूकपणे सत्य बाहेर येईल. काही क्षण विचार करून दोघेही पोलीस मध्ये जातात. अम्मीच्या विरोधात क्रूर वागणुकीची खोटी तक्रार करताना सुप्रियाला मनातून खजील वाटते, कारण तिने कालच तिने शंकरच्या चांगल्या संगोपनाबद्दल अम्मीचं कौतुक केलेला असतं, पण अर्जुन परत मिळण्याच्या अपेक्षेनी तिच्या विवेकावर पडदा पडलेला असतो. सुप्रिया गप्पं राहते.
48
अम्मीच्या विरोधात क्रूर वागणुकीची खोटी तक्रार करताना सुप्रियाला मनातून खजील वाटते, कारण तिने कालच तिने शंकरच्या चांगल्या संगोपनाबद्दल अम्मीचं कौतुक केलेला असतं, पण अर्जुन परत मिळण्याच्या अपेक्षेनी तिच्या विवेकावर पडदा पडलेला असतो. सुप्रिया गप्पं राहते. आनंदनी येताना त्यांच्या जुन्या तक्रारीची एक प्रत आणली असते. ती प्रत पाहून आणि त्यांची माहिती ऐकून इन्स्पेक्टरलाही त्यांच्या गोष्टीमध्ये प्रथमदर्शनी तथ्य दिसते. तो अम्मिचा पत्ता विचारतो, सुप्रियाने शाळेच्या दाखल्यातून तिचा पत्ता कालच काढलेला असतो. ती पत्ता लिहलेला कागद इन्स्पेक्टरच्या हाती देते. आनंद आणि सुप्रिया अर्जुनच्या सुटकेसाठी कळकळीची विनंती करतात. त्या दोघांची आर्जवं बघून इन्स्पेक्टर १-२ पोलीस घेऊन तत्परतेनी अम्मीला ताब्यात घेण्य साठी निघतात.
49
अम्मीला पोलीस अटक करतात. ती कळवळीने हा दावा खोटा असल्याचे सांगते. ती शंकरला निकोपपणे कसा वाढवला, किती कष्ट..घेतले..आणि तडजोडी केल्या, हे ऐकून घेण्याची पोलिसांची मानसिकता नसते. अम्मीच्या आर्जवं आणि विनंत्यांचा पोलिसांवर काही परिणाम होत नाही. पोलिसांच्या जीप मधून जाताना, अम्मी तिच्या शेजाऱ्याना चित्राक्षीला निरोप द्यायची विनंती करते. अम्मी पोलीस स्टेशन मध्ये पोचते आणि तिच्या पाठोपाठ ५-१० मिनिटात चित्राक्षी त्यांच्या वतीने समाजसेवी शिंदे वकिलांना, घेऊन पोलीस स्टेशन येते. शिंदे पोलिसांना कुठल्या कायद्या प्रमाणे अम्मीला अटक केल्याचे विचारतात. सुप्रिया आणि आनंद नि केलेली FIR वाचल्यावर त्यांना कळते कि अम्मीच्या विरोधात पक्की केस होणार. शिंदे अम्मीची मनापासूनची कळकळ ऐकतात. इतक्या वर्षात त्यांच्या वकिली डोळ्यांना खरेपणा आणि खोटारडेपण ओळख्नायची सवय लागली असते. ते चित्राक्षीला आणि अम्मीला समंजसपणे सांगतात कि शांतपणे कोर्टात आपली बाजू मांडण्यातच त्यांची भलाई आहे. शिंदे अम्मीची केस मोफत लढण्यास तयार होतात.
50
दुसर्या दिवशी चित्राक्षी बुरखा घालून शंकरच्या शाळे बाहेर येते आणि शंकर साठी एक बंद लिफाफा दरवानाकडे देते. त्याला तो नक्की शंकर पर्यंत पोचता करण्याची कळकळीची विनंती आणि चहापाण्या साठी १०० रु. देते. संध्याकाळी, शंकरला अम्मीच्या अटकेबद्दल बातमी मिळते. त्याला अम्मीच्या अनाकलनीय अटकेमुळे धक्का बसतो. अम्मी बद्दल अतिशय वाईट वाटतं. तो तसाच धावत सुप्रियाच्या केबिन मध्ये जातो आणि रडतच सुप्रियाला ती घटना सांगतो. तिने अगोदरच शंकरला तिचा अर्जुन मानला आहे त्यामुळे सुप्रियाला अम्मीची..अटक अपेक्षितच असली तरी, शंकरला होणारा मानसिक त्रास तिला अस्वस्थ करतो. मात्र केळकर वकिलांनी शंकरच अर्जुन आहे हे सिद्ध होई पर्यंत सबुरीचा सल्ला दिलेला असतो, तो आठवून ती स्वतः ला आवरून ती अतिशय ममतेनी फक्त त्याला जवळ घेते. शंकरला खूप वर्षांनी देखील तो स्पर्श ओळखीचा वाटतो. सुप्रिया शंकरच्या हातातली चिठ्ठी वाचते. चिट्ठी मध्ये अम्मी तुरुंगात असली तरी तिने शंकरला तुरुंगात भेटण्यासाठी न येण्याबद्दल आर्जवं केलेली असते. अम्मीचा चांगुलपणा सुप्रियाला मनोमन पटला असतो.
51
एका आठवड्या नंतर कोर्ट केस चालू होते. काही वृत्तपत्र एक जगावेगळी केस म्हणून तर पुरोगामी म्हणून ह्या केस बद्दल ठळक बातम्या छापून आणतात. मात्र कोर्टाच्या निदेशानुसार शंकरचे नाव आणि ठाव ठिकाण मात्र गुप्त ठेवण्यात आल्याने शंकरच्या दैनंदिन जीवनावर काही फरक पडत नाही. तो नेहमी प्रमाणे शाळेत हजर असतो पण मन सतत अम्मी बद्दल चा चिंतेनी ग्रासलेले असते. त्यातच त्याच्या लाडक्या सुप्रियाबाई पण अनपेक्षितपणे मोठ्या सुट्टीवर गेल्याचे शंकरला कळते आणि तो आणखीन खिन्न होतो.
52कोर्ट केस आता वेग घेते. केळकर वकील जोरदार पणे - तृतीय पंथी प्रजनन करू शकत नसल्याने लहान मुलांना पळवून, अनैसर्गिक, अघोरी उपायांनी त्यांच्या जमाती मध्ये कसे आणतात आणि भारतीय संविधाना प्रमाणे 'निर्वाणा' ची प्रथा कशी बेकायदेशीर आहे ह्याचा उल्लेख करतात. शिंदे अम्मीच्या वतीने चित्राक्षी आणि उत्थानचे संचालक ह्यांना बोलावतात. चित्राक्षी अम्मीच्या कष्टांची आणि तिच्या शंकरसाठीच्या प्रेमाची साक्ष देते. तिने केलेल्या अनेक तडजोडी ह्या निव्वळ शंकरला निकोप पणे वाढवण्या साठी होत्या हे ठाम पणे सांगते. केळकर चित्राक्षीला एकच प्रश्न विचारतात कि - शंकर अम्मिचा मुलगा आहे कि नाही? आणि नसेल तर तो अम्मी कडे कसा आला ह्याचा तिच्या कडे काही ठोस पुरावा आहे का? चित्राक्षी निरुत्तर होते.
53
शिंदे संचालकांना त्यांची आणि अम्मीची कशी ओळख झाली ते विस्तृत पणे सांगायला सांगतात. संचालक, अम्मीने आत्तापर्यंत केलेल्या अथक परिश्रमाची साक्ष देताना त्यांची बाजू मांडतात कि - "तृतीय पंथी समाजाला पूर्वी आपल्या घरांमध्येही स्थान होतं. त्यांना थेट स्वयंपाकी, सुतार अशा कामांमध्ये सामावून घेतलं जायचं. ही गोष्टही फार पूर्वीची नाही. अगदी ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत ही पद्धत होती. पण अचानकपणे ही पद्धत मागे पडली. लघुउद्योग करण्याची त्यांची नक्कीच क्षमता होती, पण औद्योगिकीकरणाचं युग आलं, त्यानंतर योग्य कौशल्य आणि मार्गदर्शन न मिळाल्याने तृतीय पंथी समाज मागे पडला. पण याचा अर्थ त्यांची क्षमता नाही, असं अजिबात नाही. एक व्यावसायिक म्हणून त्यांना प्रशिक्षण मिळालं तर ते कुठेही कमी पडणार नाहीत आणि अम्मी त्याचं जिवंत उदाहरण आहे", असं संचालक ठामपणे सांगतात.
"कुठलेही व्यवस्थापन प्रशिक्षण न घेता सुद्धा तृतीय पंथी चा समाज चेन बिझनेस मॉडेलप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने चालतो. तृतीय पंथी समाज हा सात घराण्यांमध्ये विभागलेला आहे. त्या घराण्यामध्ये नायक, गुरू, चेला, संती, नाती अशी विभागणी होते. यामध्ये सगळ्यात खालच्या थरातल्या तृतीय पंथीने केलेल्या कमाईचा हिस्सा वपर्यंत पोहोचतो. चित्राक्षी प्रमाणे, सुमारे २५ टक्के तृतीय पंथी उच्चशिक्षित आहेत तरी तेसुद्धा भीक मागतात किंवा शरीरविक्रीय करतात, अशी आकडेवारी आहे. अनेकांनी विविध प्रकारचे ब्युटी कोर्सेस केले आहेत. पण त्याचा उपयोग केवळ वैयक्तिक वापरासाठी होतो. अनेकांनी नृत्य, गाणं याचंही प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांना रांगोळी, मेंदीही चांगली काढता येते. अनेकांना शिवणकाम येतं. मात्र त्यांच्या या कलागुणांचा आणि कसबाचा वापर लघुउद्योगामध्येही करून घेतला जात नाही. त्यांच्या कलागुणांचा जर उपयोग करून घेता आला तर त्यांना नक्कीच पैसे कमावता येतील. त्यांना नोकरीसाठीसुद्धा इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. स्वयंरोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध होतील. पण यामध्ये काही वेळा घराण्यांचे नियम अडचणीचे ठरू शकतात. म्हणूनच घराण्याशी इमान राखून असलेल्या या समाजातील लोक नोकरीची संधी मिळाली आणि जर घराण्याच्या नियमामध्ये ते बसणारं नसेल तर घराणं बदलायलाही तयार होतील पण अजूनही तृतीय पंथी समाजाला कुठलीही कायदेशीर ओळख नाही. त्यांना कुठेलेही ओळखपत्र मिळवताना 'स्त्री' किंवा 'पुरुष' असाच उल्लेख करावा लागतो. तरीही आजच्या घडीला त्यांना बँक अकौंट उघडणेहि अवघड आहे", हे संचालक नमूद करतात त्यांच्या ह्या मुद्देसूद आणि परखड बोलण्यावर कोर्टातील सर्वजण अंतर्मुख होऊन जातात.
54
कोर्ट मधला सहानभूतीचा सूर ओळखून केळकर पटकन उठतात आणि हा खटला तृतीय पंथी वर होणाऱ्या सामाजिक अन्यायाचा नसून शंकरच्या भवितव्याचा आहे अस सांगत न्यायालयाचा ओघ परत केस कडे आणण्यासाठी केळकर संचालकांना नेमका प्रश्न विचारतात कि - अम्मीने शंकरला सुप्रियाच्या शाळेच्या वसतिगृहामध्ये भरती करण्याची विनंती का केली होती? आणि उलट तपासणीत, शंकरच्या अनैसर्गिक वातावरणामुळे शंकरच्या लैंगिक मानसिकते मध्ये गोंधळ उडाल्यामुळे त्याला वसतीगृहात भरती केल्याचे स्पष्ट होते आणि न्यायालय त्याची नोंद घेते.
55
केळकर वकील अम्मीने शंकरला क्रूर वागणूक दिल्याचे आरोप ऐकताना अम्मी वेदनेनी सुप्रियाकडे बघते. सुप्रिया नजर देत नाही. केळकर वकिलांच्या अखंड हल्ल्या नंतर अम्मिचा बांध फुटतो. ती व्याकूळतेनी आक्रोश करते कि तिने शंकरला सर्वतोपरी निकोप आणि सामान्यपणे वाढवायचा प्रयत्न केला आहे आणि पुराव्या दाखल न्यायालयानी शंकरची वैद्यकीय चाचणी करावी अशी आर्जवं हि करते. तिच्या ह्या अनपेक्षित प्रतीक्रीयेनी केळकर सुद्धा अचंबित होतात. त्यानाही अम्मिचा खरेपणा कुठेतरी जाणवतो पण ते लगेच त्याच्या भावनेवर ताबा मिळवतात.
56
अम्मी निरपराध आहे हे सिद्ध करण्यासाठी शिंदे वकील, आनंदला साक्षीला बोलावतात आणि त्यांचा मुलगा कसा हरवला हे न्यायालयाला विस्तृतपणे सांगण्याबद्दल सुचवतात. त्यात एका गर्दुल्ल्यानी अर्जुनला पळवल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी ते आनंदच्या जुन्या तक्रारीची प्रत नायायालयात सादर करतात.
ह्या मुद्द्याला खोडून काढण्या साठी आता केळकर, त्या रात्री गावातील पोलीस स्टेशन मधल्या उपस्थित असलेल्या इन्स्पेक्टरला बोलवतात. तो इन्स्पेक्टर अजूनही एका तृतीय पंथी ने केलेला अपमान विसरलेला नसतो, तो त्या रात्री अम्मी एका लहान मुलाला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आल्याचा उल्ल्ख करतो. ह्यावरून तो गर्दुल्ला आणि अम्मी ह्यात काही संगनमत असल्याची शक्यता केळकर उपस्थित करतात. न्यायालय त्याची नोंद घेते.
57
आता अम्मी विरुद्ध निर्णायक साक्ष म्हणून केळकर उस्मानला बोलावतात. उस्मान आता वयस्कर झाला आहे. त्याच्या येण्यानी अम्मीला इतक्या वर्षांनी त्याला बघितल्याचा आनंद पण होतो आणि आपण त्याचं घराणं सोडलं म्हणून तो आपल्या विरुद्ध साक्ष देईल, ह्याची मनातून धास्तीपण वाटते. पण उस्मान अनपेक्षितपणे खरं सांगतो. तो न्यायालयाला सांगतो कि अम्मी ने त्या गर्दुल्ल्या पासून शंकरला सोडवले आणि त्याच्या शंकरच्या 'निर्वाणा' करण्या बद्दलच्या मर्जी विरुद्ध जाऊन त्याला निकोप आयष्य देण्या साठी तिने त्यांचा घराणं देखील सोडलं. केळकर ह्या अनपेक्षित साक्षीने भांबावून जातात मात्र अम्मी च्या डोळ्यात उस्मान बद्दल कृतज्ञतेची भावना येते. उस्मान त्याच्या मनावरचे ओझे उतरावे तशा भावाने जसा आला तसा निघून जातो.
58
न्यायालय उस्मानच्या साक्षीची योग्य नोंद घेतं.न्यायालय अम्मीला निर्दोष असल्याचे मानते मात्र शंकर हा सुप्रिया आणि आनंदचा मुलगा असल्याची शक्यता अमान्य करत नाही. शंकरची वैद्यकीय तसेच DNA तपासणी करावी असा निर्देश देते. मात्र भारतीय कायद्यानुसार एका मुलाचे पालकत्व तृतीय पंथी कडे देण्याची तरतूद नाही त्यामुळे जर DNA तपासणी खोटी सिद्ध झाली तर आनंद आणि सुप्रीयावर खोटी तक्रार केल्याबद्दल दंडात्मक कारवाई म्हणून सद्द्यान होई पर्यंत शंकरच्या पुढील शिक्षणाची आणि संगोपनाची आर्थिक जबाबदारी उचलावी अशी समजहि देते.
अम्मी सुटकेचा निश्वास सोडते. चित्राक्षी आणि शिंदे आनंद व्यक्त करतात. केळकर न्यायालयाचा निर्णय खिलाडूपणे स्वीकारतात. आनंद आणि सुप्रिया अम्मीला त्रास दिल्याबद्दल खजील आहेत पण मनोमन, DNA तपासणी नंतर आपला अर्जुन आपल्याला परत मिळावा हि प्रार्थना करत बाहेर निघतात.
59
कोर्टाच्या आवारात आनंद, सुप्रिया, केळकर आणि चित्राक्षी, अम्मी व शिंदे वकील समोर समोर येतात. केळकर आणि शिंदे एकमेकांना अभिनंदन करतात. चित्राक्षी सुप्रियाकडे रागाने बघत असते. ती सुप्रियाला काही बोलणार इतक्यात अम्मी तिला मधेच थांबवते. ती आनंद आणि सुप्रिया कडे क्षमाशील दृष्टीने बघत त्यांना सांगते कि - शंकर जर अर्जुन म्हणून सिद्ध झाला तर तिला स्वतःला फार आनंद होईल कारण तेच तिच्या जीवनाचे धेय्य असते, ती काकुळतीने म्हणते कि खोटा दावा करायच्या ऐवजी सुप्रीयानी एकदा नुसता विषय जरी काढला असता तरी तिने स्वखुशीने शंकरला त्यांच्या हवाली केले असते. सुप्रिया आनंद आणि केळकरकडे सूचकपणे बघते. केळकरला जाणवते कि त्याची अम्मी बद्दल अंदाज करण्यात चूक झाली. ते काही बोलणार त्या आधीच अम्मी त्यांचा मन ओळख्ल्यागत अम्मी बोलते कि - शंकर हा तिच्या साठी अनमोल आहे आणि त्याच्या जीवाचा सौदा तिने आजन्म केला नसता. तिची शंकर वरची सच्ची माया बघून, न राहवून सुप्रिया अम्मिचा हात कृतज्ञपणे हातात घेते आणि केस मध्ये जरी शंकर अर्जुन म्हणून परत मिळाला तरी अम्मी बद्दल त्याचे मत कलुषित होऊ द्यायचे नाही अशी खुणगाठ ती मनाशी बांधते.
जाता जाता अम्मी आनंद आणि सुप्रियाला सांगते कि त्यांच्या बद्दल, तिला कसलीही अढी नाही. आणि जरी तिची सुटका झाली आहे तरी DNA तपासणी चा निकाल येई पर्यंत शंकरला मानसिक त्रास होऊ नये म्हणून ती शंकरला भेटणार सुद्धा नाही, ती सुप्रीयालाही शंकरला काही न सांगण्याबाबत विनवते. आनंद आणि सुप्रिया अम्मिकडे प्रथमच नव्या दृष्टीकोनातून बघतात.
60
शाळेनीच वैद्यकीय तपासणी आयोजीत केली आहे अशी बतावणी करत शंकरला डॉक्टर कडे पाठवले जाते. DNA तपासणीचा निकाल ३ दिवसांनी येणार असतो. ते ३ दिवस, शंकर सोडून, बाकी सगळ्यांसाठी फार तणावपूर्ण असतात. ३ दिवसांनी निकाल येतो शंकर हा अर्जुन असल्याचे आणि पूर्णपणे निकोप असल्याचे सिद्ध होते. आनंद आणि सुप्रियाच्या आनंदाला पारावर राहत नाही. ते केळकर सकट आपल्या सगळ्या जवळच्या लोकांना हि खुशखबर सांगतात. आता कोर्टहि शंकरचा ताबा त्याच्या खऱ्या पालकांकडे देते आणि अम्मीच्या निरपेक्ष संगोपनाची तारीफ करते. कोर्टाच्या आवारात पुन्हा तिची भेट सुप्रीयाशी होते. अम्मी दोघांचेही अभिनंदन करते. शंकर पासून कायमचे दूर जाणार असलो तरी तिलाही तिच्या आयुष्याचे मोठे धेय्य साध्य झाल्याचा आनंद आहे. आता आनंद आपणहून त्या दोघींना एकांतात भेटायला देतो. सुप्रिया निव्वळ डोळ्यानेच अम्मी कडे माफी आणि आभार दोन्ही व्यक्त करते. सुप्रिया काही बोलणार एवढ्यात अम्मी तिला थांबवत सांगते कि - ह्या पुढे ती परत कधीही शंकर, नव्हे अर्जुनच्या, आयुष्यात येणार नाही. पण तिला एकदा शेवटचं शंकरला भेटायचं आहे. सुप्रिया आपले आनंदाश्रू आता अडवत नाही, ती मानेनीच होकार देते.
61
सुप्रियाला शंकरला सद्यपरिस्थिती सांगण्यावाचून आता पर्याय नसतो. ती आनंदला आणि अम्मीला तिच्या शाळेत बोलावते. अम्मी नेहमी प्रमाणे बुरखा घालून येते. अम्मी सुप्रियाच्या शेजारच्या केबिन मध्ये थांबते आणि आनंद सुप्रियाबरोबर तिच्या केबिन मध्ये जातो. सुप्रिया पिऊन मार्फत शंकरला बोलावा धाडते. शंकर इतक्या दिसांनी त्याची आवडती सुप्रिया बाई परत आली म्हणून पळतच केबिन मध्ये येतो. सुप्रिया शक्य तितक्या समजूतदारपणे शंकरला सगळं सांगते. शंकरसाठी हा अनपेक्षित धक्का असतो अम्मी पासून दूर होणार ह्या जाणिवेनी त्याला वाईट वाटते पण त्याला कुठेतरी आनंद हि होतो. इतके दिवस मायेनी बोलणारी सुप्रिया बाई आपली सख्खी 'आई' आहे आणि आनंद सारखा मध्यम वयीन पण देखणा पुरुष आपला 'बाप' आहे, हे कळल्यावर शंकर सुप्रिया आणि आनंदला कडकडून मिठी मारतो. अम्मी शेजारच्या केबिन मधल्या खिडकीच्या फटीतून सर्व ऐकत-पाहत असते. आनंदला अम्मीची चाहूल लागते आणि तो अम्मीला केबिन मध्ये बोलावतो. अम्मी आता हिजाब वर करत विचारते - 'तुला तुझ्या खऱ्या आई-बाबां कडे जायचा होतं ना?' अम्मीच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी डोळे खोटं बोलू शकत नाहीत. शंकर आता अम्मिलाही जाऊन लगडतो. आत्तापर्यंत तिने केलेल्या त्यागाची आणि कष्टाची त्याला जाणिव असते पण जेव्हापासून अम्मी तृतीय पंथी आहे हे त्याला कळलेले असते तेव्हापासून तिच्या बद्दल एक अढी त्याच्या मनात असते, ती आज गळून पडते. अर्जुनला अम्मी आणि सुप्रियाच्या स्पर्शामध्ये तीच माया जाणवते.
61
अम्मी अर्जुनला सांगते कि हे त्यांची शेवटची भेट आहे. ती आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. अर्जुन तिला थांबवू पाहतो पण अम्मी ऐकत नाही. आनंद आणि सुप्रिया मध्ये समाजाविरुद्ध जाऊन अम्मीला रोखण्याचं धाडस नसते. अम्मी अर्जुन कडे शेवटचं डोळाभरून बघते आणि परत बुरखा घालत, पाठ फिरवून झर्रकन निघून जाते. अर्जुन तिला मागून हाक मारतो 'अम्मी'...'अम्मी'. तिची पाठमोरी आकृती एक क्षण थबकते. तिच्या चेहऱ्यावर वेदना उमटतात पण मन घट्ट करून नाहीशी होते.
62
अम्मीच्या ऋणांची कायम आठवण राहावी म्हणून, सगळ्या शाळेपासून सर्व कायदेशीर दाखल्यांमध्ये अर्जुनचे नाव 'शंकर आनंद भावे' म्हणून उल्लेखले जाते.
63
आता १५ वर्ष उलटली आहेत. शंकरच्या आयुष्यातून अम्मीची आठवण आता धूसर झाली आहे. आता शंकर एक हुशार डॉक्टर म्हणून नावारूपाला आला आहे.
64
एक श्रीमंत बंगल्याला बाहेरून रोषणाई केलेली आहे. आत मध्ये खूप धूम धमाल चालू आहे. बंगल्याचे नाव आहे 'साफल्य'. आनंद आणि सुप्रिया भावे ह्याच्या एकुलत्या एक मुलाचा, डॉ.शंकरचा, त्याच्या मैत्रिणीशी, डॉ. शिवानी भिडे हिच्याशी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु आहे. बाहेर काही तृतीय पंथी बक्षिसी घ्यायला आले आहेत. त्यांना दरवान आत सोडत नाही त्यामुळे दरवाजावर थोडा गोंधळ उडतो. काय झालं म्हणून आनंद स्वतः दरवाजावर येतो आणि तृतीय पंथी आहेत हे बघून त्यांना आत यायला परवानगी देतो. त्या घोळक्यामध्ये एक वयस्कर तृतीय पंथी आहे. त्याने आपले तोंड साडीने अर्ध झाकून घेतले आहे. ती घोळक्याबरोबर नृत्य करत नाही तर ढोल वाजवते आहे. आता त्यांचा घोळका जोडप्य कडे निघतो. बाकीच्यांच्या बरोबर ती शंकरच्या जवळ येते आणि गर्दीचा फायदा घेत, त्याच्या डोक्यावर आशीर्वादा साठी हात फिरवते. तिचा हात जरा इतरांपेक्षा थोडा जास्त रेंगाळतो. हाताला थोडा कंप जाणवतो. शंकरला तो स्पर्श ओळखीचा वाटतो तो पटकन वर बघतो पण तो पर्यंत ती पटकन लांब गेली असते. शंकरची नजर तिला शोधात असताना त्याला तिची पाठमोरी आकृती हुंदके देताना दिसते. शंकर आणि आनंद ची नजरभेट होते तो आनंदला इशाऱ्यानेच त्या पाठमोऱ्या आकृती कडे निर्देश करतो. आनंद हळूच त्या आकृतीच्या पाठीमागे जातो. आता तिच्या चेहऱ्यावर पदर नाहीये. वय आपल्या खुणा दाखवते आहे. पण तरी आनंद तिला ओळखतो. आता सुप्रिया तिथे अलगदपणे येते. अम्मी डोळ्यानीच माफी मागते आणि पटकन निघायचा प्रयत्न करते.
65
सुप्रिया अम्मीला अडवते. तिला बळेच शंकर कडे घेऊन जाते. शिवानीला वाटते कि अम्मी परत बक्षिसी मागायला आली आहे म्हणून ती तिच्या मैत्रिणीला तिला बक्षीस द्यायला सांगते पण सुप्रिया तिला मधेच अडवते आणि दोघांनाही अम्मीच्या पाया पडायला सांगते. शिवानीला ते विचित्र वाटते. शंकर आता अम्मीला ओळखतो. तो प्रसंगावधान राखून शिवानीला खोडसाळपणे पण अम्मी कडे सूचकपणे बघत उत्तरतो - 'अगं शिवानी, पाया पडून घे. ह्यांच्या दुव्या मध्ये खूप शक्ती आहे, कारण ह्यांच्या दुव्यात आईची पण शक्ती आहे आणि बापाचीही'. शिवानी अर्जुनच्या खातर खेळकरपणे आणि अर्जुन मनापासून अम्मीच्या पाया पडतो. अम्मी मनभरून आशीर्वाद देते. आनंद आणि सुप्रिया भावविवश होतात पण फक्त केळकर खरं काय ते ओळखतात. अम्मी शंकरच्या हातात एक पुडी ठेवून निघून जाते.
66
शंकर काहीतरी कारण सांगून बंगल्यामध्ये शिरतो आणि खिशातली कागदाची पुडी उत्सुकतेनी उघडतो. त्यात त्याचा लहानपणी पडलेला दात असतो. आता शंकरचा त्याच्या भावनेवरचा ताबा सुटतो. तो रडत असताना त्याची नजर बंगल्याच्या दरवाजावर जाते. अम्मीची नजर अजूनही काहीतरी शोधात असते. तिची आणि शंकरची आता नजरभेट होते. अम्मी परत एकदा भरल्या डोळ्यांनी आणि दोन्ही हातानी आशीर्वाद देते .. शंकरच्या तोंडून शब्द निसटतात...'अम्मी'! समारंभाच्या आवाजात त्याचे अस्फुट उद्गार कोणालाही ऐकायला जात नाहीत, पण अम्मी मात्र एक क्षण थबकते आणि पूर्वी प्रमाणे झर्रकन पाठ फिरवून, मात्र ह्यावेळी मनात माणूस म्हणून परिपूर्णतेची भावना आणि डोळ्यात आनंदाश्रू घेऊन, कायमची निघून जाते.
समाप्त
*** This story was written in 2011. In Apr 2014, Supreme court acknowledged "third gender". In 2015, Rajya Sabha cleared the Rights of Transgender Persons Bill. Hence some facts may now be dated.