![]() |
जेम्स स्टूअर्ट(१९०८ - १९९७) |
एका शनिवारी संध्याकाळी एस्प्लनेड library मध्ये एकटाच आलो होतो. बायको आणि मुलगा भारतात आले होते...मला सुट्टी नव्हती मिळाली ...त्या काळात ५.१ DVD आणि home theater चं खूळ डोक्यात होते. घरी प्रत्येक भिंतीमधून आवाज येईल अशी सोय केली होती त्यामुळे तशाच DVD library मधून घ्यायच्या अस स्वतःला बजावले होते.
एस्प्लनेड library हि मुळात कशासाठी आहे हे जाणून ना घेता तिथल्या ५.१ वाल्या सगळ्या DVD बघून संपवल्या होत्या!
त्या संध्याकाळी जाम कंटाळलो होतो. एकता कपूर आणि तिच्या serials नी TV वर यत्र- तत्र -सर्वत्र धुमाकूळ घातला होता. मला त्या सर्वांकुशतेचा अत्यंत उबग असूनही, आता घरी जाऊन असलेली २-३ भारतीय TV channel अटळपणे बघावी लागणार ह्या विवंचनेत होतो...
मला स्वच्छ आठवते अजून - मी डोळे बंद करून स्वतःला बजावले...काहीही करून घरी जाऊन भंपक serials बघायच्या नाहीत ५.१ नसल्या तरी चालतील पण अत्यंत मोकळ्या मनानी आणि उघड्या डोळ्यांनी, कुठलाही चांगला वाटेल असा सिनेमा उचलायचा!
बहुतेक कुठला तरी देवदूत, माझं ऐकत असावा...नक्कीच...
कारण अचानकपणे तू समोर आलास! "जॉर्ज बेली" बनून... तू माझ्या आजोबांच्या वयाचा...पण तरी मी "अरे तुरे" च करतोय...मुद्दाम...आईला कोणी "अहो आई" म्हणत नाही...तसाच तुही, माझ्या अगदी जवळचा...
कुठेतरी खाली वाकून मी "इट्स ए वोन्डरफुल लाइफ" उचलून चाळला...तू आणि डोंना रीड...फ्रांक काप्रा...मग "ईन्हेरिट द विंड"...स्पेन्सर ट्रेसि पण सापडला...दोन्ही उचलून घरी आलो...अजिबात अपेक्षा नसताना अचानक पणे हातात दुर्मिळ खजिनाच लागला होता...
"सिनेमा क्लासिक" म्हणजे नक्की काय हे मला त्या दिवशी कळले १९४६ चा सिनेमा २००४ मध्ये बघताना
एक क्षणहि, अगदी पाण्यासाठी हि उठावसं वाटल नाही! आणि तुझ्या "जॉर्ज बेली" बद्दल काय बोलू? सहज साधा जितका सिनेमा तितकीच तुझी निव्वळ अप्रतिम सहजता, अतिशय आपलासा वाटणारा तू! तुझा "जॉर्ज बेली" हा कुठल्याही सिनेमा प्रेमी, दर्दी, अभाय्सक, अभिनेता कोणासाठीहि आणि कधीहि - सुंदर नैसर्गिक अभिनय म्हणजे काय? ह्याचा एक दस्त ऐवज आहे...राहील...अभिनय म्हणजे "EFFORTS TO SHOW EFFORTLESSNESS" हि व्याख्या ज्या अभिनेत्यांना मूर्तिमंत लागू पडते त्यात तुझा नंबर अतिशय वर लागेल!
तुझ्या "जॉर्ज बेली" ने मला वेड लावले... तू हि नेमका ६ फुट ३ इंच इतकाच उंच निघावास ना???
मग मी तुझ्या सिनेमाच्या शोधात एस्प्लनेड library, चायना टाऊन पासून "तो पायोह" सेन्ट्रल...कधीहि आणि कुठेही, जिथे जिथे जुने इंग्लिश क्लासिक सिनेमा मिळतील असे वाटले, कळले तिथे तिथे तुझ्या मागे भटकलो...
...हार्वी, फिलाडेल्फिया स्टोरी, मि. स्मिथ गोज टू वाशिंगटन, मेड फोर इच अदर, नो टाइम फोर कॉमेडी, रोप, वर्टिगो, द मान हु न्यू टू मच, रिअर विंडो, Jackpot, कॉल नॉर्थसाईड ७७७, वायवाशिअस लेडी, द मान फ्रोम लारामी, अनातोमी ऑफ अ मर्डर,शेनांदोह, मि हॉब्स टेक्स अ वेकेशन, ग्लेन मिलर स्टोरी, द मान हु शॉट लिबर्टी वालांस, विन्चेस्तर ७३, ब्रोकन अरो, ग्रेटेस्ट शो ओन अर्थ ...
एका पाठोपाठ एक...तू निव्वळ अप्रतिम आहेस ह्या सगळ्यात...
तू आणि हिचकॉक, तू आणि अंथोनी मान, तू आणि हेन्री कोस्टर, तू आणि जोन फोर्ड...अश्या अभिनेता -दिग्दर्शक जोडीचे सिनेमे आवर्जून हुडकून काढले.
तू स्पेन्सर ट्रेसि (मलाया), कॅरी ग्रांट ( फिलाडेल्फिया स्टोरी), हेन्री फोंडा (ओन अवर मेरी वे, फायरक्रीक), जॉन वेन ( द मान हु शॉट लिबर्टी वालांस) गोर्ज सी स्कॉट (अनातोमी ऑफ अ मर्डर), कथेलीन हेपबर्न(फिलाडेल्फिया स्टोरी), मार्लिन डीट्रीच (डेसट्री राईडस अगेन), कॅरोल लोम्बार्ड (मेड फोर इच अदर), रोसिलांड रसेल (नो टाइम फोर कॉमेडी), बेटी डेविस (राईट ऑफ वे, HBO movie) ह्या मात्तबर आणि तोलामोलाच्या अभिनेत्या, अभिनेत्री बरोबर तितक्याच सहज पणे काम केलेस.
राईट ऑफ वे मध्ये तू आणि बेटी डेविस जख्ख म्हातारे असताना केलेला सिनेमा...इच्छामरण ह्या नाजूक विषयावर...बायकोवर नितांत प्रेम करणारा आणि तिच्या मर्जी प्रमाणे वागणारा प्रेमळ नवरा केवळ तूच करू जाणे...
रोमांटिक कॉमेडी, वेस्टर्न स, कोर्टरूम ड्रामा, रहस्यपट, जीवनपट...अशा सगळ्या अतिशय भिन्न सिनेप्रकारात तू नेहमीच्याच सहज पणे वावरलास...
मला तू जाम आवडला होतास...मग माझ्या सवयी प्रमाणे, तुझ्याबद्दल जितके आणि जिथे वाचायला मिळेल तिथून आणून वाचले...ऐकले...पहिले...
भूमिकेच्या गरजेनुसार, पडद्यावर स्वतःला कमीपणा घ्यायला तुला कधीच "कमी" पणा वाटला नाही...ज्या काळात "बिलिंग" (पडद्या वर कोणाचे नाव पहिले दिसणार) साठी लोक झगडायचे तिथे तू स्पेन्सर ट्रेसि आणि कॅरी ग्रांट ला आरामांत "टोप बिलिंग" दिलेस...
सुखवस्तू घरातलं तुझ बालपण...उत्तम शिक्षण...तुलनेनी सहज पणे झालेला ब्रोड वे आणि हॉलीवूड मधला प्रवेश...
तुझी कारकीर्द ऐन भरात असताना, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या एअर फोर्स मध्ये तू दाखल झालास...तुझ्या तोळा मासा प्रकृती मुळे एकदा मेडीकल फेल झालास, तरीही तुझ्या संस्कारा प्रमाणे परत प्रयत्न केलास आणि काही "औस"नी दाखल झालास...युरोप मध्ये फाईटर पाईलट म्हणून लढलास...
दुसऱ्या महायुद्धाच्या विश्वरूप दर्शनानी तू बदललास...चांगल्या साठी...अंग पिंडा नी सामान्य असूनही
अनेक "वेस्टर्न"स मध्ये दिसलेला तुझा कणखरपणा हा त्याचाच परिणाम असावा...
हेन्री फोंडा, मार्गारेट सुलेवान ह्यांच्या बरोबरची अगदी सुरवातीच्या काळातील मैत्री तू आयुष्यभर जपलीस...
फोंडा democratic आणि तू republican...दोन्ही कट्टर....४ -४ तास बसून विमानाची मॉडेल बनवताना फक्त २-३ वाक्य बोलायचात...शेवटी तो आजारी असताना रोज भेटायचास...
फोंडानी अनेक लग्न केली, तू एकच...तुझ्या वयाच्या ४२ व्या वर्षी...ग्लोरिया... तिच्या २ मुलांसकट तिला तू आपलेसे केलेस...तुमच्या दोन जुळ्या मुली .. मोठ्या मुलाचा विएतनाम युद्धात झालेला मृत्यू...सगळ सगळ तिच्या शेवटा पर्यंत एकत्र पाहिलंत...
मार्गारेट सुलेवान, मार्लिन डीट्रीच, जिंजर रोजर्स बरोबर तुझ्या प्रेमाच्या वावड्या तुझ्या लग्न आधीच्या (आणि फोंडाच्या सुरवातीच्या संगतीतल्या!)...
लग्नानंतर ग्रेस केली, किम नोवाक ह्यांच्या सारख्या सुंदर अभिनेत्री बरोबर काम करूनही तुझ नाव कधी कोणाशी जोडले गेले नाही (तुला AFI चा life time award मिळाला तेव्हा ग्रेस केली तुमच्या "रिअर विंडो" मध्यल्या केमिस्ट्री बद्दल मुद्दाम बोलली होती!)
आयुष्याच्या शेवटी कविताही केल्यास...
तुला एकदाच ऑस्कर मिळाले...त्याचं दुर्दैव!
Lifetime ऑस्कर मात्र ग्रांट च्या हातून मिळाले, त्यावेळी तुला तंगवत ठेवत हिचकॉकनी त्याला "नॉर्थ बाय नॉर्थ वेस्ट" हा अप्रतिमपट दिला होता, हे तुला दुखले असेल का?
पण त्याही पेक्षा पुरस्कार माझ्या मते तुला तुझ्या मरणोत्तर (आणि कोणालाही माहित नसलेला) मिळाला आहे - देव आनंद ह्या फक्त आणि फक्त स्वतःवरच आकंठ प्रेम केलेल्या महापुरुषानी, त्याच्या आत्मचरित्रा मध्ये (रोमांसिंग द लाइफ) तुझा उल्लेख त्याचा फेवरेट अभिनेता म्हणून केला आहे!!! (त्यानी तुझ्या कडून नक्की काय घेतले, हा वादग्रस्त विषय बाजूला ठेवूया...)
तुझे बहुसंख्य सिनेमा माझ्या संग्रही आहेत...जे मोजके नाहीत ते शोधतोय....शोधत राहीन...
तुझ्या सहज अभिनया व्यतिरिक्त, व्यावसायिकता, एकनिष्ठता, देशभक्ती, अतूट मैत्री, सामाजिक बांधिलकी असे अनेक दुर्मिळ सद्गुण तू हॉलीवूड सरख्या मायावी दुनियेत राहूनही आजन्म पाळलेस...
देव अशा दुर्मिळ लोकांना जसा बोलावतो, तशाच "शांत" पणे, एका सकाळी झोपेत, त्याच्याहि सेवेत रुजू झालास...
...It was truly & deservedly, a Wonderful, Wonderful Life!!!
No comments:
Post a Comment