Sunday, December 29, 2013

मी...फक्त तुझाच?

मी...फक्त तुझाच?

- २० वर्षांचे आपले लग्न, २ मुलं...सुरवातीच्या तुझ्या बरोबर झेललेल्या असंख्य खस्ता आणि आज???

- मला कळलेच नाही रे, मी कधी गुंतले तुझ्यात? पण मी निघते आता...काळजी घे...

- जीव तुटतोय माझा... मी नाही नाही म्हणतोय...पण आतून गळून पडतोय साफ..व्यक्त करत नाही म्हणून वेदना थांबत नाहीत...विचारू का तुला एकदा? कि,  मी फक्त तुझाच???

वरचे संवाद ऐकून तुम्हाला कळले असेलच पुढे काय लिहून ठेवलय ते? मी थोडं रोमांटिक लिहायचं ठरवलं होते, पण जमत नाही राव, आपल्याला...ते तसल काही घडल नाही राव. मला उगाच जाब विचारू नका...मी तुमचा बांधील नाही!  हे सगळ जे सांगतोय ते फक्त ऐका...हे असं ऐकायला जाम मझा येतो..

...पण मनापासून विनंती...ह्याला "लफड" म्हणू नका राव...तसं काही घडलच नाही आणि खरच सांगतो, न घडताहि जाम त्रास झाला...म्हणून बोलतो please "लफड" म्हणू नका!

मी दोन मुलांचा बाप, एका कर्तबगार स्त्रीचा पती, एका मोठ्या कंपनीत, जबाबदार हुद्द्यावर आणि ६ महिन्या साठीच ती आली माझ्या भाव विश्वात...असंख्य वेळा तितक्याच असंख्य लोकां बरोबर जे घडले असेल ते माझ्या बरोबर घडले...WHATS THE BIG DEAL???

मला वाटले होते इतक्या असंख्य वेळा अनेक माध्यमातून येऊन गेलेली हि घिसीपिटी, गुळगुळीत, "प्रेमाची गोष्ट" फक्त सिनेमा, कल्पनारंजन किंवा दुसऱ्याच्या बाबतीत घडते...एकटा प्रवास करताना, नेमकी आजारी, वृद्ध, काकू-मावशी असे 'शेजारी' मिळणारी माझी जमात...मला काय माहित राव?

माझी तिची भेट अचानक ऑफिस मध्ये झाली. माझी बदली झाली होती. पहिल्या दिवशी ज्या उत्साहानी ऑफिस ला जातो त्या उत्साहानी मी गेलो आणि ज्या अनास्थेनी नवीन सहकाऱ्याचे स्वागत होते तितक्याच उत्साहानी माझे स्वागत झाले. त्यातच ती हि होती...सुंदर..सावळा रंग...मोठे बोलके डोळे पण लाजाळू... काहीतरी "नारायणन" आडनाव होते...नाव इतक हळू सांगितले तिने...पहिल्या भेटीत  कोणी इतकं लक्षात राहणे हे फार dangerous! पण तिच्या कडे दुर्लक्ष करणे निव्वळ अशक्य होते.

खरतर मी पूर्ण लग्नात आहे...बायको सुंदर आहे, सुगरण आहे, कामात कर्तबगार आहे पण तरीहि सुंदर पर-स्त्री समोर आली कि 'आई-बहिण' म्हणून मला नाही बघता येत, राव. सुंदर स्त्री समोर आल्यावर मला काहीतरी होत...तिला पाहून तेवढेच काही झाले असेल असे वाटले...पण गेलीच नाही राव ती डोळ्या समोरून...

हळू हळू काम समजावून घेतले. १-२ दिवसांनी तिचे नाव कळले...मानसी...जाम आवडले. 'मानसी नारायणन ' MBA होती...नवीन होती...मात्र कुठल्या तरी कारणांनी  खांद्यातून वाकून चालायची, तरी पण माझ्या पेक्षा काही इंच उंच होती.

हळू हळू काम आणि आजू बाजू चे कळत होते.

घरी सगळ उत्तम होते. मी बायकोवर उगाच खुश राहायला लागलो होतो...मुलां बरोबर मस्ती जरा जास्तच करायला लागलो होतो...जिम सोडून अनेक महिने झाले असूनही जाम हलके वाटायचे..

मग ऑफिस मध्ये माझ्याकडे काम कोंबायला सुरवात झाली...पण जाम फ्रेश वाटायचे.

एकदा अचानक एक मिटिंग लागली, Nariman  Point ला.  बॉस बोलला - 'मानसीला घे मदतीला...'
मी नवीन होतो बॉस चे ऐकायलाच हवे होते!

मग ती येताच राहली मदतीला...एकदा अशीच संध्याकाळी मिटिंग संपली...Nariman  Point ला सूर्यास्त तुम्ही बघितलाच असेल. मृणाल बरोबर बरेचदा  enjoy केला आहे मी... म्म म्म...मृणाल माझ्या बायकोचे नाव..

आज मानसी होती बरोबर. मी बोलून गेलो सूर्यास्ता बद्दल.. ती चक्क हो म्हणाली...तद्दन फिल्मी...पण जाम मोरपिसं फिरतात राव अंगावरून, जर तुम्ही ४५ चे असाल तर १०० % !!!

आज चक्क गर्दी कमी होती...हिजडे पण नव्हते छळायला...

"कुठेच privacy राहिली नाही मुंबईत"...मी उगाच निसटून गेलो...

मानसी चक्क  बोलली "privacy"? "privacy" कशाला ? हसली खट्याळ पणे...काय दिसत होती राव, काळी trouser, काळा सूट..

मी तिच्या कडे बघतोय हे तिला कळत  होते पण काही बोलली नाही...मी जाम खुश झालो. २० वर्ष कमी झाली...

तिचा हात हातात घ्यावा असा अनावर मोह झाला आणि - "मी  आणि मृणाल अनेकदा आलोय इथ, पण तेव्हा मुंबई जाम स्वच्छ होती"...निव्वळ शुद्ध करंटेपणा...असेलला क्षण भरभरून enjoy करायला पण एक धाडस लागते...

मला वाटले ती चिडेल - पण नाही चिडली, मला अजूनच आवडली "माझी मनुडी"...माझ्या भाचीला पण मी "मनुडी" बोलतो हे आठवले आणि मनातच चरफडलो...

आणि तिने प्रथमच माझ्या कडे सरळ, थेट बघितले...मी गोंधळलो ना राव...हिरोइन निव्वळ हिरोइन..
"अमर, तुला मी आवडते ना?...खरं सांग?"

"मी तुझा एक स्वतंत्र स्त्री म्हणून जाम आदर करतो"... भंपक, निर्बुद्धपणा!

ती खुदकन हसली...तिला जवळ ओढून, करकचून मिठी मारावी असे नुसतेच वाटले...पण केले काहीच नाही...मी बोललो ना तुम्हाला तसे काही घडलेच नही म्हणून???

"वेल, मला तू आवडतोस अमर...मला माहित आहे तुझ लग्न झालं आहे २ मुल आहेत, तुझे थोडे केस पांढरे आहेत तरी पण मला तू जाम आवडतोस"

तिचे काळेभोर टपोरे डोळे...अजून आठवते ती नजरभेट...ती नजरबंदी...

माझा श्वास अडकला...हे ऐकून मला काय वाटले असेल,  हे कळण्या साठी "पुरुषाचा" जन्म घ्यावा लागेल...actually स्त्री असाल तर लवकर कळेल!

पण मग ती पटकन फिरली आणि गाडीतच जाऊन बसली...

बस्स! हे इतकच घडलं त्या दिवशी...

पुढचे ६ महिने निव्वळ स्वप्नवत होते. काम खूप केले..अर्थात मानसी ची सोबत घेऊनच...
पण मी आणि मानसी काही बोललो नाही जास्त...निव्वळ डोळ्या व्यतिरिक्त...तिचे काळेभोर टपोरे डोळे

मृणाल बरोबर पण जाम enjoy केले...तिलाही कळू दिले नाही...पण तिला कळण्या सारखे काही रूढार्थाने काही होते असे मला वाटले पण नाही...तुम्हाला काय वाटते???

मग अचानक एका सकाळी बॉसनी तातडीची मिटिंग बोलावली...माझी नजर मानसीला शोधत होती..ती जवळ राहते. रोज ८.२५ ला हजर असते !

सगळे बॉस च्या केबिन मध्ये जमले...बॉस कधी नाही इतका शांत होता...

शांतता चिरत शेवटी  बॉस बोलला - "आज सकाळी ऑफिस ला येताना मानसीला एका पजेरोनी उडवलं"

माझा डावा हात छाती कडे गेला...कळ आली...जोरात...

समोर मानसी होती...तिचे काळेभोर टपोरे डोळे...आज कुठलीही लाज न बाळगता तिने माझा हात घट्ट पकडला...आणि एकदाच ओढला...

मला पण एकदम हलकं वाटायला लागले...मी सगळ बळ एकवटून तिला करकचून मिठी मारली.

"अरे अमर!!! काय झाले तुला???" बॉसनी माझ्या घरी फोन लावला होता...

मी आणि मानसी १५-२० मिनिटांनी  ऑफिस बाहेर पडलो तेव्हा मृणाल माझ्याकडे एकदाही न बघता बॉस च्या केबिन मध्ये धावत गेली... आम्ही दोघे फक्त हसलो!

पण मनापासून विनंती...ह्याला "लफड" म्हणू नका राव...तसं काही घडलच नाही आणि खरच सांगतो, न घडताहि जाम त्रास झाला...म्हणून बोलतो please "लफड" म्हणू नका!
.........
.........
.........

Friday, December 27, 2013

Boris...


...BORIS...


  • You were ranked world no. 1 for only 12 weeks in 1991.
  • Never won a major ATP tournament on clay. 
  • You were convicted in Germany for tax evasion. 
  • Married a dark skinned first wife.
  • You had extra marital affair and fathered a baby girl, which costed you your first marriage...
  • 49 ATP Titles, 6 Grand Slam Majors, won only 3 out of 7 Wimbledon Finals, 
  • 10-4 against Agassi, 
  • 12-7 Sampras (lost all 3 Wimbledon encounters 1993 SF, 1995 F, 1997 QF)
  • Formidable records against all other opponents

A moderate career compared to Sampras, Federer or even Agassi, still you are my most favorite of them all ...you are one of my childhood hero's...You "lived life" on & off the court. 
I have read (presumably) all about you. keeping tab on you...you are now the head coach of Djokovic...hope he can emulate your "mental war-fare"... 

Five matches I desperately wanted you to win -
1)  1989 French Open SF against Edberg (you lost in 5th, despite being a break up)
2) 1989 French Final against Chang, which you would have won for sure - a Wishful Thinking
3) 1990 Wimbledon Final against Edberg (lost again in 5th set, despite being a break up)
4) 1995 Wimbledon Final against Pete Sampras - purely for emotional reasons. It was decade later than your very first Wimbledon
5) 1996 World ATP Tour Finals against Pete Sampras in Hanover. You had won more points than Sampras despite losing in 5..

You were 3 Majors short dear...A die hard fan of yours...I had complied a 3.5 hours of documentary on you...a great impact but have no further words to express...just like to say that - 

THANK YOU 
&
...I Will Always Love You... 

Friday, December 6, 2013

It's A Wonderful Life!!!

जेम्स स्टूअर्ट(१९०८ - १९९७)

माझी आणि तुझी ओळख २००४ ला झाली...सिंगापूरमध्ये.

एका शनिवारी संध्याकाळी एस्प्लनेड library मध्ये एकटाच आलो होतो. बायको आणि मुलगा भारतात आले होते...मला सुट्टी नव्हती मिळाली ...त्या काळात ५.१ DVD आणि home theater चं खूळ डोक्यात होते. घरी प्रत्येक भिंतीमधून आवाज येईल अशी सोय केली होती त्यामुळे तशाच DVD library मधून घ्यायच्या अस स्वतःला बजावले होते.

एस्प्लनेड library हि मुळात कशासाठी आहे हे जाणून ना घेता तिथल्या ५.१ वाल्या सगळ्या DVD बघून संपवल्या होत्या!

त्या संध्याकाळी जाम कंटाळलो होतो. एकता कपूर आणि तिच्या serials नी TV वर यत्र- तत्र -सर्वत्र धुमाकूळ घातला होता. मला त्या सर्वांकुशतेचा अत्यंत उबग असूनही, आता घरी जाऊन असलेली २-३ भारतीय TV channel अटळपणे बघावी लागणार ह्या विवंचनेत होतो...

मला स्वच्छ आठवते अजून - मी डोळे बंद करून स्वतःला बजावले...काहीही करून घरी जाऊन भंपक serials बघायच्या नाहीत ५.१ नसल्या तरी चालतील पण अत्यंत मोकळ्या मनानी आणि उघड्या डोळ्यांनी, कुठलाही चांगला वाटेल असा सिनेमा उचलायचा!

बहुतेक कुठला तरी देवदूत,  माझं ऐकत असावा...नक्कीच...

कारण अचानकपणे तू समोर  आलास! "जॉर्ज बेली" बनून... तू माझ्या आजोबांच्या वयाचा...पण तरी मी "अरे तुरे" च करतोय...मुद्दाम...आईला कोणी "अहो आई" म्हणत नाही...तसाच तुही, माझ्या अगदी जवळचा...

कुठेतरी खाली वाकून मी "इट्स ए वोन्डरफुल लाइफ" उचलून चाळला...तू आणि डोंना रीड...फ्रांक काप्रा...मग "ईन्हेरिट द विंड"...स्पेन्सर ट्रेसि पण सापडला...दोन्ही उचलून घरी आलो...अजिबात अपेक्षा नसताना अचानक पणे हातात दुर्मिळ खजिनाच लागला होता...

"सिनेमा क्लासिक" म्हणजे नक्की काय हे मला त्या दिवशी कळले १९४६ चा सिनेमा २००४ मध्ये बघताना
एक क्षणहि, अगदी पाण्यासाठी हि उठावसं वाटल नाही! आणि तुझ्या "जॉर्ज बेली" बद्दल काय बोलू?  सहज साधा जितका सिनेमा तितकीच तुझी निव्वळ अप्रतिम सहजता, अतिशय आपलासा वाटणारा तू! तुझा  "जॉर्ज बेली" हा कुठल्याही सिनेमा प्रेमी, दर्दी, अभाय्सक, अभिनेता कोणासाठीहि आणि कधीहि - सुंदर नैसर्गिक अभिनय म्हणजे काय? ह्याचा एक दस्त ऐवज आहे...राहील...अभिनय म्हणजे "EFFORTS TO SHOW EFFORTLESSNESS" हि व्याख्या ज्या अभिनेत्यांना मूर्तिमंत लागू पडते त्यात तुझा नंबर अतिशय वर लागेल!

तुझ्या  "जॉर्ज बेली" ने मला वेड लावले...  तू हि नेमका ६ फुट ३ इंच इतकाच उंच निघावास ना???

मग मी तुझ्या सिनेमाच्या शोधात  एस्प्लनेड library, चायना टाऊन पासून "तो पायोह" सेन्ट्रल...कधीहि आणि कुठेही, जिथे जिथे जुने इंग्लिश क्लासिक सिनेमा मिळतील असे वाटले, कळले तिथे तिथे तुझ्या मागे भटकलो...

...हार्वी, फिलाडेल्फिया स्टोरी, मि. स्मिथ गोज टू वाशिंगटन, मेड फोर इच अदर, नो टाइम फोर कॉमेडी, रोप, वर्टिगो, द मान हु न्यू टू मच, रिअर विंडो, Jackpot, कॉल नॉर्थसाईड ७७७, वायवाशिअस लेडी, द मान फ्रोम लारामी, अनातोमी ऑफ अ मर्डर,शेनांदोह, मि हॉब्स टेक्स अ वेकेशन, ग्लेन मिलर स्टोरी, द मान हु शॉट लिबर्टी वालांस, विन्चेस्तर ७३, ब्रोकन अरो, ग्रेटेस्ट शो ओन अर्थ ...

एका पाठोपाठ एक...तू निव्वळ अप्रतिम आहेस ह्या सगळ्यात...

तू आणि हिचकॉक, तू आणि अंथोनी मान, तू आणि हेन्री कोस्टर, तू आणि जोन फोर्ड...अश्या अभिनेता -दिग्दर्शक जोडीचे सिनेमे आवर्जून हुडकून काढले.

तू स्पेन्सर ट्रेसि (मलाया), कॅरी ग्रांट ( फिलाडेल्फिया स्टोरी), हेन्री फोंडा (ओन अवर मेरी वे, फायरक्रीक), जॉन वेन ( द मान हु शॉट लिबर्टी वालांस)  गोर्ज सी स्कॉट (अनातोमी ऑफ अ मर्डर), कथेलीन हेपबर्न(फिलाडेल्फिया स्टोरी), मार्लिन डीट्रीच (डेसट्री राईडस अगेन), कॅरोल लोम्बार्ड (मेड फोर इच अदर), रोसिलांड रसेल (नो टाइम फोर कॉमेडी), बेटी डेविस (राईट ऑफ वे, HBO movie) ह्या मात्तबर आणि तोलामोलाच्या अभिनेत्या, अभिनेत्री बरोबर तितक्याच सहज पणे काम केलेस.

राईट ऑफ वे मध्ये तू आणि बेटी डेविस जख्ख म्हातारे असताना केलेला सिनेमा...इच्छामरण ह्या नाजूक विषयावर...बायकोवर नितांत प्रेम करणारा आणि तिच्या मर्जी प्रमाणे वागणारा प्रेमळ नवरा केवळ तूच करू जाणे...

रोमांटिक कॉमेडी, वेस्टर्न स, कोर्टरूम ड्रामा, रहस्यपट, जीवनपट...अशा सगळ्या अतिशय भिन्न सिनेप्रकारात तू नेहमीच्याच सहज पणे वावरलास...

मला तू जाम आवडला होतास...मग माझ्या सवयी प्रमाणे, तुझ्याबद्दल जितके आणि जिथे वाचायला मिळेल तिथून आणून वाचले...ऐकले...पहिले...

भूमिकेच्या गरजेनुसार, पडद्यावर स्वतःला कमीपणा घ्यायला तुला कधीच "कमी" पणा वाटला नाही...ज्या काळात "बिलिंग" (पडद्या वर कोणाचे नाव पहिले दिसणार) साठी लोक झगडायचे तिथे तू स्पेन्सर ट्रेसि आणि कॅरी ग्रांट ला आरामांत "टोप बिलिंग" दिलेस...

सुखवस्तू घरातलं तुझ बालपण...उत्तम शिक्षण...तुलनेनी सहज पणे झालेला ब्रोड वे आणि हॉलीवूड मधला प्रवेश...

तुझी कारकीर्द ऐन भरात असताना, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या एअर फोर्स मध्ये तू दाखल झालास...तुझ्या तोळा मासा प्रकृती मुळे एकदा मेडीकल फेल झालास, तरीही तुझ्या संस्कारा प्रमाणे परत प्रयत्न केलास आणि काही "औस"नी दाखल झालास...युरोप मध्ये फाईटर पाईलट  म्हणून लढलास...

दुसऱ्या महायुद्धाच्या विश्वरूप दर्शनानी तू बदललास...चांगल्या साठी...अंग पिंडा नी सामान्य असूनही
अनेक "वेस्टर्न"स मध्ये दिसलेला तुझा कणखरपणा हा त्याचाच परिणाम असावा...

हेन्री फोंडा, मार्गारेट सुलेवान ह्यांच्या बरोबरची अगदी सुरवातीच्या काळातील मैत्री तू आयुष्यभर जपलीस...

फोंडा democratic आणि तू republican...दोन्ही कट्टर....४ -४ तास बसून विमानाची मॉडेल बनवताना फक्त २-३ वाक्य बोलायचात...शेवटी तो आजारी असताना रोज भेटायचास...

फोंडानी अनेक लग्न केली, तू एकच...तुझ्या वयाच्या ४२ व्या वर्षी...ग्लोरिया... तिच्या २ मुलांसकट तिला तू आपलेसे केलेस...तुमच्या दोन जुळ्या मुली .. मोठ्या मुलाचा विएतनाम युद्धात झालेला मृत्यू...सगळ सगळ तिच्या शेवटा पर्यंत एकत्र पाहिलंत...

मार्गारेट सुलेवान, मार्लिन डीट्रीच, जिंजर रोजर्स बरोबर तुझ्या प्रेमाच्या वावड्या तुझ्या लग्न आधीच्या (आणि फोंडाच्या सुरवातीच्या संगतीतल्या!)...

लग्नानंतर ग्रेस केली, किम नोवाक ह्यांच्या सारख्या सुंदर अभिनेत्री बरोबर काम करूनही तुझ नाव कधी कोणाशी जोडले गेले नाही (तुला AFI चा life time award मिळाला तेव्हा ग्रेस केली तुमच्या "रिअर विंडो" मध्यल्या केमिस्ट्री बद्दल मुद्दाम बोलली होती!)

आयुष्याच्या शेवटी कविताही केल्यास...

तुला एकदाच ऑस्कर मिळाले...त्याचं दुर्दैव!

Lifetime ऑस्कर मात्र ग्रांट च्या हातून मिळाले, त्यावेळी तुला तंगवत ठेवत हिचकॉकनी त्याला "नॉर्थ बाय नॉर्थ वेस्ट" हा अप्रतिमपट दिला होता, हे तुला दुखले असेल का?

पण त्याही पेक्षा पुरस्कार माझ्या मते तुला तुझ्या मरणोत्तर (आणि कोणालाही माहित नसलेला) मिळाला आहे - देव आनंद ह्या फक्त आणि फक्त स्वतःवरच आकंठ प्रेम केलेल्या महापुरुषानी, त्याच्या आत्मचरित्रा मध्ये (रोमांसिंग द लाइफ) तुझा उल्लेख त्याचा फेवरेट अभिनेता म्हणून केला आहे!!! (त्यानी तुझ्या कडून नक्की काय घेतले, हा वादग्रस्त विषय बाजूला ठेवूया...)

तुझे बहुसंख्य सिनेमा माझ्या संग्रही आहेत...जे मोजके नाहीत ते शोधतोय....शोधत राहीन...

तुझ्या सहज अभिनया व्यतिरिक्त,  व्यावसायिकता, एकनिष्ठता, देशभक्ती, अतूट मैत्री, सामाजिक बांधिलकी असे अनेक दुर्मिळ सद्गुण तू हॉलीवूड सरख्या मायावी दुनियेत राहूनही आजन्म पाळलेस...

देव अशा दुर्मिळ लोकांना जसा बोलावतो, तशाच "शांत" पणे, एका सकाळी झोपेत, त्याच्याहि सेवेत रुजू झालास...

...It was truly & deservedly, a Wonderful, Wonderful Life!!!














Sunday, December 1, 2013

घुसमट...निव्वळ घुसमट


पहाट झाली...सोमवार...मोरू उठला...मोरूनी एकदा अलार्म स्नूझ केला, परत वाजला ...मग शेवटी २-३ वेळा स्नूझ केल्यावर चडफडत उठला...रोज उठतो तसाच...मोरूची बायको अगोदरच उठली होती...नेहमी प्रमाणे...सगळ नेहमी प्रमाणेच चालले होते...काल परवा घडले तसेच आणि उद्या परवाही असेच घडणार ह्याची मोरू सकट सगळ्यांना खात्रीच होती...

त्या सकाळी छोट्या मोरूची स्कूल बस चुकली...हे जरा नवीन होते...मोरूला आता झक मारत  स्कूटर वरून शाळेत जावे लागणार! कुरबुर कोणाकडे करणार? गेला...सकाळी स्कूटर थंड पडली होती...तिला किक मारता मारता मोरूला घाम फुटला...मग जीव खाऊन मोरुनी परत एकदा किक मारली...स्कूटर गरम झाली...मोरूच्या डोक्यापेक्षा कमी...मोरू काहीच बोलला नाही...छोट्या मोरूला मागे बसवत आणि त्याची bag मागे लावत, मोरू निघाला...छोटा मोरू गुणी होता...आपल्या मित्रांचे बाबा त्यांना  मस्त कारनी सोडतात आणि आपले बाबा स्कूटरनी...छोटा मोरू काही बोलला नाही...कशावरही न बोलणे हे मोरूचे गुण(???) छोट्यानी घेतले असावेत...ह्याचा हि मोठे पणी "मोरू" होणार??? मोरूला भडभडून आले...पण बोलला नाहीच...

मोरू घरी आला...रेडीओ वर नवीन गाणी लागली होती...मोरूनी बंद केली...अंघोळी नंतर पूजा...मनात भलतेच विचार...तोंडी स्तोत्र...पूजा संपताना भान आले...शेवटचा नमस्कार मनापासून केला मोरुनी...रोज करायचा तसाच...

मोरूची बायको पण गुणी...सुगरण...डबा तयार होता...तोंडली ची भाजी...मोरूला आवडत नाही अजिबात...पण बोलला नाही...कालच स्वतः भाजी आणली होती...सध्या तोंडली, शेपू आणि फरसबी घेतली तरच महिना निघेल...सोमवारी तोंडली, मंगळ ला शेपू, मग दाल...शनिवारी -रविवारी मात्र "कांदा" भजी आणि "बटाटा" वडा!!! मोरूच्या तोंडाला पाणी आले...ते तसेच परतवत मोरुनी सोस्क्स घातले...उजव्या अंगठ्याला भोक पडले होते...वेळेत नखं कापत नाही आपण...पण आज मंदिरात जायचे नाहीये...आत्ता घातले कि रात्रीच काढणार...आज डब्यात फेरीवाला येईल CST ला तेव्हा नक्की घेऊ २ जोड ....मोरू फक्त स्वतःशीच बोलला...

मोरूनी स्कूटर ला किक मारली...आत्ता चक्क एका किक मध्ये सुरु झाली...मोरूला आनंद झाला...रोज व्हायचा तसाच...पण हसला मात्र नाही... आपला आनंद स्कूटर ला कळला तर परत बंद पडेल ह्या भीतीने...
मोरूच्या बायकोनी tata केला...मोरुनी हेल्मेट मधले डोकं हलवलं...त्याला वाटले बायको हसली...नेहमी प्रमाणे...

मोरूची बायको पण आता कामाला निघणार...छोटा मोरू शाळेतून थेट शेजारच्या बिल्डिंग मधल्या फडके मावशीकडे...

स्टेशन वर स्कूटर लावली...एका दिवसाचे २० रु??? अरे कल तक १० था ना???.... क्या साब ? हम को बी मेहेंगाई है ना?? मोरूनी न बोलता रिसीट घेतली...

मोरू दिसयला बरा होता...सुटला नव्हता...तरुणपणी व्यायाम करायचा...स्टेशनवर जत्रा...मोरूला घाम फुटला...नेहमी प्रमाणेच...गाडी आली...मोरू हलला...१५ सेकंदात तो आत भिरकावला गेला होता...रोज सकाळी ह्या ३०-४० सेकंदात आपल्या मध्ये दैवी शक्ती संचारते असे त्याला वाटले...नेहमी प्रमाणे...आपण शेवटचा नमस्कार मनापासून करतो...देव आहे नक्की...ह्या पेक्षा अजून काय पुरावा पाहिजे???

न बोलणारा मोरू...ट्रेन मध्ये तो सगळ्यांचे फक्त ऐकायचा...त्याच्या ह्या "Listening Skills" मुळे, ग्रुप चा लाडका होता... त्या बदल्यात त्याला रोज सकाळ-संध्याकाळ १५-२० मिनिटे बसायला मिळायचे...देव अनेक रूपांनी भेटतो...

राणे बोलला - मोऱ्या कालची match बघितली का? काय खेळला तेंडल्या? पण साला ओउट होतो नको तेव्हा...
राणेनी पुढची १० मिनिटे क्रिकेट टीम ची घेतली... स्केअरलेग ला काय स्केअरकट मारली रे !!! मोरूनी फक्त चुळबुळ केली...बोलला नाहीच...

मग सावंतनी पत्ते काढले...जोशी बोलले- "अरे आज सकाळी  भजन ना रे सावत्या??? आठवड्याच्या सुरवातीला जरा..." जोशी काकाचे सगळे (थोडे फार) ऐकायचे

मग जीतेन्द्रनी झांजा काढल्या...गुरवनी खिडकीच्या शेजारी ठेका धरला...जोशी सुटले..."माझे माहेर पंढरी...."
जोशी ना किशोर आणि रफी आवडायचे...त्याच संस्कारात त्यांनी भीमसेन ना घेतले...मोरू काहीच बोलला नाही...मोरूनी माना हलवत, डोळे मिटून टाळ्या वाजवल्या...कुर्ल्याला मोरूला कोणी तरी बसवले...

CST ला सगळे विरळ झाले...मोरू हि निघाला...चालत...आज खूप उन आहे...बस घ्यावी का? पाय घुटमळले जरा...मग घड्याळ बघितले...२०-२५ मिनिटे होती...तसाही काल जरा ५-७ बटाटे वडे जास्त खाल्ले होते...चालूया...

मोरूला जाम घाम आला होता...मग प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेली पाण्याची बाटली काढली...शुष्क ओठ, थोडे ओले झाले...सगळी बाटली संपवायची नाही...

ऑफिस आले... सर्वात पहिल...रेस्ट रूम... मोकळा झाला...घामाची अंघोळ झाली होती...तोंड धुतले...कोणी आजू बाजूला नही हे पाहत, दोन्ही काखापण handwash नी ओल्या केल्या... आता AC मध्ये सलग ३० मिनिटे बसायाचेच...शर्ट सुकला पाहिजे...नाहीतर कुबट वास...शेजारी (मिस) अंजली बसते...

हळू हळू सगळे आले...३० मिनिटात मोरूनी इंटरनेट वर लोकसत्ता आणि म.टा..वाचून घेतले होते...
५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार... मोरू खुर्चीत थोडा हलला...१८०० कोटीचा नवीन घोटाळा...मोरू चुळबुळला...सेन्सेक्स थोडा वर, बराच खाली...मोरू स्वतःशी पण काही बोलला नाही...
दिवसाचे भविष्य..."आज नवीन प्रारंभ"...मोरू सुखावला...आज सकाळी छोट्या मोरूला शाळेत सोडले...काहीतरी वेगळा घडल...आज नक्की काहीतरी छान घडणार... एक कटिंग घेऊया का? नको अंजली येऊ दे...अंजली??? नुसत्या एकेरी उच्चारानी त्याला उन्माद आला, पण नेहमी प्रमाणेच स्वतःशी हि काहीच बोलला नाही...

मग अंजली आली...आज हळदी रंगाच्या सलवार कमीज मध्ये सॉलिड मस्त दिसत होती...अजून लग्न झाले नव्हते तिचे...वयानी १० वर्षांनी लहान असेल, पण मोरूला मित्र मानायची...सगळं शेअर करायची...तिच लग्न ठरत नव्हते...मोरूला ती जाम आवडायची...एके दिवशी हि लग्नाची गुड (???) न्यूज ऐकवेल हि भीती त्याला रोज वाटायची... ती बोलायची... मोरू नुसता ऐकायचा...कधीच काही बोलला नाही...बोलणारहि नव्हता...न बोलताही शेट्टी त्याला चिडवायचाच...पण मोरू त्यालाहि कधी काही बोलला नाही...

अंजली त्याच्या cubicle कडे घुटमळली...त्याने वर बघितले...ती हसली..."आज नवीन प्रारंभ"... मोरू चक्क हसला...मोरू हसताना छान दिसायचा, पण....दोघे चहाला गेले...शेट्टीनी मोरूला डोळा मारला...मोरू हसायचा थांबला...अवघडला...इतक्या सगळ्या ऑफिस मध्ये अंजली फक्त आपल्या बरोबरच बोलते ह्याचे त्याला जाम अप्रूप होते...लहानपणी एकदा तो वर्गात दुसरा आला होता, त्या इतकेच...

"तुला काहीतरी सांगायचे होते...सांगू?"....मोरुनी मान हलवली..."माझा 'पिरीअड' मिस झालाय रे!"..मोरू चा चेहरा थोडा हलला..."तुला कळले का?"...मोरूनी न बोलता आठ्या आणल्या..."शेखर...माझा बोय फ्रेंड..."

...अंजली??? गेली ३-४ वर्ष आपण रोज बोलतो...तू काहीच बोलली नाहीस त्याच्या बद्दल? आज हे direct असं ?? लाज नाही वाटत?  सगळ सगळ फक्त मनात...मग अंजलीच बोलली..."मला माहिती आहे, मी नाही बोलले त्याचा बद्दल...पण तुला आवडले नसते ना?..."काय??? माझ्या आवडी निवडी बद्दल तुला एवढी काळजी??? आणि आत्ता पिरीअड मिस झाल्या वर सांगतेस?"...परत सगळे मनातच...मोरू आतून जाम ढवळून निघाला होता...मोरू न बोलताच उठला...अंजलीनेही एक चकार शब्द काढला नाही... हा "नवीन प्रारंभ"???.....पुरुष आणि स्त्री, REBT...कधीतरी मोरुनी "अल्बर्ट एलीस" वाचला होता...आज कामाला आला...

सकाळभर मोरू कोणाशीच बोलला नाही...कोणालाच फरक पडला नाही...तशी सवयच नव्हती कोणाला...

मोरू आज lunch ला एकटाच...सोबत तोंडली आणि चपाती...सॉरी...पोळी...

दुपारी बॉसनी केबिन मध्ये बोलावले...मोरू घाबरला...नेहमी प्रमाणे...बॉसनी नेहमी प्रमाणे त्याची सगळंच्या सामोर काढली...न बोलणारी लोकं, soft target...अंजली पण मध्ये पडली नाही आज...मिटिंग संपल्यावर अब्बासनी खांद्यावर हलकेच दाबले...सांत्वनपर...मोरू बधीर होता...नेहमी प्रमाणे...सगळे गेल्यावर त्याला उगाचच डोळ्याच्या कडा ओल्या झाल्यागत वाटल्या...पण काहीच बोलला नाही...

संध्याकाळी CST...तोच राणे, सावंत, जितु, जोशी काका...दोन्ही गुढघ्यावर, कळ लागे पर्यंत  पत्ते खेळायची सुटकेस ठेवण्याची त्याची तयारी असायची...आज जाम नको वाटत होते,  पण न बोलता दादर लाच बसला...निमूट पणे डावाचा स्कोर लिहित राहिला..."नवीन प्रारंभ"???

मोरूचे स्टेशन आले...बायकोचा SMS आला होता...घरी जाताना मोरू न विसरता फुलपुडी आणि कोथिंबीर जुडी घेऊन आला...

आज चक्क तो बायकोच्या आधी आला होता...छोटा मोरू पण आला ५ मिनिटात...आल्या आल्या त्यानी मोरूला मिठी मारली...मग bag कोपऱ्यात फेकली ....मोरूच्या हातचा दुधाचा ग्लास गटा-गटा पिऊन बिल्डिंग खाली खेळायला पण गेला...

अजून बायको का नाही आली??? मोरूला परत "नवीन प्रारंभ" आठवले... मोरूनी कुकर लावला...खिडकीत आला...खाली एक SWIFT आली...घाई घाईत मोरूची बायको उतरली..."Bye शेखर...." म्हणत लगबगीने बिल्डिंग मध्ये आली....नक्की शेखर बोलली का? छे! आपल्याला भास झाला असेल... अंजली बरोबरच संभाषण आठवले...मोरूला आपल्याला चक्क राग येतो आहे असा भास झाला...पण काहीच बोलला नाही...

मग बायकोनी नेहमीच्याच तत्परतेनी स्वयंपाक केला...जेवताना आज तुला कुठली ट्रेन मिळाली? माझी कशी चुकली मग लिफ्ट मिळाली असे रोजचेच कंटाळवाणे विषय झाले...छोटा मोरू जाम कंटाळला होता पण मोठ्या मोरू प्रमाणे काही बोलला नाही....

मोरुनी रात्री बायकोशी नुसतीच जवळीक करायचा प्रयत्न केला...संवाद नव्हताच हल्ली...पण म्हणून विसंवाद पण नव्हता...बायकोनी झिडकारले....जाऊ दे! दमली असेल...मोरूनी नेहमी प्रमाणे स्वतःची समजूत काढली...

मोरुनी कूस वळवली...त्याची उशी त्याच्या नकळत "खारी" झाली...मोरू थोडा रिता झाला...नेहमी प्रमाणेच...

मग त्याला "नवीन प्रारंभ" आठवले...मोरू हसला...थोडा जोरात...मग अजून जोरात...हसायलाच लागला...थांबेच ना...मोरूची बायको उठली...छोटा मोरू पण उठला...काय झाले ???

मोरूने एक क्षण थबकून दोघांकडे बघितले...मग मात्र, मोरू हसतच राहिला...कायमचा!!!
...........................
...........................
...........................








Sunday, November 24, 2013

तो...



लहानपणी आई-बाबां बरोबर कुठल्याश्या सिनेमाला गेलो होतो...कुठला ते नक्की आठवत नाही आता...पण एक "तो" आठवतो. त्याचं निव्वळ "असणं" मी नकळतपणे टिपून घेत होतो...त्या नंतर आज-आत्तापर्यंत,
"तो" माझ्या सोबत असतो, सतत कुठे ना कुठे, कसाही कधीही...लहानपणी आणि अजूनही तुझ्यामुळे मी कधी "एकटा" असलो  तरी राहिलो नही, राहत नाही...माझा जन्म १९७३ ला...मी गर्भात असताना माझ्या वर "बॉबी" आणि "जन्जीर" चे "गर्भसंस्कार" झाले... तुझ्याशी नाळ जुळणे हे विधिलिखितच होते.

तो अचाट अभिनय करतो, हसतो, रडतो, चिडवतो, प्रेम करतो, सगळ-सगळ करतो... कधी जाम  चुकतो...पण मला जाम आवडतो...त्याच्या बद्दल बोलताना, लिहताना मी लहान होतो...अगदी लहान...म्हणूनच लहान मुलाला एकदा माणूस आवडला कि मग त्याची व्यंग हि दिसेनाशी होतात किंवा दुर्लक्षित तरी...माझ "टाइम मशीन" मधून निर्वाण होते...आठवणीच्या जंगलात...

....जन्जीर, अभिमान, दिवार, त्रिशूल,काला पथ्थर, डॉन, मिली, चुपके चुपके, शोले, शक्ती, बेमिसाल, बेनाम, जुर्माना, आलाप, इन्कलाब, शराबी, मि. नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर, दो अनजाने, दोस्ताना,   सत्ते पे सत्ता, सिलसिला, अदालत, कभी कभी, नमक हराम, नमक हलाल, बरसात कि एक रात, आखरी रास्ता, (थोडा) खुद्दार, अग्निपथ, मै आझाद हू,  चीनी कम, खाकी, Black, अमर अकबर अंथोनी, निशब्द,  विरुद्ध,  देव, (अर्धा) याराना, (थोडा) अंधा कानुन, अक्स, बागबान , (थोडा) इमान धरम , (थोडा) कोहराम...

आज तुझ्या बद्दल लिहतोय...कुठून सुरवात करू? नाना पाटेकर, वजूद मध्ये माधुरी ला म्हणाला होता - "कैसे बताउ तुझे, तुम मेरे लिये कौन हो..." 

 तू "परवाना" मध्ये ओम प्रकाश ला मारलास तिथून कि "रेश्मा और शेरा" मध्ये वाहिदाच्या पायावर मूक बधीर लोळण घेतलीस तिथून  कि  "आनंद" मध्ये बुजून गेला होतास तिथून? तू "बॉम्बे टू गोवा" मध्ये अवघडून वावरलास आणि नाचलास तिथून कि ज्या "रस्ते का पथ्थर " ला बघून जावेदनी तुला "जन्जीर" ऐकवला तिथून?....

जाऊ दे...जे सगळ, सगळ्यांना माहित आहे त्या बद्दल बोलण्यात काय अर्थ आहे???

पण तुला जे माहित नाही ते सांगतो...

"काला पथ्थर" ला माझा छोटा मामा मला न घेता चालला होता...केवढा मोठा अपराध केला त्यांनी...व्यायाम करत असूनही त्याला माझ्या हातून त्याचा उजवा पाय सोडवता सोडवता नाकी नऊ आले होते!

"डॉन" आणि "त्रिशूल" मी असंख्य वेळा बघितले आहेत...सार्वजनिक गणेशोत्सव..त्यात तुला उजवहि बघितलय...उलट्या बाजूनी !!!

तुला पडद्यावर मरताना बघून जाम रडलोय. अजूनही रडतो...रडत राहीन...

"नमक हराम" मध्ये राजेश खन्ना ला "विल यु प्लीज शट अप एन्द गेट ऑउट" म्हणताना सिमी बोलायच्या आत तुझ्या आवाजातली रागा पेक्षा मित्रापासून दुरावल्याची तीव्र वेदना, मी आधीच नोंदवली होती...

तुझा "मि. नटवरलाल" बघून मला आलेला ताप, पटकन आणि कुठलीही गोळी न घेता उतरला होता..

"शक्ती" बघितल्या वर माझ्या बाबांच्या वयाच्या, शेजारील काका-काकू बरोबर तू दिलीप कुमार समोर
कसा कमी पडला नाहीस ते बाळबोध पण ठाम पणे मांडले होते...

"बेमिसाल" मध्ये ओम शिव पुरी गेल्या वर तू दगड होतोस आणि माझा बर्फ...तुझ आणि राखी मधल "सखी" च नात...माझ्या साठी एक मृगजळ...

तू डबिंग करताना श्वासोच्छवास आणि ओठ विलग होतानाचा पण आवाज कसा सोडत नाहीस???

८२ ला तू मरणार अशी "अफवा" आली होती...मग रोज बातम्या यायच्या...तू "clinically dead" कसा असू शकतोस? माझ्या बाल मनानी ती "अफवा" कधीच स्वीकारली नाही...तू वाचलास...तुझा "कुली" मग (रद्दड असूनही) नेहमीच्याच आवेशात बघितला होता... कोल्हापूरला...देवी दर्शनां नंतर मग देव दर्शन...पडद्या वर कधीतरी आले "इस शॉट मे चोट लागी थी..." तेव्हा ती अफवा नव्हती हे जाणवले...

सुट्टीत एका सकाळी बाबांनी स्पोन्सेर केल्यामुळे "स्नेक इन द मंकीज शाडो" बघितला होता माझ्या (मामे ) मामा बरोबर...मग त्याचं दिवशी "शराबी" कसा बघणार??? मग (मामे) मामानीच  सुचवल्या प्रमाणे कुठलीही लाज न बाळगता आजोबांकडे (त्याच्या बाबांकडे) बोललो होतो - "माझ्या बाबांनी आम्हाला सकाळी सिनेमा दाखवला ना? मग आता तुम्ही दाखवा!!! "शराबी" तर बघितला, पण त्या नंतर अनेक वर्ष कधीही समोर आलो तरी ..."जावयाचे पोर..हरा XX र " असे लाडिक पण बोचणारे चिमटे आजोबा काढत राहिले... आजही अनकेदा "शराबी" (मनापासून) बघताना, ते चिमटे पण टोचतात रे!

मग मध्ये सगळे बोलत होते कि तू देशद्रोही आहेस! अरे काय वाट्टेल ते काय बोलता? "शहेनशाह" च्या पोस्टर ला काळे फासता??? तुम्ही "देशप्रेमी" आणि "इन्कलाब" नाही बघितला? सिनेमे बघा सिनेमे...काय पण उगाच!!!

करंदीकर सर १०वी  ला इंग्लिश शिकवायचे तेव्हा मी तुझे "शहेनशाह" मधले संवाद माझ्या मित्रांना जसे च्या तसे ऐकवायचो...वेगळी किक मिळायची!!!

१० वीच्या prelim ला, हिंदी-संस्कृत च्या आधी, मी न बघितलेला तुझा कालिया repeat मध्ये लागला होता...माझी जाम चुळबुळ चालू होती...माझ्या बाबांनी मला खर कारण विचारल...सांगितले...कालिया बघितला...हिंदी-संस्कृत मध्ये ८४ आले !

"गंगा जमुना सरस्वती" अत्यंत वाईट असणार आहे, असे मला आतून वाटत असावे, म्हणून मी तो (सगळे मित्र जाऊनही) बघितलाच नाही..तुझी "प्रतिमा" तुझ्या पेक्षा मला प्रिय होती!

१२ त असताना बाबाना सिविअर heart attack आला होता, prelim हॉस्पिटल मधून ये जा करून दिली होती...
final ची तयारी नव्हती...४ थ्या मजल्या वरचे घर बदलून नवीन भाड्याचे घर मिळतंय का ह्याची पायपीट सुरु होती...पण तरीही दिली...तुझा अग्निपथ ३ वेळा बघितला होता...लोकांना म्हणे तुझा आवाज तू मुद्दाम बदललाय हे कळल नाही...त्यातली कविता रोज सायकलनी कोलेजला जाताना घोकायचो...फर्स्ट क्लास आला...

तुझ्या "तुफान" आणि "जादूगर" ने हि कसे पैसे गमावले नाहीत (पुकार, नास्तिक, महान आणि बेशरम प्रमाणे) हे स्वत:ला आणि मित्रांना (मनाविरुद्ध) ऐकवायचो...

"हम" चालला तेव्हा वाटल, तू आलास परत...Tiger...नुसतीच आशा...

"डिप्लोमा" ला गणित मला जाम अवघड वाटायचे (अजूनही!) मग गणिताचा पेपर चांगला गेला...तर आणि तरच तुझा "खुदा गवाह"  बघून celebrate करायचे असे ठरवले होते...चांगला गेला...परीक्षा संपली त्या दिवशी गेइटी ला जाऊन बघितला...

बी.इ. ला होतो तेव्हा तू घरी बसला होतास, पांढरी दाढी वाढवून...मग TV किंवा repeat मध्ये अग्निपथ ची परायणे (तू बॉब क्रिस्तो ला गोळी घालताना फक्त तुझ्या चेहऱ्या वरून गोळ्या झाडल्या हे अफाट पोचवतोस रे) ...किंवा "मै आज भी फेके हुए पैसे नही उठता" बघत दिवस काढले... मी बी.इ. फारसे enjoy केले नही त्याचे हे तर कारण नव्हते ना??

तुझ्या "मृत्युदाता" साठी खास "शिट्टी" शिकायचं ठरवल होते, पण सिनेमा बघताना सगळ अवसानच गळाले..

"लाल बादशाह" आणि "सुर्यवंशम" जर १० वर्षा पूर्वी केले असतेस तर "सुपर हिट" झाले असते रे...तू उत्तम होतास त्यात (कितीही चपला पडल्या मला ह्या वर तरीही चालतील) पण वय??? ते कसे उलटे फिरवणार???

"बडे मिया..." मध्ये गोविंदा कडून ६-०, ६-०,६-१ हरलास..."बूम" हि केलास...पण मी जिवंत राहिलो...

प्रेमात पडलो तेव्हा सिलसिला, कभी कभी, शराबी, सत्ते पे सत्ता  मधल्या कविता, गाणी नेहमी मनात रुंजी घालायचे...

तुझे घर ओलीस पडले, सगळे तुझ्या विरोधात गेले...नाही नाही ते बोलले...मी जाम अस्वस्थ होतो पण तुझ्यावरचा विश्वास ढळला नाही..कधीच...शप्पथ!

तुझा solid comeback... KBC साठी घरात आलास...छान वाटलं रे ! तुझ्या बाबांच्या उत्तुंग नावाला गालबोट न लावू देता, लोकं retire होतात  त्या वयात जगाला परत केलेली पै न पै...सगळ अतिशय अभिमानानी बघत होतो...ज्या लोकांनी तुझ्या नावानी बोट मोडली, त्यांची बोट तोंडात घालायला लावायची तुला १९६९ पासून सवय होती...तू तुझ्या सवयीला जागलास आणि मी "तुझ्या" सवयीला...

तुझ्या वरच्या (अंध)प्रेमा मुळे, तुझ्या अभिनयात "ढ" असलेल्या मुलाचे सिनेमे पण काही काळ बघितले...

तू दिलीप कुमार, संजीव कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शाहरुख, नाना पाटेकर, ओम पुरी, कदर खान, मिथुन, ऋषी, गोविंदा,  तब्बू ,जया, रेखा, राणी मुकर्जी ह्यांच्या सामोर उभा ठाकलास...झुंजलास...(कमल हसन बरोबर चा "खबरदार" रिलीज होऊ द्यायला हवा होतास रे ! ) बरेच जिंकलास...थोडे बरोबरीत सोडवलेस..एकच हरलास .. पण कधीच कोणालाच घाबरला नाहीस (शशी, धर्मेंद्र, जितेंद्र, शत्रू, अजय देवगण, अक्षय कुमार इत्यादी, इत्यादींना मी तुझ्या सोबत आणू इच्छित नही)...नसीर (आणि बरेच लोक, बरेचदा)  तुला तुझ्या सिनेमाच्या चोईस वरून (स्वतःचे झाकून)  टोचून, घालून पडून बोलले पण तू कधी उलट उत्तर घातले नाहीस...ती सवयच नही तुला!

एकदा नसीर बरोबर काम करून त्याची हि हौस फेडावीस अशी एक मनापासून इच्छा आहे...तू रोबेर्ट दि नेरो किंवा अल पचिनो बरोबर कस काम केले असतेस? असा "मानसिक प्रयोग" अनेकदा करून बघितला आहे...तिथेहि तू बरोबरीतच राहशील ह्याची मला तरी १००% खात्री आहे...BTW तुझे अपूर्ण सिनेमे "फिल्म हि फिल्म" किंवा "यार मेरी जिन्दगी" रूपांनी कपाटात आहेत (त्यांच्या जोडी ला जमानत, शु बाईट, खबरदार, कधी येणार ह्या प्रतीक्षेत आहे...)

तू बदलत्या जगा बरोबर स्वतःला बदलस...अजिबात, अजिबात,  सोप नाही ते..आज मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी तू अनेक मध्यमातून सर्वत्र असतोस...तुझ्या अर्ध्या वयाच्या लोकां बरोबर काम करतोस...रोज ४ ला gym ला जातोस...आपल्या उत्तुंग यशा पेक्षा आपल्या मुलाचे ढळढळीत अपयश तुला रोज टोचत असणार...आजही तुझ्या पाठी - तुझं घर कसे चालणार? तुझी बायको आणि सून निट नांदतील का? मुलगा आणि सून एकत्र राहतील का? असे असंख्य प्रश्न, माझा अजिबात संबंध नसताना निव्वळ आणि निव्वळ तुझ्या प्रेमापोटी पडतात !!!

बस यार, अजून काय आणि किती लिहू??? केहने को बहोत कुछ है मगर....

आजी औक्षण करताना नेहमी म्हणते - "कापसा सारखा म्हतारा हो"...

मी मरेपर्यंत काम करत राहा (महा) राजा !  जमेल ना तुला ?

तुझा,
......
......
......