Sunday, December 1, 2013

घुसमट...निव्वळ घुसमट


पहाट झाली...सोमवार...मोरू उठला...मोरूनी एकदा अलार्म स्नूझ केला, परत वाजला ...मग शेवटी २-३ वेळा स्नूझ केल्यावर चडफडत उठला...रोज उठतो तसाच...मोरूची बायको अगोदरच उठली होती...नेहमी प्रमाणे...सगळ नेहमी प्रमाणेच चालले होते...काल परवा घडले तसेच आणि उद्या परवाही असेच घडणार ह्याची मोरू सकट सगळ्यांना खात्रीच होती...

त्या सकाळी छोट्या मोरूची स्कूल बस चुकली...हे जरा नवीन होते...मोरूला आता झक मारत  स्कूटर वरून शाळेत जावे लागणार! कुरबुर कोणाकडे करणार? गेला...सकाळी स्कूटर थंड पडली होती...तिला किक मारता मारता मोरूला घाम फुटला...मग जीव खाऊन मोरुनी परत एकदा किक मारली...स्कूटर गरम झाली...मोरूच्या डोक्यापेक्षा कमी...मोरू काहीच बोलला नाही...छोट्या मोरूला मागे बसवत आणि त्याची bag मागे लावत, मोरू निघाला...छोटा मोरू गुणी होता...आपल्या मित्रांचे बाबा त्यांना  मस्त कारनी सोडतात आणि आपले बाबा स्कूटरनी...छोटा मोरू काही बोलला नाही...कशावरही न बोलणे हे मोरूचे गुण(???) छोट्यानी घेतले असावेत...ह्याचा हि मोठे पणी "मोरू" होणार??? मोरूला भडभडून आले...पण बोलला नाहीच...

मोरू घरी आला...रेडीओ वर नवीन गाणी लागली होती...मोरूनी बंद केली...अंघोळी नंतर पूजा...मनात भलतेच विचार...तोंडी स्तोत्र...पूजा संपताना भान आले...शेवटचा नमस्कार मनापासून केला मोरुनी...रोज करायचा तसाच...

मोरूची बायको पण गुणी...सुगरण...डबा तयार होता...तोंडली ची भाजी...मोरूला आवडत नाही अजिबात...पण बोलला नाही...कालच स्वतः भाजी आणली होती...सध्या तोंडली, शेपू आणि फरसबी घेतली तरच महिना निघेल...सोमवारी तोंडली, मंगळ ला शेपू, मग दाल...शनिवारी -रविवारी मात्र "कांदा" भजी आणि "बटाटा" वडा!!! मोरूच्या तोंडाला पाणी आले...ते तसेच परतवत मोरुनी सोस्क्स घातले...उजव्या अंगठ्याला भोक पडले होते...वेळेत नखं कापत नाही आपण...पण आज मंदिरात जायचे नाहीये...आत्ता घातले कि रात्रीच काढणार...आज डब्यात फेरीवाला येईल CST ला तेव्हा नक्की घेऊ २ जोड ....मोरू फक्त स्वतःशीच बोलला...

मोरूनी स्कूटर ला किक मारली...आत्ता चक्क एका किक मध्ये सुरु झाली...मोरूला आनंद झाला...रोज व्हायचा तसाच...पण हसला मात्र नाही... आपला आनंद स्कूटर ला कळला तर परत बंद पडेल ह्या भीतीने...
मोरूच्या बायकोनी tata केला...मोरुनी हेल्मेट मधले डोकं हलवलं...त्याला वाटले बायको हसली...नेहमी प्रमाणे...

मोरूची बायको पण आता कामाला निघणार...छोटा मोरू शाळेतून थेट शेजारच्या बिल्डिंग मधल्या फडके मावशीकडे...

स्टेशन वर स्कूटर लावली...एका दिवसाचे २० रु??? अरे कल तक १० था ना???.... क्या साब ? हम को बी मेहेंगाई है ना?? मोरूनी न बोलता रिसीट घेतली...

मोरू दिसयला बरा होता...सुटला नव्हता...तरुणपणी व्यायाम करायचा...स्टेशनवर जत्रा...मोरूला घाम फुटला...नेहमी प्रमाणेच...गाडी आली...मोरू हलला...१५ सेकंदात तो आत भिरकावला गेला होता...रोज सकाळी ह्या ३०-४० सेकंदात आपल्या मध्ये दैवी शक्ती संचारते असे त्याला वाटले...नेहमी प्रमाणे...आपण शेवटचा नमस्कार मनापासून करतो...देव आहे नक्की...ह्या पेक्षा अजून काय पुरावा पाहिजे???

न बोलणारा मोरू...ट्रेन मध्ये तो सगळ्यांचे फक्त ऐकायचा...त्याच्या ह्या "Listening Skills" मुळे, ग्रुप चा लाडका होता... त्या बदल्यात त्याला रोज सकाळ-संध्याकाळ १५-२० मिनिटे बसायला मिळायचे...देव अनेक रूपांनी भेटतो...

राणे बोलला - मोऱ्या कालची match बघितली का? काय खेळला तेंडल्या? पण साला ओउट होतो नको तेव्हा...
राणेनी पुढची १० मिनिटे क्रिकेट टीम ची घेतली... स्केअरलेग ला काय स्केअरकट मारली रे !!! मोरूनी फक्त चुळबुळ केली...बोलला नाहीच...

मग सावंतनी पत्ते काढले...जोशी बोलले- "अरे आज सकाळी  भजन ना रे सावत्या??? आठवड्याच्या सुरवातीला जरा..." जोशी काकाचे सगळे (थोडे फार) ऐकायचे

मग जीतेन्द्रनी झांजा काढल्या...गुरवनी खिडकीच्या शेजारी ठेका धरला...जोशी सुटले..."माझे माहेर पंढरी...."
जोशी ना किशोर आणि रफी आवडायचे...त्याच संस्कारात त्यांनी भीमसेन ना घेतले...मोरू काहीच बोलला नाही...मोरूनी माना हलवत, डोळे मिटून टाळ्या वाजवल्या...कुर्ल्याला मोरूला कोणी तरी बसवले...

CST ला सगळे विरळ झाले...मोरू हि निघाला...चालत...आज खूप उन आहे...बस घ्यावी का? पाय घुटमळले जरा...मग घड्याळ बघितले...२०-२५ मिनिटे होती...तसाही काल जरा ५-७ बटाटे वडे जास्त खाल्ले होते...चालूया...

मोरूला जाम घाम आला होता...मग प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेली पाण्याची बाटली काढली...शुष्क ओठ, थोडे ओले झाले...सगळी बाटली संपवायची नाही...

ऑफिस आले... सर्वात पहिल...रेस्ट रूम... मोकळा झाला...घामाची अंघोळ झाली होती...तोंड धुतले...कोणी आजू बाजूला नही हे पाहत, दोन्ही काखापण handwash नी ओल्या केल्या... आता AC मध्ये सलग ३० मिनिटे बसायाचेच...शर्ट सुकला पाहिजे...नाहीतर कुबट वास...शेजारी (मिस) अंजली बसते...

हळू हळू सगळे आले...३० मिनिटात मोरूनी इंटरनेट वर लोकसत्ता आणि म.टा..वाचून घेतले होते...
५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार... मोरू खुर्चीत थोडा हलला...१८०० कोटीचा नवीन घोटाळा...मोरू चुळबुळला...सेन्सेक्स थोडा वर, बराच खाली...मोरू स्वतःशी पण काही बोलला नाही...
दिवसाचे भविष्य..."आज नवीन प्रारंभ"...मोरू सुखावला...आज सकाळी छोट्या मोरूला शाळेत सोडले...काहीतरी वेगळा घडल...आज नक्की काहीतरी छान घडणार... एक कटिंग घेऊया का? नको अंजली येऊ दे...अंजली??? नुसत्या एकेरी उच्चारानी त्याला उन्माद आला, पण नेहमी प्रमाणेच स्वतःशी हि काहीच बोलला नाही...

मग अंजली आली...आज हळदी रंगाच्या सलवार कमीज मध्ये सॉलिड मस्त दिसत होती...अजून लग्न झाले नव्हते तिचे...वयानी १० वर्षांनी लहान असेल, पण मोरूला मित्र मानायची...सगळं शेअर करायची...तिच लग्न ठरत नव्हते...मोरूला ती जाम आवडायची...एके दिवशी हि लग्नाची गुड (???) न्यूज ऐकवेल हि भीती त्याला रोज वाटायची... ती बोलायची... मोरू नुसता ऐकायचा...कधीच काही बोलला नाही...बोलणारहि नव्हता...न बोलताही शेट्टी त्याला चिडवायचाच...पण मोरू त्यालाहि कधी काही बोलला नाही...

अंजली त्याच्या cubicle कडे घुटमळली...त्याने वर बघितले...ती हसली..."आज नवीन प्रारंभ"... मोरू चक्क हसला...मोरू हसताना छान दिसायचा, पण....दोघे चहाला गेले...शेट्टीनी मोरूला डोळा मारला...मोरू हसायचा थांबला...अवघडला...इतक्या सगळ्या ऑफिस मध्ये अंजली फक्त आपल्या बरोबरच बोलते ह्याचे त्याला जाम अप्रूप होते...लहानपणी एकदा तो वर्गात दुसरा आला होता, त्या इतकेच...

"तुला काहीतरी सांगायचे होते...सांगू?"....मोरुनी मान हलवली..."माझा 'पिरीअड' मिस झालाय रे!"..मोरू चा चेहरा थोडा हलला..."तुला कळले का?"...मोरूनी न बोलता आठ्या आणल्या..."शेखर...माझा बोय फ्रेंड..."

...अंजली??? गेली ३-४ वर्ष आपण रोज बोलतो...तू काहीच बोलली नाहीस त्याच्या बद्दल? आज हे direct असं ?? लाज नाही वाटत?  सगळ सगळ फक्त मनात...मग अंजलीच बोलली..."मला माहिती आहे, मी नाही बोलले त्याचा बद्दल...पण तुला आवडले नसते ना?..."काय??? माझ्या आवडी निवडी बद्दल तुला एवढी काळजी??? आणि आत्ता पिरीअड मिस झाल्या वर सांगतेस?"...परत सगळे मनातच...मोरू आतून जाम ढवळून निघाला होता...मोरू न बोलताच उठला...अंजलीनेही एक चकार शब्द काढला नाही... हा "नवीन प्रारंभ"???.....पुरुष आणि स्त्री, REBT...कधीतरी मोरुनी "अल्बर्ट एलीस" वाचला होता...आज कामाला आला...

सकाळभर मोरू कोणाशीच बोलला नाही...कोणालाच फरक पडला नाही...तशी सवयच नव्हती कोणाला...

मोरू आज lunch ला एकटाच...सोबत तोंडली आणि चपाती...सॉरी...पोळी...

दुपारी बॉसनी केबिन मध्ये बोलावले...मोरू घाबरला...नेहमी प्रमाणे...बॉसनी नेहमी प्रमाणे त्याची सगळंच्या सामोर काढली...न बोलणारी लोकं, soft target...अंजली पण मध्ये पडली नाही आज...मिटिंग संपल्यावर अब्बासनी खांद्यावर हलकेच दाबले...सांत्वनपर...मोरू बधीर होता...नेहमी प्रमाणे...सगळे गेल्यावर त्याला उगाचच डोळ्याच्या कडा ओल्या झाल्यागत वाटल्या...पण काहीच बोलला नाही...

संध्याकाळी CST...तोच राणे, सावंत, जितु, जोशी काका...दोन्ही गुढघ्यावर, कळ लागे पर्यंत  पत्ते खेळायची सुटकेस ठेवण्याची त्याची तयारी असायची...आज जाम नको वाटत होते,  पण न बोलता दादर लाच बसला...निमूट पणे डावाचा स्कोर लिहित राहिला..."नवीन प्रारंभ"???

मोरूचे स्टेशन आले...बायकोचा SMS आला होता...घरी जाताना मोरू न विसरता फुलपुडी आणि कोथिंबीर जुडी घेऊन आला...

आज चक्क तो बायकोच्या आधी आला होता...छोटा मोरू पण आला ५ मिनिटात...आल्या आल्या त्यानी मोरूला मिठी मारली...मग bag कोपऱ्यात फेकली ....मोरूच्या हातचा दुधाचा ग्लास गटा-गटा पिऊन बिल्डिंग खाली खेळायला पण गेला...

अजून बायको का नाही आली??? मोरूला परत "नवीन प्रारंभ" आठवले... मोरूनी कुकर लावला...खिडकीत आला...खाली एक SWIFT आली...घाई घाईत मोरूची बायको उतरली..."Bye शेखर...." म्हणत लगबगीने बिल्डिंग मध्ये आली....नक्की शेखर बोलली का? छे! आपल्याला भास झाला असेल... अंजली बरोबरच संभाषण आठवले...मोरूला आपल्याला चक्क राग येतो आहे असा भास झाला...पण काहीच बोलला नाही...

मग बायकोनी नेहमीच्याच तत्परतेनी स्वयंपाक केला...जेवताना आज तुला कुठली ट्रेन मिळाली? माझी कशी चुकली मग लिफ्ट मिळाली असे रोजचेच कंटाळवाणे विषय झाले...छोटा मोरू जाम कंटाळला होता पण मोठ्या मोरू प्रमाणे काही बोलला नाही....

मोरुनी रात्री बायकोशी नुसतीच जवळीक करायचा प्रयत्न केला...संवाद नव्हताच हल्ली...पण म्हणून विसंवाद पण नव्हता...बायकोनी झिडकारले....जाऊ दे! दमली असेल...मोरूनी नेहमी प्रमाणे स्वतःची समजूत काढली...

मोरुनी कूस वळवली...त्याची उशी त्याच्या नकळत "खारी" झाली...मोरू थोडा रिता झाला...नेहमी प्रमाणेच...

मग त्याला "नवीन प्रारंभ" आठवले...मोरू हसला...थोडा जोरात...मग अजून जोरात...हसायलाच लागला...थांबेच ना...मोरूची बायको उठली...छोटा मोरू पण उठला...काय झाले ???

मोरूने एक क्षण थबकून दोघांकडे बघितले...मग मात्र, मोरू हसतच राहिला...कायमचा!!!
...........................
...........................
...........................








1 comment:

  1. खंरच - फुलपुडी ते कोथिंबीर जुडी सगळ समावीष्ट.. काही न बोलणारा पण खमंग..

    ReplyDelete