Wednesday, December 30, 2015

तुला काय फरक पडतो? (पार्ट -२)


तुला काय फरक पडतो ?(पार्ट -२)
 
ती भारता बाहेर चालली होती सध्या तरी ६ महिन्या साठीच, बिजनेस विसा वर. सगळी तयारी झाली होती तिची. आई, बाबा, नातेवाईक आणि तिचा होणारा नवरा सगळेच चिंतामिश्रीत आनंदात होते. म्हणजे लग्नाची तारीख आता ६-८ महिने आणखिन पुढे गेली हि झाली प्रामुख्यानी आई - बाबांची “चिंता”, तर दुसरीकडे ह्याच कारणानी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला झालेला “आनंद”!

एकच दिवस उरला होता. सगळ सुरळीत असूनही तिला उगाच घाबर-घुबर वाटत होतं.  सगळी कागद पत्र, सामान  ३- ३ वेळा तपासून बघितलं होतं. इमिग्रेशन मध्ये न चालणारे पदार्थ इत्यादी बाजूला काढून झाले होते. रोज skype वर विडीयो कॉल करायचं ठरलं होतं. अगदी त्याचंहि टेस्टिंग करून झालं होतं. होणारा नवरा सतत बरोबर होता. “आता ६ महिने दुसरी सोय बघयला हवी रे” हे तो त्याच्या मित्रा बरोबर मस्करीत (??) बोलताना ऐकूनही तिने, तो (वरून तरी) खूप काळजी दाखवत होता, ह्याच गोष्टीत समाधान मानलं होतं. 

ह्या आधीहि ती परदेशात जाऊन आली होती. तसं नाविन्य नव्हतंच. तरीही हि कसली हूर हूर लागली आहे हे तिला कळेनासे झाले होते.

शनिवार संध्याकाळ -  तिचा होणारा नवरा time please घेऊन जरा घरी जाऊन येतो आणि डिनर च्या वेळी तिला पिक अप करेल बोलला. तिने हसून मानेनेच होकार दिला. आता ती स्वतःच्या रूम मध्ये ती एकटीच बसली होती.  आई बाहेरूनच बोलली – “आम्ही जरा मंदिरात आणि भाजी घेऊन येतो गं”. ती आतूनच जोरात हो बोलली. दार बंद झाल्याचा आवाज आला. 

मग तिने चाळा म्हणून tv लावला – ती स्वतःच्याच तंद्रीत होती. ट्रान्स मध्ये असल्यागत. तेव्हाच tv वर कोणी तरी गात होतं – “....मरने के बाद भी मेरी आंखे खुली रही, आदत पडी थी इन्हे इंतजार कि....” आणि तिची छाती उगाच धापापायला लागली. ती गझल संपली आणि तिला अजूनच कसंनुस वाटायला लागलं. 

मोकळी हवा घ्यावी असं वाटलं आणि ती तशीच उठली. घरच्या दाराला latch होतं. तिने चावी घेतली, दार ओढलं आणि २ जिने चढून गच्ची वर गेली. छान संधीप्रकाश होता. ती एकटीच होती गच्ची वर. खाली खूप वर्दळ पण वरती पूर्ण एकांत. बर वाटलं २ क्षण तिला. गेले काही दिवस स्वतः साठी वेळच मिळाला नव्ह्ता. अंधार थोडा गडद झाला तसा गारवा वाढला. तिने स्वतः भोवतीच तिचे हात ओढले.

इतक्यात मागे चाहूल लागली, गच्चीचा दरवाजा हलकेच उघडला होता.  ती जरा सावध होऊन कानोसा घेत होती. दरवाजा जरा आणखिन उघडला आणि तिने सावधपणे पण  जोरात “कोण आहे?” असं विचारलं. 

हवेतला गारवा जरा अचानकच वाढला होता. दारामागून अडखळून आवाज आला – “मी...मी आहे, अमित”. तिने मागे वळून बघितलं. अमितला तिथे बघून तिच्या चेहऱ्यावर २ क्षण आनंद उमटून गेला असं तिला स्वतःच वाटलं.

अमितला ती एका आठवड्यापूर्वी ऑफिस च्या पार्किंग लॉट मध्ये भेटली होती. तेव्हा ती  एकच वाक्य तटकन तोडून बोलली होती. त्यानंतर त्याची नजर भेट टाळून ती तशीच चालती झाली तरी, त्याची मूकवेदना तिला पाठमोरीहि जाणवली होती.

ते आठवून तिला ओशाळ वाटलं. ती हलकसं हसून बोलली “ये रे, पण तू अचानक कसा आलास आज? माझी flight तर उद्या आहे नं?”.

अमित मात्र गप्पच राहिला. तो जवळ पण आला नाही, तिथेच थोडा लांब उभा राहिला. अमित एकच आठवड्यात बारीक झाला होता.  दाढी वेडी वाकडी वाढली होती. त्याचा एरवी चांगला असलेला चेहरा आता पार विस्कटला होता. अंगात नाईट सूट आणि पायात बेडरूम मधल्या चप्पल होत्या चक्क. तिला आश्चर्यच वाटलं. पण काहीच बोलू शकली नाही. जणू बोलती बंद झाली होती तिची.

सरते शेवटी त्याचा अवतार बघत बघत तिची नजर त्याच्या डोळ्यांकडे गेली. एवढ्या सगळ्या अवतारात पण त्याचे डोळे मात्र विलक्षण बोलके झाले होते. त्यांची नजर भेट झाली आणि घट्ट नजर बंदीच झाली तिची.

आता सगळी कडे शांतता होती, कुठलेच आवाज येत नव्हते.  सगळं सिनेमा सारखं भर-भर नजरे समोरून गेलं तिच्या.

अमित आणि तिची ओळख काही महिन्यापूर्वीची. तिला अमित आवडायचा. अगदी पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून आणि अमितला आपण निःसंशय पणे आवडतो हे सांगायला तिला स्त्री असायची गरज नव्हती. तसं दुर्दैव म्हणायचं, तर ते हे कि त्यांच्या पहिल्या भेटी आधीच दोघेही वेग वेगळे engaged होते.

ती घरात धाकटी बहिण, लाडाची आणि “साजूक” मध्यमवर्गीय संस्कार कोळून प्यायलेली आणि तो हि पापभिरू, आप-आपल्या engagement च “निवडूंगा”चे कुंपण China wall असल्यागत दडपून बघणारा.

सुरवात ऑफिसमध्ये चहा, कॉफी नि झाली ती जेवणापलीकडे गेली नाही. जाणारच नव्हती. सरड्याचीच मजल ती. पण फोन नं मात्र दिले घेतले. मग दिवस नाही कि रात्र नाही, whats app वर दोघे भेटतच राहिले. “तुला कुठला रंग छान दिसेल” ह्या पासून सुरु झालेले संवाद, त्या रंगातल्या पूर्ण कपड्यामधले फोटो देवाण घेवाण करण्या पर्यंत मजल गेली.

एकदा मात्र  “निवडुंग” मनोमन टोचल तिला आणि परिणामी “गिल्टी फिलिंग” पण आलं. ‘होणारा नवरा हा सर्वतोपरी उत्तम आणि भर भक्कम असूनही अमित बरोवर आपण दिवस रात्र का बोलतो?’. हे काहीतरी “स्पेशल” आहे हे तिलाही मनोमन कळले होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आवडतं पण होते.

पण हे काहीतरी “स्पेशल”, साजूक मध्यमवर्गीय संस्कारात कुठे कोंबायचं हे मात्र तिला कळत नव्हतं. अस्वस्थता माग सोडत नव्हती. तरीही whats app वर बोलण सुरूच राहिलं. 

मग एका शनिवारी, अपरात्री, तिचा मोबाईल अपघातानीच तिच्या बाबांच्या हाती लागला. अमित बरोबर ची chat window दिसली. जे व्हायचं तेच झालं. त्या क्षणीच तिच्या whats app वर अमित block झाला होता.  पण अमितने आक्रस्ताळेपणा केला नाही कि कॉल हि केला नाही. ती परत ऑफिस मध्ये भेटे पर्यंत थांबला. 

तिने जे झालं ते मोघमपणेच सांगितलं आणि ओझरतं “सॉरी” बोलली. ते सांगताना ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. अमितनी नेहिमीप्रमाणे नुसत ऐकून घेतलं. त्याला वाईट वाटलाय का? असलं तरी चेहऱ्यावर दिसत नव्हते. एरवीही तो कसलाच हट्ट, त्रागा करायचा नाही. तिच्या बरोबर जी आणि जेवढी सोबत मिळेल त्या सोबती मध्येच संतुष्ट असायचा. तिला हे बरेचदा खटकायचं. त्याच्या समजूतदारपणा वर खुश व्हावं कि त्याच्या अशा अव्यक्त वागण्यावर त्याच्या डोक्यावर टणा-टणा काही आपटाव? मग मनापासून राग यायचा -  “हा शुंभ! कधीच काही बोलत नाही. स्वतः कुठलाच पुढाकारपण घेत नाही आणि मी मात्र मुर्खासारखी ह्याच्या वर इतका वेळ खर्च करते!!!”

whats app बंद झालं पण ऑफिस तर सुरु होतं. तिचं लग्न आता ३ – ४ महिन्यावर येऊन ठेपल होतं. रोजचा एकत्र चहा आणि कधीतरी जेवण सुरुच होतं. ते निमित्तच होतं म्हणा. एकमेकाला भेटायला, nonsense बोलायला आणि नसलेल्या जोकवर हसून उजळायला दोघांना आवडत होतं. मग सलग २-३ दिवस ते सकाळ- दुपार- संध्याकाळ, डॉक्टरनी ३ वेळच्या तापाच्या गोळ्या दिल्यागत भेटले.  मग एकदा परत  “निवडुंग” मनोमन टोचल तिला – मग त्या दिवशीच्या ३रया वेळी “आपण खूप भेटतोय हल्ली” असं बोलून गेली.
पुढचे २ दिवस न भेटता गेले, इतकच!

त्यानंतर तिनेच त्याला कॉल केला – संध्याकाळी चहाला भेट बोलली – त्याच्या होकारात, कधी नव्हे इतका उत्साह होता.

२ दिवसात अमितच्या दाढीची खुंट वाढली होती. चहा वर तिने जुनं प्रोजेक्ट कसं संपेल लवकरच आणि नवीन प्रोजेक्ट मधल्या onsite opportunity बद्दल सांगितलं. “बिजनेस विसा वर ६ महिने जावं लागेल, कदाचित जास्तपण राहावं लागेल. offshore साठी पण प्रयत्न करते आहे. लग्न आहे नं?”. 

अमितचा चेहरा पार पडला, पण नेहमी प्रमाणे तो काहीच फारसं बोलला नाही. तिने उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या. शेवटी त्यान मोघम “ऑल द बेस्ट” केला आणि दोघं निघाले. आता मात्र तिला अमितचा प्रचंड राग आला होता. “हा बिनडोक, कधीतरी काही बोलणार आहे का????”. परत चालताना, तिचा चहाचा रिकामा कप हातातून निसटला आणि खळकन फुटला. सगळ्यांनी वळून बघितलं. अमित पटकन खाली वाकला, तुकडे गोळा करायला. आता तिला आणखीनच राग आला त्याचा, ती काही न बोलता तशीच रागानी तरा-तरा  निघुन पण गेली. डेस्क वर येई पर्यंत सबंध वेळ ती फणफणत होती.

अमितनी समजा पुढाकार घेतला तरी – “आपण स्वतः “निवडूंगा” चे कुंपण आणि “साजूक” मध्यमवर्गीय संस्कार ओलांडू शकतो का?” ह्या विचारांनी तिला अजूनच गोंधळायला झालं.
 

‘त्याने पुढाकार तर घ्यावा पण तो घेतला तर पुढे काय ते मात्र समजत नाही आणि तरीही त्यानी एकदा स्पष्ट बोलायला काय हरकत आहे?”  अशा विचित्र मनस्थितीत ती डेस्क वर नुसताच कामाचं सोंग  करत बसली होती.

इतक्यात तिचा मोबईल वायब्रेट झाला. अमितचा SMS आला होता. “मी प्रार्थना करीन, तुला offshore प्रोजेक्ट मिळव म्हणून”. ती आणखीनच फणफणली – “कशाला??? offshore मिळाले तरी तुला काय फरक पडतो रे बिनडोक???”  समोर असता तर काहीतरी फेकून मारलं असत तिने! रागापेक्षा वेदना जास्त होती तिच्या त्र्याग्या मध्ये!

आज दोघांनी कार जवळ जवळच पार्क केली होती.  संध्याकाळी घरी जाताना अमित समोर येऊ नये असं तिला वाटत असतानाच, नेमकी दोघांची निघायची वेळ जुळून आली!

पार्किंग लॉट मध्ये समोर समोर आले. आता पर्याय नव्हता. ती चिडलेली दिसतच होती. अमितनी परत SMS चा मेसेज रिपीट केला आणि तिचा कडेलोट झाला – आलेला सगळा राग एकवटून, जितकं कडवटपणे बोलता येईल तसं तोडून बोलली त्याला   - “मी सरळच विचारतेय - मी भारतात राहिले किंवा बाहेर गेले, तुला काय फरक पडतो? आपण फक्त मित्र आहोत. ह्या पलीकडे आपल्यात काही आहे अस जर तुला वाटत असेल तर ते साफ चूक आहे”.

त्या संध्याकाळ नंतर आज दिसत होता अमित. त्याला बघून तिला खरं तर छान वाटत होतं. त्याची नजरबंदी जरा कमी तीव्र झाली होती. आता तिला स्वतः चा श्वास ऐकू येऊ लागला होता.  आता ती सगळं बळ एकवटून एकदाच हसली त्याच्या कडे बघून.

अमित पण समजूतीचं मोकळं हसला आणि २-३ पावले मागे सरकला. निरोपाचं निघणं असतं तसच. आता त्याचा अवतार ठीक झाला होता, दाढी साफ झाली होती, एकूणच चेहरा उजळला होता पण डोळे मात्र निस्तेज झाले होते. नजरबंदी पूर्ण संपली होती आता.
  
तिला मात्र आता खूप दिवसाचं मनावरचं ओझं उतरल्यागत थकवा आला होता. वेळेचं भान आलं. “बापरे! किती वेळ गेला? नेहमीप्रमाणेच ह्याच्या बरोबर असलो कि वेळेचं भान राहिलं नाही आपल्याला!” ह्या विचारात असतानाच, तिचा मोबाईल खणखणला.

तिच्या ऑफिस मधल्या मित्राचा फोन होता. उद्या सी ऑफ ला येणारच होते सगळे मग, अचानक शनिवारी संध्याकाळी कसा काय फोन केला ह्यानी? हा प्रश्न डोक्यात घोळवीत तिने फोन उचलला. तिने हेल्लो म्हणताच, समोरून तिचा मित्र पटकन सांगून मोकळा झाला - “sad न्यूज, अमित इज नो मोर!” ती बधीर झाली,  पुढचं तिने काही ऐकलंच नाही.

नजर थोडी वर गेली तर अमित समोर नव्ह्ता.  ती एकटीच होती गच्ची वर.

हवेतला गारवा आता कमी झाला होता.

इतक्यात तिचा होणारा नवरा गच्ची चा दरवाजा उघडून धपापत आत आला  – “अरे यार, तू इथे आहेस काय! चल डिनर ला जायचंय नं?”.  लागलेला श्वास घेत घेत तो बोलला. ती मात्र निश्चल उभी होती. हातातला मोबाईल अजून त्याच अवस्थे मध्ये होता. डोळे भरून आले होते.

तिच्या कडे बघून कधीही बांध फुटेल असं वाटत होत. तिने आपलं ऐकलं कि नाही हे त्याला कळले नाही त्यामुळे त्यानी जवळ येऊन  तिला दोन्ही हातानी धरलं आणि तिने भानावर यावं यासाठी त्यानं जरा हलवलं, - “ए वेडा बाई, काय झालं गं?”. त्या हलण्यानी तिचे अश्रू गालावर ओघळले आणि ती एकदम भानावर आली. तिने कसनुसं हसत मानेनेच नकारार्थी मान हलवली.

गच्ची तून त्याच्या बरोबर खाली उतरताना परत एकदाच मागे वळून बघितलं. नजरेत “कदाचित, एकदाच अमित दिसेल? शेवटचा?” असे भाव एकवटले होते. पण आता गच्ची पूर्ण रिकामी होती. तिने मूक पणे ओढणी तोंडाला लावत हुंदका दिला आणि होणाऱ्या नवऱ्याच्या खांद्यावर मान ठेवून निघून गेली.

१५ -२० दिवसांनी onsite ऑफिस मधून status call चालला होता.  शेवटी बाकीचे सगळे “लॉग ऑफ” झाल्यावर, मित्रानी तिला ओझरतं कळवलं – ‘अमितच्या दर्भाला पटकन कावळा शिवला”. तिने नेहमीच्याच वरदर्शी कोरडेपणा दाखवत, काही न बोलताच फोन कट केला. पण मनात एक अनाहूत समाधान होतं.

तिची नजर तिच्या डेस्क वर असलेल्या छोटेखानी “निवडूंगा” वर गेली. त्यावर एक छानसं छोटं फुल उगवलं होतं आणि त्यावर सकाळचा कोवळा प्रकाश पडत होता. तिला हसतानाचा अमित आठवला आणि  चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी मंद हसू आले....


Sunday, December 20, 2015

तुला काय फरक पडतो?


तुला काय फरक पडतो?

“मी सरळच विचारतेय - मी भारतात राहिले किंवा बाहेर गेले, तुला काय फरक पडतो? आपण फक्त मित्र आहोत. ह्या पलीकडे आपल्यात काही आहे अस जर तुला वाटत असेल तर ते साफ चूक आहे”. शुक्रवारी संध्याकाळी पार्किंग लॉट मध्ये ती तटकन तोडून बोलली.

अमित आतून हलला, मग कळवळून बोलला -  “अगदी बरोबर! मला काय फरक पडतो? हा गौण आणि किरकोळ मुद्दा आहे.  तुला जसं हवं आहे तसं घडो, हि ईश्वर चरणी प्रार्थना.”

तिचा “तुला काय फरक पडतो?” हा प्रश्न अमितला प्रचंड लागला, आतमध्ये “टेंगुळ” पण आले असेल पण – “जिगर का दर्द
उपर से मालूम होता है? कि जिगर का दर्द उपर से नही मालूम होता है”,  त्याने मागे वळून बघितल तिला ऐकू नाही न गेल?  नाहीतर लगेच बोलेल – dialogs!!!

नव्हत ऐकू गेलं तिला. त्यानं मनातच “हुश्श” केलं. तो क्षीण हसला, तिने दुर्लक्ष केलं आणि चालायला लागली, चालताना मध्ये थोडी अडखळली तर पायातली चप्पल सारखी करून, मागे न बघताच निघून गेली.

अमित गाडीत बसला तेव्हा गाडी स्टार्ट करायच्या आधी थोडा थबकला – “खरतर काय चुकीचं बोलत होती ती? काय संबध होता तसा तिचा माझा? हो, ऑफिस मध्ये आपण भेटतो. कधी चहा, तर कधी एकत्र जेवतो, ह्या पलीकडे तिने माझ्या जीवनात आणि मी तिच्या आयुष्यात कसली भर घातली होती?”  सर्वात महत्वाचं म्हणजे ती “एंगेज्ड” होती आणि अमित पण.

तरी पण तिने भारत सोडून काय, तर साधं ऑफिस लोकेशन सोडून पण कुठे जाऊ नये अस का वाटतय आपल्याला? नक्की काय आणि का वाटतय हे न समजल्या मुळे अमित चडफडला.  तो तेवढच करू शकत होता.

मात्र गाडी जरा ऑफिस मधून बाहेर पडली तेव्हा “तुला काय फरक पडतो?” त्याला परत बोचलं. आता शनिवार आणि रविवार हा प्रश्न CID च्या “कुछ तो है दया” सारखा त्याचा मेंदू कुरतडत राहणार होता. 

गाडी चालवत घरी जाई पर्यंत त्याची अवस्था बधीरच होती – “खरच नक्की काय फरक पडतो आपल्याला? कोणी जवळचा माणूसपण देवाघरी गेला तरी  १० - १५ दिवसांनी परत तहान भूक सुरळीत होतेच कि? अगदि अंत्यविधी करून आलो तरी शारीरिक क्रिया थांबतात का? मग हा काय फालतू  विचार करतोय आपण ??    

शनिवार व्यवस्थित गेला. “तुला काय फरक पडतो?” नंतर बोचलं नव्ह्त. अमितला आनंद झाला – चला म्हणजे सिरिअस काही नाहीये, मनाचे खेळ फक्त !!! जेवताना स्वतःशीच हसला, तर आई बाबा  आणि बहिणीनी – “काय झाल ह्याला अचानक?” अशा चमत्कारिक नजरेनी बघितलं. अमितनी त्यांच्या कडे बघून नेहमी प्रमाणे क्षीण हास्य केले.

मग शनिवार रात्री उशिरा एकटाच TV channels surf करताना, TV वर कोणीतरी कोणाला तरी बोललं “आप को क्या फर्क पडता है साहब?” काहीतरी परत हललं आतून. 

पुढे अमित किती तरी वेळ नुसताच बसून होता. आपण इतके हळवे आहोत??? राग आला त्याला स्वतःचाच. इतकी वर्ष आपण काम करतोय, इतक्या लोकांबरोबर आपण व्यवहार केला आहे, इतकी पुस्तक वाचतो, मग इथेच काय गोची झाली होती आपली? इतकं का लागलं आपल्याला ते वाक्य? 

त्या वाक्यात तसं काही वावग नव्ह्त, जिने ते बोलल तिच्यात आणि तिने जस बोललं ह्यात पण काही दोष नव्हता. मग आपण आपल्या  मेंदूला , “मेंदू” वड्या सारखा मधोमध भोक का पडतो आहे??? 

आत्ता पर्यंत त्यान ह्यावर खोलात जाऊन विचार टाळला होता पण  आता ते अटळ दिसत होते आणि म्हणूनच त्याला जास्त अस्वस्थ वाटत होतं. नुसता timepass तर नक्की नव्हता. म्हणजे त्याला असं वाटत होतं कि timepass नव्ह्ता, ती २ ३ वेळा बोलली होतीच काय हा timepass चाललाय तुझा?

तिने असं का बोललं असेल? आपण चुकीची गृहितकं लावत होतो का आत्तापर्यंत?
 
आपल्याला मैत्री पेक्षा जास्त काही आहे असं नेहमी वाटतंय पण नक्की काय हे कळत का नाहीये?  

का आपल्याला ती इतकी आवडते वगैरे? आपलं वय काय? आपण काय विचार करतोय?
 
आपल्याला कोणी आवडल तर त्या व्यक्तीला पण आपण आवडलच पाहिजे का?
 
ती आणि आपण वेगवेगळे engaged आहोत हे मान्य आहेच आपल्याला. आपण आपली आणि तिची engagement वाऱ्यावर सोडणार नाहीच आहोत?
 
मला तिचं निव्वळ शारीरक आकर्षण आहे का? तर तिच्या चेहऱ्या पलीकडे कधी नजरहि गेली नाही साधी. एकदा “लो-कट” ड्रेस घालून आली होती, त्या दिवशी माझी नजर तिच्याशी बोलताना,  सतत ती सोडून आजु बाजूला फिरत होती, ते निव्वळ मी “शहाणा मुलगा” आहे म्हणून किंवा मला सुंदर मुलीच्या “लो-कट” च  वावड आहे म्हणून नव्हे तर हिच्या बद्दल असा विचार करण हा शुद्रपणा ठरेल, असं मला वाटलं म्हणून - हे कसं सांगू तिला?
 
ती खूप सुंदर आहे. तिच्या कडे तासंतास बघू शकतो मी, पण माझी मजल तिचा हात  हातात धरून काही न बोलता लांब चालतोय, अशा स्वप्नरंजना पलीकडे गेली नाही. जाऊ दिली नाही. मुद्दामच! स्वप्नरंजनात पण आमचं engaged status मध्ये आलं होत - हे हि कसं सांगू तिला?

असंख्य प्रश्न...नुसते प्रश्न...अमितच्या डोक्याचा भुगा व्हायला लागला होता. हे सगळं नवीन होतं त्याला, त्यामुळे नक्की काय करावं ते सुचत नव्ह्त. जावेद अख्तर नि “केहने को बहोत कुछ है, मगर किससे कहे हम” का लिहलं असेल ते अनेकदा मनापासून ऐकूनही त्याला आत्ता खर कळत होत.

जे “आकर्षण” नाही, “अफेअर” नाही,  जी “निव्वळ मैत्री” नाही, timepass नक्कीच नाही आणि तरीही “मध्यमवर्गीय” सामाजिक बंधनामुळे ज्याला उघडपणे “प्रेम” हि म्हणायला मन घाबरत असं काहीस, हिरण्यकश्यपूचा भर उंबरठ्या वर कोथळा काढल्यागत अमितची अवस्था  झाली होती.

आई बाबा आणि बहिण शांत झोपले होते. अमित मात्र खूप दमुनही, भूता सारखा अजून जागा होता.  

आपण इतर मित्रांसारखी “दर्द भुलाने के लिये” दारू -सिगारेट पण ओढत नाही ह्याची त्याला प्रथमच उणीव भासली!

मग कधीतरी बसल्या बसल्याच त्याचा डोळा लागला.

अस्वस्थ झोपेत, फणफणून ताप आल्यावर जशी स्वप्न पडतात तस विचित्र
स्वप्न त्याला पडलं.

अमित च टेंगुळ आता खूप मोठ झालं होतं, कलिंगडा एवढ! त्याला डोळे, नाक, कान,तोंड आले होते, पण केस नव्हते. ते टेंगुळ त्याची छाती फोडून बाहेर येण्यचा आटोकाट प्रयत्न करत होतं. अमितला छातीत जीवघेण्या कळा येत होत्या. तो कळवळून ओरडत होता, एकटाच. 

ती लांबूनच खुर्चीत बसून त्याच्या अवस्थेकडे तिर्हाईताच्या नजरेनी बघण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. 

एकदा खूप कळवळून “अग आई गं” बोलला, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं असं त्याला उगाच वाटलं. त्याला ते पेन किलर वाटलं, नेमक्या त्याच बेसावध क्षणी – त्या टेंगळानी अमितची छाती फोडली आणि हवेतून सूर मारत समोरच्या wall clock शेजारी जाऊन बसलं. 

आता ते भिंती वरून मिचमिच्या डोळ्यांनी अमितला आणि तिला बघत होतं. निर्विकारपणे. जणू सुप्रीम कोर्टातला जजच!

अमितला ग्लानी आली होती, छाती रक्तबंबाळ झाली होती,  डोळे आणि श्वास मंद पणे उघड मिट होतं होते, तरी तिच्या चेहऱ्यावरची नजर हटत नव्हती.

मग अचानक कोणीतरी दवंडी पिटल्यागत जोरात आवाज दिला – “अमित” vs “ती” असा खटला सुरु होत आहे हो S S S.

टेंगुळ आता अमित कडे बघू लागलं. अमित आता तरी काही बोलणार का? ह्या आशेनी. अमितची नजर मात्र तिच्या चेहऱ्यावरच होती. ती परत निर्विकार झाली होती.

टेंगुळ मोठ्यांनी खाकारल , अमित नि मंदपणे टेंगुळा कडे पाहिलं. आता टेंगुळ त्याच्या कडे जरा रागानी बघत होतं! 

जरा कण्हतच तो कसाबसा उठला, उभं राहताना तोल गेला, पडला. त्यानी परत तिच्या कडे बघितलं, तिने पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. “तुझी जखम, तुझा त्रास, मी काय करू? उगाच माझा वेळ वाया जाणार आहे ह्या खटल्यात!” असा भाव होता तिच्या सुंदर चेहऱ्यावर. अमित मनातच बोलला – “बरोबरच आहे तुझं, माझ्या जखमेला मीच जबाबदार आहे”. मग त्याला उभं रहावच लागलं.

टेंगुळ अमितकडे बघत चक्क इंग्लिश मध्ये बोललं, जरबेनी – “विल यु प्लीज स्पीक अप नौ?

अमित बोलला – “माय लॉर्ड मला कोणावरही कुठलाच आक्षेप किंवा आरोप नाही, फक्त काही प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं मिळाली तर माझी जखम भरून निघेल लगेच. तेवढी उत्तरं, खरी उत्तरं तुम्ही दुसऱ्या पक्षाकडून घ्यावी इतकीच मनापासून विनंती!”

टेंगुळ होकारार्थ हलल. ती खुर्चीतच थोडी हलली.  “काय बोलणार आहे हा वेडा आता?” असा भाव तिच्या सुंदर चेहऱ्यावर होता.

मग अमित क्षीण पणे बोलला - माझे प्रश्न असे आहेत सर -
- आपल्या प्रत्येक भेटीत मला असं का वाटतं कि आपल्यात काहीतरी  स्पेशल आहे?
- सगळ्या मित्रां बरोबर तू अशीच वागतेस-बोलतेस का?
- माझ्याशी बोलताना, बरेचदा तू “ब्लश” होतेस असा भास का होतो मला?

अमित आता कधी नव्हे इतका वैतागून बोलायला लागला होता.
- पूर्वी whats app वर तासान तास गप्पा का मारायचीस? त्यामुळे गिल्टी फिलिंग का आलं होतं तुला?
- मला whats app वर “ब्लॉक” करायची वेळ का आली?
- त्याच मला स्पष्टीकरण द्यावं असं का वाटलं ? निव्वळ तुझ्या मनाचा चांगुलपणा किंवा फेअरनेस म्हणून?
- मला whats app वर “ब्लॉक” केल्यानंतरहि मला इतक्या वेळी का भेटत राहिलीस? परम भूतदया म्हणून? किं फक्त चांगला आणि हार्म्लेस मित्र म्हणून?

अमित आता त्र्याग्यानी बोलत होता.
- त्यानंतरही एका दिवसात आपण ३ ३  वेळा भेटलो, तरी कंटाळा येत नाही, हे असं का?
- मुळात ३ ३ वेळा भेटायची मला इच्छा झाली, म्हणून तुला हि ते का चालावं?
- त्या दिवशीच्या ३रया वेळी “आपण खूप भेटतोय हल्ली” असं का बोलली होतीस?

अमित सगळं अवसान एकवटून बोलला
- तू सतत स्वतःवरती निर्बंध लादत असलीस तरी बाहेर “डीनायल” मोड मध्ये आहेस असं का वाटत मला?
- हल्लीच “जे खर आहे ते बोलले” हे बोलताना eye contact का टाळलास?

बस्स! फारसं जोरात बोलायची सवय नसलेला तो, इतक्याश्या जोरकस बोलण्यानी पण थकला, त्याला मोठी उबळ आली आणि खोकतच जमिनीवर बसला. छातीतलं रक्त खाली सांडल.हळूहळू त्याचा श्वास पूर्ववत झाला 

त्याचं सगळ उसन अवसान ओसरलं होतं. नजर जमिनीवर होती. “उगाच बोललो आपण इतके, तिला उत्तरं  देताना त्रास होईल आता” असं वाटून  अपराधी वाटत होतं.

टेंगुळ आता तिच्या कडे उत्तरा साठी बघू लागलं.

शेवटी ती अमितकडे न बघतच उठली – टेंगुळाकडे बघत छानसं हसली. 

टेंगुळ पण आपण “जज” आहोत, हे २ क्षण विसरले. शेवटी अमितचच टेंगुळ ते!

अमित अजूनही खाली मान घालून बसला होता.

ती ठामपणे आणि एका श्वासात, एवढच बोलली – “माय लॉर्ड, हा वेडा काय बोलतोय, हे त्याचं त्याला माहित! हे सगळे त्याच्या मनाचे खेळ आहेत! ह्याचा माझा काय संबंध हो??? ह्याच्या मूर्ख प्रश्नाची उघडपणे उत्तरं द्यायला मी अजिबात बांधील नाही!!! मुळात मी इथे आले हेच खूप झालं! माझा वेळ फार महत्वाचा आहे, अशा फालतू गोष्टी वर मी वेळ खर्च करू इच्छित नाही, तरी आपण मला ह्या सगळ्या मानसिक त्रासातुन लगेच आणि पूर्ण मोकळं करावी हि विनंती!!!”
 
धाप लागली हो तिला.

टेंगुळ हळहळले, अमित कडे रागानी बघत त्यांनी अमितलाच तिला लगेच पाणी देण्याची आज्ञा केली.  

अमित तसाच धडपडत उठला, स्वच्छ पाणी ओतले ग्लास मध्ये आणि जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर  तिच्या कडे अडखळत पोचला. त्याचा अवतार जवळून बघितल्यावर, तिच्या चेहऱ्यावर अनामिक भीती उमटली. तिने पटकन पाणी घेतले व भरकन पिऊन टाकले. 

ती आपल्याकडे आत्ता बघेल नंतर बघेल ह्या आशेनी, अमित अजूनही तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. तिने नजरभेट टाळली, चेहरा परत निर्विकार् करत अमितला मागे सरकायचा कोरडा इशारा केला. अमित नेहमीच्याच आज्ञाधारकपणे मागे सरकला.

एवढ्यात टेंगुळ जोरात बोललं – “हे सगळे पुरावे लक्षात घेता, अमितचे प्रश्न हे बिनबुडाचे, गौण आणि शुल्लक ठरतात! त्याच्या बिनडोक प्रश्नामुळे तिला किती मानसिक त्रास झाला आहे ह्याची मी सख्त नोंद घेत आहे! ह्या सगळ्यात “तिचा” कसलाही दोष नसल्याने तिला मी पूर्णपणे निर्दोष जाहीर करत, ताबडतोब सर्व जाचातून मुक्त करत आहे व अमितला आजन्म माझा सांभाळ करावा अशी सक्त मजुरी ठोठावत आहे!!!
 
सगळे पुरावे???
 
पण अमितला हा निकाल ऐकून खूप आनंद झाला. “तिला उगाच त्रास झाला आपल्या मुळे, तिला त्रासातून मुक्ती!” त्याच्या चेहऱ्यावर फिकट आनंद उमटला असेल.

ती मात्र त्याच्या कडे “बावळट कुठला!!!” अशा भावानी बघत, झपकन उठली आणि ताडताड निघून पण गेली!

टेंगुळ आता अमितकडे  “जाने कहा गये वो दिन” गाण्यात, राज कपूर आपल्या स्वतःच्या छोट्या प्रतिकृती कडे, एकदाच हिरवा चष्मा काढून बघतो, नेमक्या त्याच नजरेनी बघत होतं. ते अलगद भिंतीवरून तरंगत अमितच्या कडेवर येऊन बसलं. 

अमितनि टेंगुळाकडे आणि टेंगुळानी अमितकडे क्षीण हसून बघितलं व एकत्र चालत निघाले.

..........आणि रविवार असूनही सकाळी ५ वाजता अमितला जाग आली. त्याला दरदरून घाम आला होता, घशाला कोरड पडली होती.

संपूर्ण रविवार टेंगुळ आतून ठसठसतच होतं, छाती दुखत होती पण आता हि वेदना अश्वथाम्याप्रमाणे आजन्म बोचत राहणार हे मान्य करण्या शिवाय अमितकडे पर्याय नव्हता.

पुढचे सोमवार ते शुक्रवार असेच गेले. अमित आणि ती भेटलेच नाहीत. मग शनिवारी संध्याकाळी tv बघताना अमितच्या मित्राचा फोन आला – बाकीच बोलून झाल्यावर, तो सहज बोलून गेला... अरे “ती” उद्या रात्री बिजनेस विसा वर ट्रावल करते आहे, आम्ही जातोय सोडायला, तू येतो आहेस नं?  अमितच्या तोंडातून “नाही” असं निसटलं आणि त्यानी फोन ठेवला.

अमित आता कायमचा गोठला. टेंगळाला एकदाच जोरात कळ आली आणि अमित तिथेच पडला. आवाज ऐकून आई, बाबा, बहिण धावतच बाहेर आले.

अमितच्या निर्जीव देहाचे डोळे मात्र फार सजिव दिसत होते. आई आणि बहिणींनी हंबरडा फोडला, बाबा धपकन खाली बसले...

कोणी तरी tv वर गातच राहिलं – “....मरने के बाद भी मेरी आंखे खुली रही, आदत पडी थी इन्हे इंतजार कि....”